पुरातत्त्वीय अवशेष : उत्खननात, अन्य संशोधनात वा सर्वेक्षणात सापडलेल्या वस्तू-वास्तू यांना स्थूलमानाने पुरातत्त्वीय अवशेष म्हणतात. पुरातत्त्वविद्येचा हेतू मानवाने मागे ठेवलेल्या वस्तूरूप पुराव्यांवरून सांस्कृतित इतिहास उभा करणे हा आहे. पुरातत्त्वीय संशोधनाची व्याप्ती आणि उपलब्ध पुराव्याचे अर्थबोधन या दोन्हींमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. अठराव्या शतकात योहान विंकलमान याने पुरातत्त्वविद्या म्हणजे प्राचीन कलांच्या अभ्यास अशी व्याख्या केल्याने पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास केवळ कलात्मक वस्तूंपुरताच मर्यादित राहिला होता.

गेल्या दोन शतकांत पुरातत्त्वविद्येची व्याप्ती आणि ध्येय विस्तृत झाले असल्याने, हरतऱ्हेच्या पुरातत्त्वीय अवशेषांना एक नवा अर्थ प्राप्त झाला आहे. केवळ कलावस्तूच म्हणून नव्हे, तर मानवाशी संबंध दाखविणाऱ्या विविध लहानसहान अवशेषानाही महत्त्व प्राप्त झाले आहे. पुरातत्त्वीय अवशेषांत अनेक प्रकारच्या वस्तूंच्या समावेश करता येतो. अश्मयुगीन हत्यारे, प्राचीन वास्तु त्याचप्रमाणे मातीत सापडणारे लहानसहान धान्यकण किंवा लहान आकाराचे दगडाचे वा इतर मणी अशा छोट्यामोठ्या वस्तूंचा पुरातत्त्वीय अवशेष या वर्गात समावेश करता येतो. किंबहुना कोणतीही शंभर वर्षांइतकी जुनी वस्तू नवीन अँटिक्किटीज अँड आर्ट ट्रेझरर्स अँक्ट -१९७२ या कायद्याप्रमाणे पुरातत्त्वीय अवशेष मानली जाते.

पुरातत्त्वीय अवशेषांचा शोध अचानकपणे त्याचप्रमाणे काही शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून वा हवाई छायाचित्रणाच्या साहाय्याने लागतो. दंतकथा, ताम्रपट वा शिलालेख यांतील उल्लेख, वैशिष्ट्यपूर्ण ग्रामनामे, प्राचीन वाङ्‌मयात वा प्रवासवर्णनात उल्लेखिलेली उल्लेखनीय प्राचीन शिल्पे वा वास्तू यांचे अस्तित्व इत्यादींच्या अनुरोधाने पुरातत्त्वीय अवशेष सापडू शकतात, हे जितके खरे तितकेच अलीकडे काही शास्त्रीय पद्धतींच्या वा उपकरणांच्या साहाय्याने भूगर्भात दडलेले अवशेष व त्यांचे स्वरूप  ची शहानिशा करून घेता येते. त्याचप्रमाणे सर्वेक्षण नकाशांच्या मदतीने प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन प्राचीन अवशेषांचा शोध घेता येतो. अठराव्या -एकोणिसाव्या शतकांत काही पुरातत्त्वीय अवशेषांचा शोध अवचितपणे लागला, हेही नमूद करणे आवश्यक आहे. घरांचे पाये खणताना, रेल्वे लाईन टाकताना तसेच रस्तारुंदीत अचानकपणे प्राचीन अवशेष उघडकीस येतात. पाकिस्तानातील लाहोर-मुलतान रेल्वेमार्ग टाकण्याचे काम चालू असताना त्याखाली भक्कम पाया म्हणून ठेकेदार हडप्पा टेकाडातील वास्तूंच्या विटा मोठ्या प्रमाणावर आणू लागला व त्यातून हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. परंतु आता हा अवचितपणा कमी होत चाललेला असून योजनापूर्वक समन्वेषण व शास्त्रीय पद्धतींचा अवलंब यांमुळे पुरातत्त्वीय अवशेषांचा शोध घेणे एक तांत्रिक व शास्त्रीय काम बनले आहे.

