हडप्पा : एक पुरातत्त्वीय अवशेष.हडप्पा : पाकिस्तानातील मंगमरी जिल्ह्यात (पंजाब प्रांत) रावी नदीच्या तीरावर असलेले एक प्राचीन प्रख्यात पुरातत्त्वीय स्थळ. १८३६ मध्ये पंजाबात रेल्वेलाइनच्या कामाकरिता लागणाऱ्या विटा हडप्पाच्या अवशेषांतून वापरण्यात आल्या. १८५६ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅमला हडप्पा येथील अवशेषांत मुद्रा व इतर काही प्राचीन वस्तू सापडल्या परंतु या अवशेषांचे महत्त्व त्या वेळी जाणवले नाही. पुढे १९२१ मध्ये दयाराम साहनी व १९२६-३१ दरम्यान माधोस्वरूप वत्स यांनी हडप्पा येथे विस्तृत उत्खनने केली. या उत्खननांतूनच हडप्पा संस्कृती उजेडात आली. किंबहुना सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती म्हणतात. यानंतर मॉर्टिमर व्हीलरने येथे पुन्हा उत्खनन केले (१९४६).

हडप्पाचे अवशेष जवळजवळ ४.६८ किमी. परिघाच्या क्षेत्रात पसरलेले आहेत. याचे नगरवस्ती व प्राकार असे दोन भाग करता येतात. यादोन्हींच्या उत्खननांमध्ये सापडलेल्या अवशेषांनुसार त्यांचे कालखंडदृष्ट्या तीन विभाग पाडले जातात. सर्वप्रथम वस्ती हडप्पापूर्व कालात झाली. या वस्तीशी संलग्न असलेली खापरे उत्तर बलुचिस्तानातील राणा धुंडाई येथील खापरांशी जवळीक दाखवितात. दुसऱ्या वस्तीत हडप्पा संस्कृतीचे यथार्थ दर्शन होते. तिसरी वस्ती हडप्पा उत्तरकालीन होती. या तिसऱ्या काळातील खापरे आणि सिमेटरी-एच. या स्मशानभूमीतील सांगाडे हडप्पा संस्कृतीपेक्षा वेगळे वाटतात. ऋग्वेदातील ‘हरियूपीया’चा ते हडप्पाशीसंबंध जोडतात.

हडप्पा संस्कृतीच्या सर्व अवस्थांचा काल कार्बन-१४ नुसार अद्याप ठरविण्यात आलेला नाही परंतु पाकिस्तानातील कोटदिजी येथील हडप्पा-पूर्व संस्कृतीच्या अवशेषांचा काल कार्बन-१४ अन्वये २६०५ ± १४५ असा आलेला आहे. ⇨ मोहेंजोदडो, ⇨ लोथल आणि ⇨ कालिबंगा येथील हडप्पा संस्कृतीच्या उत्तर कालखंडातील अवशेष इ. स. पू. विसावे ते अठरावे शतक ह्या कालखंडात मोडतात. यावरून हडप्पा संस्कृतीचा काल इ. स. पू. तिसरे सहस्रक असा स्थूलमानाने सांगता येईल.

हडप्पा येथील संशोधनामध्ये वस्तीचे एकूण सात कालखंड आढळून आले. या सर्व कालखंडांतील घरे विटांच्या बांधणीची असून पैकीकाही घरे अनेकमजली होती. नगररचना मोहें-जो-दडोप्रमाणेच रेखीव असून आरोग्यव्यवस्था उत्कृष्ट होती मात्र सर्व शहराचा आलेख वास्तूच्या नास-धुशीमुळे सुस्पष्ट होत नाही. हडप्पा संस्कृतीचे लोक शांतताप्रिय असल्याचे मत बरीच वर्षे मांडण्यात येत होते परंतु व्हीलरने उत्खननामध्ये एका प्रचंड कोटवास्तूचे आणि प्राकाराचे अवशेष शोधून काढल्याने हडप्पा संस्कृतीच्या लोकांना संरक्षणाची व्यवस्था करण्याचे म्हणजेच पऱ्यायाने युद्ध तंत्राचेही ज्ञान होते, हे उघड झाले.

सर्वसाधारण घरांप्रमाणेच मजुरांकरिता साधी घरे, धान्याकरिता गुदामेव विटांची बांधलेली खळी हडप्पा येथे आढळून आली. यांशिवाय सिमेटरी आर-३७ या स्मशानभूमीत मृताला न दुमडता सरळ पुरलेलेअनेक सांगाडे सापडले. मृताबरोबर उत्कृष्ट मातीची मडकीही ठेवण्याची पद्धत होती. हडप्पाचे रहिवाशी रंगीत आणि बिनरंगीत मातीची भांडी,दगडी आणि फियान्सची भांडी, मणी, अंगठ्या, बांगड्या व इतर दागिने, तांब्याची व ब्राँझची हत्यारे, मातीच्या मूर्ती, अनेक प्राणी व इतर चित्रे कोरलेल्या मुद्रा वापरीत असत. स्थापत्याच्या दृष्टिकोणातून हडप्पा येथील धान्यकोठार वैशिष्ट्यपूर्ण होय. त्याची दोन भागांत विभागणी असूनमधोमध सात मीटर रुंदीचा रस्ता ठेवण्यात आला होता. कोठारात १५ × ७ मीटरची सहा दालने होती. त्याच्या शेजारी धान्य सडण्यासाठी, कुटण्यासाठी कट्टे बांधले होते आणि तेथे मोठ्या उखळ्या होत्या. शेजारी दोनदोन खोल्यांची घरे होती. बहुधा ती कामगारांची असावीत. हडप्पाची सुबत्ता व्यापारावर अवलंबून होती पण पुढे पऱ्यावरणातील बदलांमुळे व्यापार मंदावला. हडप्पाचा नाश पऱ्यावरणातील बदलांमुळे तसेच भूकंपामुळेझाला, असे अलीकडे सिद्ध झाले आहे.

पहा : सिंधु संस्कृति.

संदर्भ : १. ढवळीकर, म. के. कोणे एके काळी सिंधु संस्कृती, पुणे, २००७.

           २. पाटील, माया, पुरातत्त्व : एक पर्यालोचन, सोलापूर, २०११.

देव, शां. भा. पाटील-शहापूरकर, माया