जेम्स हेन्री ब्रेस्टेड

ब्रेस्टेड, जेम्स हेन्री : (२७ ऑगस्ट १८६५ – २ डिसेंबर १९३५). प्रसिद्ध अमेरिकन पुरातत्ववेत्ता व ईजिप्तविद्याविशारद. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात रॉकफर्ड (इलिनॉय) येथे झाला. धार्मिक विद्यालयात शिक्षण घेऊन सुरुवातीस त्याने काही दिवस चर्चमध्ये काम केले. त्या वेळी सेमिटिक भाषांच्या अभ्यासाकडे तो आकृष्ट झाला. धर्मशिक्षण सोडून येल विद्यापीठात विल्यम रेनी हार्पर यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्राच्यविद्या विषयात एम्. ए. झाला (१८९१). त्यानंतर बर्लिन विद्यापीठात त्याने आडोल्फ एरमान यांच्या मार्गदर्शनाखाली ईजिप्तविद्या विषयात पीएच्. डी. ही पदवी मिळविली (१८९४). त्याच वर्षी त्याची शिकागो विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून नेमणूक झाली. याच विद्यापीठात पुढे तो प्राध्यापक झाला (१९०५ – ३३). ईजिप्तविद्येच्या संशोधनासाठी आणि मेसोपोटेमियातील पुरातत्वीय अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी १९०५ साली त्याच्या मार्गदर्शनाखाली ईजिप्तला एक पथक धाडण्यात आले. नाईलचे खोरे, सूदान आणि सिनाईचा परिसर यांतील विविध अवशेष व कोरीव लेख यांचा अभ्यास करून एंशंट रेकॉर्ड्‌स ऑफ ईजिप्त हे पुस्तक भाषांतरासह त्याने प्रसिद्ध केले (१९०६). नंतर रॉकफेलरच्या आर्थिक साह्याने त्याने शिकागो संग्रहालयासाठी अनेक प्राचीन अवशेष विकत घेतले. निवृत्त होईपर्यंत त्याने ईजिप्तच्या अनेक सफरी केल्या आणि जवळजवळ निम्मे आयुष्य तेथील संशोधन-अभ्यासात व्यतीत केले. आपल्या अभ्यास संशोधनाचे निष्कर्ष त्याने ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. त्याच्या प्रमुख ग्रंथांपैकी द डिव्हल्‌पमेंट ऑफ रिलिजन अँड थॉट इन् एंशंट ईजिप्त (१९१२), ॲन एंशंट टाइम्स (१९१६), द डीन ऑफ कॉन्शन्स (१९३३), अ हिस्टरी ऑफ ईजिप्त फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम्स टू द पर्शियन काँकेस्ट (१९२८) इ. प्रसिद्ध असून सिरिया वाळवंटाच्या उत्तरेकडील अर्धचंद्राकृती सुपीक भागात ‘फर्टाईल क्रेसेन्ट’ ही संज्ञा त्यानेच प्रथम प्रचारात आणली. हॅस्कल ओरिएंटल म्यूझियमचा संचालक (१८९५ – १९०१) आणि शिकागो ओरिएंटल इन्स्टिट्यूटचा संघटक व संचालक (१९१९ – ३५) इ. काही महत्त्वाची पदेही त्याने भूषविली होती. त्याच्या संशोधन-लेखनामुळेच ईजिप्तच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञानभांडार पुढील विद्वानांना अभ्यासणे सोयीचे झाले. न्यूयॉर्क येथे तो निधन पावला.

त्याच्या आठवणी व चरित्र त्याचा मुलगा चार्ल्स ब्रेस्टेड याने पायोनिअर टू द पास्ट : द स्टोरी ऑफ जेम्स हेन्री ब्रेस्टेड (१९४४) या नावाने प्रसिद्ध केले. ब्रेस्टेड याच्यानंतर ईजिप्तच्या प्राचीन इतिहासावर अनेक विद्वानांनी संशोधनपर लिखाण केले तथापि या संशोधनाचा पाया ब्रेस्टेड यानेच घातला होता, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ईजिप्तचा प्राचीन इतिहास व संस्कृती यांवरूल लिखाणात ब्रेस्टेड याच्या ग्रंथाचा संदर्भ अपरिहार्य ठरलेला आहे.

देव, शां. भा.