पुरातत्त्वीय अवशेषांचा शोध विविध प्रकारे घेता येतो, याचा उल्लेख वर आलाच आहे. टॉलेमी, फाहियान, इत्सिंग, ह्यूएनत्संग, अल बीरुनी इत्यादींनी प्राचीन भारतातील अनेक महत्त्वपूर्ण स्थळांचा, व्यापारी व धार्मिक केंद्रांचा उल्लेख केलेलो असल्याने त्यानुसार अशी प्राचीन स्थळे शोधण्यास मदत होते. महाभारतादी ग्रंथांत हस्तिनापुरादी नगरींचा उल्लेख येतो. अनेक लेण्यांचा पांडवलेणी असा निर्देश केला जातो, तर काही ग्रामनामे महाकाव्यातील व्यक्तीशी-उदा., महाराष्ट्रातील जोर्वेचा उल्लेख जरासंधनगरी – संबंधित असतात. काहींचा उल्लेख प्राचिन लेखांत येतो. कान्हेरीचा उल्लेख तेथील शिलालेखात ‘कृष्णगिरी’ असा आहे. अनेक स्थळी पांढरीची टेकाडे असतात. काही टेकडांना अमीर राजाचे टेकाड वा मोहें-जो-दडो येथील टेकांडाना ‘मृताचे टेकाड’ अशी विलक्षण नावे दिल्याचे दिसून येते.

जमिनीच्या पोटात दडलेले अवशेष शोधून काढण्याची काही शास्त्रीय पद्धती आधूनिक युगात शोधून काढण्यात आल्या आहेत. यांचा वापर मुख्यत्वे यूरोपात करण्यात येतो, तथापि भारतातही त्यांचा उपयोग निश्चितपणे फलदायी ठरेल. यांतील काही प्रमुख पद्धती खालील होत :

विद्युतरोध सर्वेक्षण : (इलेक्ट्रिकल रेझिस्टंस सर्व्हेइंग). विद्युत् प्रवाहाच्या जलद व संथ गतीनुसार जमिनीखालील अवशेषांची कल्पना येते. ज्या जमिनीत आद्रता जास्त किंवा कमी तीमधून विद्युत् प्रवाह अनुक्रमे जलद वा संथ जातो. जमिनीखाली प्राचीन खंदकाचे वा तळ्याचे अवशेष असतील, त्या भागातून विद्युत् प्रवाह जलद जातो. उलट जमिनीत जर दगडी वास्तूंचे अवशेष असतील, तर विद्युत् प्रवाहाच्य गतीला प्रतिरोध अथवा अडथळा येतो. हे यंत्र जमिनीवर ठेवून इलेक्ट्रो‌ड्सच्या साहाय्याने वापरले जाते. प्रवाहाची तीव्रता वा अडथळा आलेखपत्रावर रेखांकित होतो. या पद्धतीमुळे अवशेषांचे संभाव्य स्वरूप आणि त्यांचे निश्चित स्थळ यांचा मागोवा मिळतो. या यंत्राच्या साहाय्याने इटलीतील इ.स.पू. पहिल्या सहस्त्रकातील इट्रूस्कन थडग्यांचा शोध लागला.

चुंबकीय सर्वेक्षण : जमिनीत गाडल्या गेलेल्या वास्तूंत वा इतर प्रकारच्या अवशेषांत असणाऱ्या चुंबकत्वामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात झालेला बदल हे तत्त्व या पद्धतीत मूलभूत आहे. या बदलाचे मोजमाप धनवीजक तुंबकीय क्षेत्रमापक या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. प्राचीन भट्ट्या, चुली व भाजून तयार केलेल्या कोब्याच्या जमिनीचा निश्चित शोध घेता येतो. वरवर असलेल्या अशा अवशेषांचे अस्तित्व यामुळे कळते. मात्र खोलवर असणाऱ्या अवशेषांचा सुगावा या तंत्राने लागत नाही.

