टेन, ला : स्वित्झर्लंडमधील नशाटेल सरोवराकाठचे मारीन गावापासून  सु. ८ किमी. अंतरावरील सुप्रसिद्ध लोहयुगीन स्थळ. १९०७ ते १९१७ या दरम्यान झालेल्या उत्खननात इ.स. पू. चौथे ते इ. स. पू. दुसरे या शतकांतील लोहयुगीन वस्तीचे अनेक अवशेष मिळाले. या  वस्तीचे वैशिष्ट्य हे, की ही वसाहत लाकडी वासे, फळ्या व लोखंडी खिळे यांच्या साहाय्याने पाण्यावर तरंगत राहील, अशी बांधलेली होती. उत्खननांत रथाची लाकडी चाके, चाकांच्या लोखंडी धावा, १६६ तलवारी, २७० भाले, लाकडी जूं, घोड्यांचे लगाम, कुऱ्हाडी, कढया वगैरे विविध वस्तू उपलब्ध झाल्या. इ. स. पू. सु. तिसऱ्या शतकातील आठ केल्टिक सोन्याची नाणीही सापडली. दररोजच्या वापरातील भांडी मात्र कमी प्रमाणात सापडली. त्यामुळे भटक्या केल्टिक लोकांचा येथे काही दिवस व्यापारी तळ असावा, असा अंदाज पुरातत्त्ववेत्त्यांनी वर्तविला आहे. अर्थात व्यापारी तळ वा केंद्र यांबद्दल अद्यापि तज्ञांत एकमत नाही. काही तज्ञांच्या मते ला टेनच्या समाजाने इटुस्कन व ग्रीक या प्राचीन संस्कृत्यांकडून अनेक वस्तूंचे नमुने उचलले असावे.

अलंकृत चांदीचे पात्र, गुंडेस्ट्रप (उत्तर जटलंड), इ. स. पू. पहिले शतक.

देव, शां. भा.