ध्वनिलहरी सर्वेक्षण : या पद्धतीनेही जमिनीखाली दडलेल्या काही अवशेषांचा मागोवा घेता येतो. या पद्धतीचे तत्त्व विद्युत्‌रोध सर्वेक्षण पद्धतीसारखेच आहे.  जमिनीवर लाकडी दांड्याने वा हाताने ठोकून पाहिल्यास आवाजाच्या बद्दपणानुसार खालील पोकळी जाणता येते.

भूगर्भात दडलेल्या अवशेषांची खोली व त्यांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी इटलीयन प्राध्यापक सी.एम्. लेरिसी यांनी लेरिसी परिदर्शक हे उपकरण शोधून काढले. विद्युत्‌ शक्तीवर चालणाऱ्या मोटरच्या मदतीने पाच मी. खोलीपर्यंतच्या जमिनीखालच्या अवशेषांचे नमुने अवशेषांना फारसा धक्का न लावता वर आणता येतात. यावरून अवशेषांची खोली व त्यांचे स्वरूप कळून येण्यास फार मदत होते.

याशिवाय विद्युत शक्तीवर चालणाऱ्या गिरमिटाच्या साहाय्याने जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषांची छायाचित्रे घेणे शक्य झाले आहे. एका विशिष्ट प्रकारच्या गोल नळीमध्ये विशिष्ट प्रकारचा कॅमेरा व त्याचा चमकदिवा या गिरमिटाच्या  साहाय्याने जमिनीखालीली थडग्यात सोडल्यास, थडग्यातील अवशेषांना धक्का न लावता थडग्याचे आतील सर्व बाजूंची छायाचित्रे कॅमेरा गोल फिरवून घेता येतात. केवळ आतील अवशेषांची पाहणी करावयाची असल्यास गिरमिटाच्या साहाय्याने त्रिपार्श्विक परिदर्शक सोडून त्यात अवशेषांचे दर्शन घेता येते.

वरील पद्धतींव्यतिरिक्त मृत्तिका पृथक्करण व पराग पृथक्करण यांच्या साहाय्याने एखाद्या ठिकाणी मानवी वसती झाली आहे का? याचा पडताळा पाहता येतो. मातीचे पृथक्करण करून त्यातील फॉस्फेटचे प्रमाण जाणविल्यास त्या ठिकाणी वसती झाली असावी किंवा नाही याचा पडताळा घेता येतो तर एखाद्या जमिनीतील परागसंचयाचे पृथक्करण करून त्यावरून मानवी वसतीच्या अस्तित्वाचे अंदाज बांधता येतात.

पुरातत्त्वीय अवशेषांच्या अस्तित्वाचा पडताळा घेण्याच्या विविध पद्धतींमुळे अशा अवशेषांचे शोध लावणे फारसे अवघड राहिलेले नाही. शास्त्रीय पद्धती व सर्वसामान्य ठोकताळे यांच्या मदतीने आतापर्यंत अनेक प्राचीन स्थळांचा व प्राचीन अवशषांचा शोध लागला.

पुरातत्त्वीय अवशेष व अर्थबोधन : पुरातत्त्वीय अवशेष विविध प्रकारचे असू शकतात व त्यांच्यातून निरनिराळ्या प्रकारचे अर्थबोधन होऊ शकते. वास्तूंचे अवशेष, मृत्पात्रे, शस्त्रे, अलंकार, दफने, प्राचीन लेख, धान्य, जनावरांची हाडे तसेच मानवाने निर्मिलेल्या व मानवाशी संबंधित अशा सर्व प्रकारच्या अवशेषांचा यांत समावेश होऊ शकतो. या सर्व प्रकारच्या अवशेषांतून मानवी मनाचे, मानवी संस्कृतीचे व मानवी गरजांचे प्रतिबिंब दृग्गोचर होते. उदा., मृत्पात्रे वा खापरे. विपुल प्रमाणात व बऱ्याचशा अविकृत स्वरूपात हा पुरावा भारतात उपवब्ध झाला आहे. खापरांच्या मातीच्या पृथक्करणावरून ती माती स्थानिक आहे किंवा दुसरीकडून आणली आहे, याचा उलगडा करता येतो. मडक्याची बनावट–हाताने, साच्यात वा चाकावर–कशी केली आहे, हेही समजते, त्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असल्यास, उदा., तोटीचे भांडे–ते कोणत्या खास कामाकरिता वापरले गेले असावे हे कळते. त्यावर रंगीत चित्रकारी असल्यास त्यावरून तत्कालीन कलेचे स्वरूप व त्यातील आशयावरून समाजात प्रचलित असलेल्या धार्मिक वा इतर समजुतींचा मागोवा घेता येतो. अशा तऱ्हेने एखाद्या समाजाची तांत्रिक प्रगती, आर्थिक गरज व धार्मिक समजुती यांवर थोडाफार प्रकाश टाकता येतो. एखादे मडके परदेशी बनावटीचे असल्यास उदा., रोमन ॲम्फोरा वा ॲरेटाईन व मेगॅरीयन पद्धतीची मडकी समाजाचे परदेशी संपर्क व व्यापार यांची माहिती देतात. तसेच काही मडकी केवळ दफनासाठीच वापरलेली असल्यास तत्कालीन समाजातील काही रीतिरिवाज लक्षात येऊ शकतात. अशाच प्रकारे इतर पुरातत्त्वीय अवशेषांची सांस्कृतिक इतिहास जुळविण्यास मदत होते.

कालमापन : पुरातत्त्वीय अवशेषांचे ⇨पुरातत्त्वीय कालमापन दोन प्रकारे करता येत. एक, तौलनिक आणि दुसरे, निरपेक्ष अथवा निश्चित. तौलनिक कालमापन, स्तरशास्त्रानुसार वा शैलीनुसार करता येते. उदा., एखादे मडके पाचव्या थरात सापडले असेल, तर ते चौथ्या थरातील अवशेषांपेक्षा आधीच्या काळातले व सहाव्या थरातील पुराव्यापेक्षा नंतरच्या काळातले असेल असे आपण सांगू शकतो. त्याबरोबर इतर कालनिश्चित स्वरूपाचा पुरावा उदा., नाणे वा लेख समथरात मिळाला, तर त्या मडक्याचा काळ जास्त निश्चित करता येतो. परंतु असा पुरावा नेहमीच मिळू शकेल असे नव्हे. अशा वेळी असे मडके इतरत्र कोणत्या संदर्भात सापडले आहे, याची माहिती असल्यासही त्या मडक्याचा सापेक्ष काळ ठरविता येतो.

निरपेक्ष अथवा निश्चित कालमापनाच्या अनेक शास्त्रीय पद्धती उपलब्ध झाल्या आहेत : कार्बन–१४, पोटॅशियम आ‌‌र्‌गॉन, पुराचुंबकीय मापन, विभाजन तेजोरेषा मापन, औष्णिक दीप्ती मापन, ज्वालाकाच कालमापन, फ्ल्युओरिन मापन, बीटा क्रियाशीलता मापन, वृक्षवलय मापन, हिमवाहित मृत्तिकाथर मापन. यांपैकी फक्त कार्बन–१४ पद्धतीचाच वापर अहमदाबाद येथील भौतिकी संशोधन प्रयोगशाळा आणि लखनौची बिरबल सहानी इन्स्टिट्यूट या भारतीय प्रयोगशाळांत करण्याची सोय़ आहे. यामुळे पाषाणयुगापासून ते प्राचीन इतिहास काळापर्यंतच्या कालखंडांतील अनेक अवशेषांचे कालमापन करता आले असल्याने, अनेक संस्कृतींचा काळ बराचसा निश्चित करण्यास मदत झाली आहे.

प्राचीन वास्तू व स्मारके : पुरात्त्वीय अवशेष केवळ उत्खननातच मिळतात असे समजणे चुकीचे ठरेल. अनेक स्मारके-उदा., मंदिरे, गुहा, पुतळे, शिल्पे, प्रस्तरलेख, चैत्य, विहार–जमिनीवर अस्तित्वात आहेत. त्यांचा कालखंड दोन तऱ्हेने ठरविता येतो : एक, त्यांत लेख असल्यास त्यातील काळानुसार अथवा लिपीच्या अक्षर वटिकेवरून व दोन, लेख वगैरे पुरावा नसल्यास वास्तू वा शिल्पशैलीनुसार सापेक्ष काल ठरविता येतो. मौर्य, शुंग, कुशाण, गुप्त इ. कलाशैलींची काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या मंदिरांच्या बांधणीचीही कालानुरूप वास्तुशैलीची काही वैशिष्ट्य आहेत. ही सर्व मंदिरे नागर वा द्राविड–चालुक्यशैलीत असून त्यावरून कालनिश्चिती करता येते परंतु हे कालमापन सापेक्ष ठरते. निश्चित व अचूक ठरत नाही.

नगरावशेष : पुरातत्त्वीय संशोधनात मोठमोठ्या नगरींचे विस्तृत अवशेष मिळतात. पाकिस्तानात तक्षशिला व इटलीत पाँपेई येथे संबंध नगरीचे अवशेष मिळाले आहेत. पाँपेई येथे तर गेली दोनशेहून अधिक वर्षे उत्खनन चालू आहे. तेथील विस्तृत अवशेष उत्खनित करणे हे फार दीर्घकालीन व खर्चाचे असले, तरी ते जतन करणे मोलाचे ठरते.

जतनशास्त्र : पुरातत्त्वीय अवशेष पुढील पिढ्यांच्या अभ्यासासाठी जतन करणे आणि त्या जतनासाठी विशिष्ट परिश्रम व काळजी घेणे, या  गोष्टींचे एक नवीनच शास्त्र विद्यमान काळात प्रसृत झाले आहे. त्याला जतनशास्त्र असे स्थूलमानाने नाव देता येईल. मोठमोठ्या वास्तूंप्रमाणेच लहान लहान नाणी व इतर याहीपेक्षा लहान व ठिसूळ स्वरूपाचे अवशेष जतन करणे, हे तज्ञांचे काम झाले आहे. लंडनच्या ब्रिटिश म्यूझीयममध्ये जतन व शोधन हे स्वतंत्र विभागच आहेत तर भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्यात तसेच हैदराबाद व डेहराडून येथे पुरातत्त्वीय रसायनशास्त्राच्या शाखा आहेत.

पुरातत्त्वीय अवशेषांवर अनेक घटकांचा विपरीत परिणाम होतो. धातूच्या वस्तू गंजून जातात, तर समुद्राजवळ असलेली विटांची वा दगडी बांधकामे हवेतील क्षारामुळे हळूहळू नष्ट होत जातात. पाकिस्तानातील मोहें-जो-दडो येथील विटांच्या वास्तू व भारतातील महाबलीपुर व कोनारक येथील वास्तू सागरी खाऱ्या वाऱ्यामुळे झिजून जात आहेत. त्यांचे जतन करणे महत्त्वाचे असले, तरी फार खर्चाचे आहे. हवेतील प्रदूषणामुळे पुरातत्त्वीय अवशेषांवर विकृत परिणाम होऊ लागला आहे. आग्र्याच्या ताजमहालवर मथुरेच्या तेलशुद्धीकरण कारखान्यामुळे विकृत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गुहांतील भित्तीचित्रेही आत ठिबकणाऱ्या पाण्यामुळे नष्ट होण्याची भीती असते. स्पेनमधील अल्तामिरा, फ्रान्समधील लास्को व भारतातील अजिंठा आणि बाघ ही याची उत्तम उदाहरणे होत. यांपैकी काही अवशेषांच्या जतनासाठी युनेस्कोचीही मदत घेण्यात येत आहे.

पुनर्वसन पुरातत्त्व : हवामानाच्या वैशिष्ट्यांचा विकृत परिणाम होऊ नये म्हणून अनेक पुरातत्त्वीय अवशेषांची बरीच काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे बांधल्या जाणाऱ्या धरणाखाली पुरातत्त्वीय अवशेष बुडून जाऊ नयेत, याबद्दलही शक्य तेथे काळजी घेतली जाते. या बाबतही आपद-मुक्ती-पुनर्वसन-पुरातत्त्व ही नवीनच कार्यशाखा अस्तित्वात आली आहे. उदा., ईजिप्तमधील अबू सिंबेल व आंध्र प्रदेशातील (भारत) नागार्जुनकोंडा ही होत. अबू सिंबेल येथे इ. स. पू. तेराव्या शतकात दुसर रॅमसीझ या राजाने दोन मंदिरे व सु. १८ मी. उंचीची शिल्पे खडकात कोरविली. नाईल नदीवरील आस्वान धरणात हे अवशेष बुडून जाऊ नयेत, म्हणून युनेस्कोने हे अवशेष हलवून दुसरीकडे बसविण्याचे काम १९६८ साली पूर्ण केले. भारतात कृष्णा नदीकाठी उत्खननात इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकांतील इक्ष्वाकू राजवंशाच्या अमदानीतील अनेक प्रकारचे बौद्ध अवशेष उघडकीस आले. ते एका टेकाडावर बांधलेल्या नागार्जुनकोंडा वस्तुसंग्रहालयात नेण्यात आले आहेत. म्हणून ते अवशेष पुढील पिढ्यांसाठी जतन झाले आहेत.

क्षेत्रीय वस्तुसंग्रहालय : यांव्यतिरिक्त त्या स्थळीच वस्तुसंग्रहालये स्थापण्याची  प्रथा  आता सर्वमान्य झाली आहे. यामुळे उत्खनित वास्तूंचे जतन तर होतेच पण इतर बारीकसारीक महत्त्वाचे अवशेष तेथेच संग्रहालयात ठेवल्याने त्या स्थळांचे संपूर्ण ज्ञान तेथेच प्रत्यक्ष मिळू शकते. याचा लोकशिक्षणाला फार उपयोग होतो. पुरातत्त्वीय अवयशेषांच्या जतनात आणि लोकशिक्षणात संग्रहालयांनी फार मोलाची भर घातली आहे.

भूदृश्य पुरातत्त्व : पुरातत्त्वीय अवशेषांच्या जतनाच्या तंत्रातही आमूलाग्र बदल झाले आहेत. अवशेषांच्या जतनात केवळ वस्तू वा वास्तूंचे संरक्षण व जतन करून भागात नाही, तर त्याभोवती व त्यात तत्कालीन भूदृश्य निर्माण करून ते जास्त वास्तव करावे, असा नवा विचार उदयास येत आहे. उदा., दिल्लीच्या लाल किल्ल्यातील वास्तूभोवती किल्ल्यात मोगल कालाप्रमाणे उद्यानरचना करणे, कारंजी पुन्हा सुरू करणे, जलप्रवाह सोडणे, हे सर्व यात अभिप्रेत आहे. याला ‘भूदृश्य पुरातत्त्व’ असे नाव दिले गेले आहे. लाल किल्ल्यातच मोगलकालीन वेश, कपडे, शस्त्र, नकाशे, प्रतिमाचित्रे, हस्ताक्षरांचे नमुने इ. प्रदर्शित करण्यात आले आहे. या सर्वांमुळे लाल किल्ला पाहताना आपण प्रत्यक्ष मोगलकालाशी एकरूप होतो. पुरतत्त्वीय अवशेषांच्या भोवती अशी रचना केल्यास दृक‌्शिक्षणही सुलभतेने मिळते.

पुरततत्त्वीय अवशेषांच्या जतनाचे बरे वाईट असे दोन्ही परिणाम होतात. हे अवशेष कोणत्या दृष्टिकोनातून मांडले जातात, त्यांची निवड कोणत्या दृष्टीतून केली जाते, यावर बरेचसे अवलंबून आहे. एखादे राष्ट्र पुरातत्त्वीय अवशेष केवळ आपल्या राष्ट्राचे वा धर्मांचे राजकीय तत्त्वज्ञानाचे मोठेपण दाखविण्यासाठी प्रदर्शित करते, त्यावेळी ते यथार्थ दर्शन होत नाही. सिंधू संस्कृतीची स्थळे पाकिस्तानाने आपल्या राष्ट्राची प्राचीनता सिद्ध करण्यास वापरली, तर तो खरा इतिहास नसून विकृतच म्हटला पाहिजे. पुरातत्त्वीय अवशेषांच्या अशा गैरवापराला प्रतिबंध घातला जाणे निःपक्षपाती इतिहासाच्या दृष्टीने योग्य ठरेल.

पुरातत्त्वीय अवशेषांची नासधूस होऊ नये व ते गैरमार्गाने दुसऱ्या  देशांत जाऊ नयेत, याबद्दल अनेक राष्ट्रे जागरूक असली, तरी अवशेषांच्या चोरट्या व्यापाराला अद्यापि आळा बसलेला नाही. प्रत्येक राष्ट्रात पुरातत्त्व खाते आहे व पुरातत्त्वीय अवशेषांचा व स्मारकांचा कायदा प्रचलित आहे. उत्कृष्ट शिल्पे, ब्राँझ मूर्ती. नाणी आणि चित्रकारी असलेली जुनी हस्तलिखिते प्रामुख्याने चोरबाजारासाठी अत्यंत हुशारीने पळविली जातात. भारत सरकारनेही याबाबत कडक कायदे केले असले, तरी हा चोरबाजार थांबलेला नाही. खजुराहोची शिल्पे, दक्षिणेतील ब्राँझ मूर्ती, नालंदा येथील बुद्धाच्या ब्राँझ मूर्ती ही याची काही उदाहरणे आहेत. भारतातील खाजगी मालकीचे संग्रहही अशा चोरबाजारास अभावितपणे उत्तेजन देतात. भारत सरकारने अँटीक्विटीज अँड आर्ट ट्रेझररर्स ॲक्ट–१९७२ कायदा करून १०० वर्षांच्या जुन्या सर्व वस्तूंची नोंद सक्तीची केली आहे. त्याचप्रमाणे प्रमुख शहरी सीमाशुल्क कार्यालयात पुरात्त्व अवशेषतज्ञ नेमून कोणतेही अवशेष परवानगीशिवाय परदेशी जाणार नाहीत, याची व्यवस्था केली आहे.

पुरातत्त्वीय अवशेषांच्या बाबतीत आणखी एक पैलू लक्षात घेणे अगत्याचे झाले आहे. हा पैलू म्हणजे खऱ्या प्राचीन अवशेषांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करून त्या खऱ्या म्हणून अवास्तव किंमतींना संग्रहालयांना वा परदेशी प्रवाशांना विकणे हा होय. दक्षिण भारतात चोल व पल्लवकालीन मूर्तींच्या ब्राँझ प्रतिकृती इतक्या हुबेहूब केल्या जातात, की त्या तज्ञांनाच वा धातुतज्ञांना प्रयोगशाळेतच पृथक्करणाद्वारे ओळखू येतात. पाटणा येथे मौर्य व शुंगकालीन मातीच्या मूर्तींच्या अत्यंत वास्तव नकला केल्या जातात. मात्र धातूचे पृथक्करण करून त्यांच्या नकलीपणा सिद्ध करण्याच्या शास्त्रीय पद्धतीही शोधून काढण्यात आल्या आहेत.

भूतकाळातील कलावस्तूंबद्दल आकर्षण, नोंदणी न केलेले खाजगी संग्रह, संरक्षित न केलेली प्राचीन स्थळे व पुरातत्त्वीय अवशेषांना आंतराष्ट्रीय बाजारात येणारी अवास्तव किंमत, यांमुळे पुरातत्त्वीय अवशेषांची संपूर्ण काळजी घेणे कठीण होत आहे. (चित्रपत्रे २७, २८).

संदर्भ : 1. Dowmen, E. Conservation in Field Archaeology, London, 1970.

2. Mohammad, Sanaullah, Notes on the Preservation of antiquities in the Field, Ancient India No. 1, New Delhi, 1946.

3. Plenderleith, H. J. Conservation of Antiquities and Works of Art Treatment, Repair and Restoration, Oxford, 1956.

४. देव, शां. भा. पुरातत्त्वविद्या, पुणे, १९७६.

देव, शां. भा.

पुरातत्त्वीय अवशेष

पुरातत्त्वीय अवशेष