सित्तन्नवासला नृत्यसुंदरी

सित्तन्नवासल : दक्षिण भारतातील एक जैन कलाक्षेत्र. ते तमिळनाडू राज्यात पुदुकोट्टईच्या वायव्येस, त्याच जिल्ह्यात सु. १६ किमी.वर पर्वतश्रेणीत वसले आहे. जैन आचार्यांचे हे इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून इ. स. नवव्या शतकापर्यंत उपासनास्थान होते. याच्या परिसरात नर्तमलै, मलैयडीपट्टी वगैरे अन्य स्थाने आहेत. सित्तन्नवासल हा शब्द सिद्घानां वासः या संस्कृत शब्दांचे रुपांतर सिद्घण्णवास या प्राकृत रुपात होऊन त्याचेच तमिळ अपभ्रंश रुप सित्तन्नवासल झाले असावे, असा तज्ज्ञांचा कयास आहे. या व्युत्पत्तीवरुन हे स्थान जैन यतींच्या तपश्चर्येसाठी निर्मिले असावे असे दिसते. येथे पल्लव राजा पहिला महेंद्रवर्मा (कार. ६००–६२५) याने एक वैशिष्ट्यपूर्ण मंडपसदृश गुहा-मंदिर खोदले. ते एका सलग पाषाण पर्वतातून कोरुन काढलेले असून महेंद्रवर्माने डोंगर पोखरुन लेणी खोदण्याची प्रथा आपल्या राज्यात सुरु केली होती. सित्तन्नवासलच्या या जैन गुहा-मंदिरात अनेक कोरीव लेख आहेत. त्यांवरुन येथील मूर्ती आणि भित्तिचित्रे यांच्याविषयी विश्वसनीय माहिती मिळते. या मंदिराची लांबी ३० मी. असून रुंदी १५ मी. आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दर्शनी आयताकार मंडपात चार स्तंभ आहेत. त्यांपैकी दोन पूर्ण स्तंभ असून त्यांवर मूर्तिकाम आहे. उर्वरित दोन अर्धस्तंभ (भित्तिस्तंभ) आहेत. त्यामागे चौकोनी गर्भगृह आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीत देवकोष्ट (देवळ्या) असून दक्षिणेकडील देवकोष्टात अपोत्थित उठावात खोदलेली बैठी पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती आहे. त्याखाली कोरीव लेख असून त्यात उलोकादित्तन (लोकादित्य) असा पार्श्वनाथांचा उल्लेख आहे. उत्तरेकडील देवकोष्टात ध्यानमुद्रेत जैन आचार्यांची प्रतिमा असून, शेजारच्या स्तंभावर लेख कोरला आहे. त्यात तिरुवाशिरियन (श्री आचार्य) असा उल्लेख आहे. दोन्ही लेख नवव्या शतकातील आहेत. मागच्या भिंतीवर तीन मूर्ती देवकोष्टकांत असून त्यांपैकी दोन तीर्थंकरांच्या व एक चक्रवर्तीन (आचार्य) यांची आहे. याशिवाय मंडपाच्या दर्शनी भागातील दक्षिण कोपऱ्यात खोदलेल्या कोरीव लेखात पांड्य वंशातील राजा श्रीमार श्री वल्लभ (कार. ८१५–८६२) व जैन आचार्य इलङ्‌ग गौतममाङ्‌ग यांनी या गुहा-मंदिराची डागडुजी केल्याचा तसेच अर्धमंडपाची पुनर्बांधणी आणि सुशोभन केल्याचा उल्लेख आहे. याशिवाय त्यांनीच हा मुखमंडप बांधला आणि एक उंच मानस्तंभ उभा केला. काही तज्ज्ञ या गुहा-मंदिराच्या निर्मितीचे श्रेय पांड्य राजांना देतात.

या गुहा-मंदिराच्या डाव्या-उजव्या बाजूस मानवी उंचीच्या पूर्णाकृती दोन समभंगातील तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. या वास्तव व आकर्षक आहेत. या लेण्यांत अजिंठ्याप्रमाणे सर्वत्र चित्रे रेखाटण्याची योजना असावी, असे भिंतीवर लावलेल्या पातळ गिलाव्यावरुन व अवशेषांवरुन वाटते मात्र काही चित्रेच अवशिष्ट आहेत. त्यांपैकी व्हरांड्याच्या तक्तपोशीवर एक नयनरम्य चित्र असून ते सुस्थितीत अवशिष्ट आहे. या चित्राचा विषय सरोवर असून त्यात कमळाची पाने, फुले, मासे, हंस, बदके आदी दिसतात. यांशिवाय काही पक्षी तसेच काही फुले वेचणारी माणसे आहेत. ह्यांचे चित्रीकरण प्रमाणबद्घ व वास्तव असून त्यांचे चेहरे प्रसन्न आहेत. यांशिवाय या भित्तिचित्रांत तीन पुरुषाकृती आहेत. या पुरुषांच्या हातात कमलपुष्पे असून त्यांचा वर्ण तांबूस आहे मात्र एक पुरुष सुवर्णपीत वर्णाचा आहे. यातील पाणी सांकेतिक आरेखनाने दर्शविले आहे. मासे व हंस पाण्यात विहार करीत आहेत. उत्फुल्ल कमलपुष्पांचे देठ आणि पाने कलाकाराने रेखांकित केली असून कमलांचे देठ बाकदार व लयबद्घ आहेत. हे सरोवरदृश्य जैन पुराणातील एखाद्या कथेचा भाग असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या सरोवरदृश्याव्यतिरिक्त येथे काही नृत्यांगना, सुरसुंदरी यांची चित्रे असून एक शाही दांपत्य (राजाराणी) रेखाटले आहे. डावा हात दंडमुद्रेत आणि उजवा हात पताकामुद्रेत अशी नृत्य आविर्भावात असलेली अप्सरा-सुरसुंदरी उजवीकडे किंचित कलली असून तिची नजर त्याबाजूला रोखली आहे ती नटराजाच्या भुजंग-त्रासितक नृत्यमुद्रेत चितारली आहे, तर दुसरी एक नृत्यांगना (स्तंभावर रेखाटलेली) बाळकृष्णाच्या नृत्यमुद्रेत असून तिचा डावा हात आनंदाने पसरला आहे आणि उजवा हात पताका-मुद्रेत आहे. या स्त्रीप्रतिमा, त्यांची केशभूषा, अलंकार, केशसंभारातील फुले, मोती ही आभूषणे, तसेच सडपातळ अंगकाठी, उन्नत उरोज, सिंहकटी यांमुळे विलक्षण मोहक व आकर्षक वाटतात. या सुरसुंदरींच्या आकृती प्रमाणबद्घ असून त्यांच्या अंगप्रत्यंगांतून अभिव्यक्त होणारी लयबद्घ गती चित्रकाराने अत्यंत कौशल्याने रेखाटली आहे. चित्ररेखाटनात तांबडा, पिवळा, निळा, हिरवा, काळा, पांढरा इ. रंग वापरले असून ते स्थानिक जंगलातील वनस्पती व माती यांपासून बनविलेले आहेत. चित्रांतील रंगसंगती आणि मानवी आकृत्यांची प्रमाणबद्घता यांमुळे येथील प्रतिमा वास्तववादी भासतात. ही बहुतेक सर्व रेखाचित्रे आहेत. या भित्तिचित्रांमुळे सित्तन्नवासल हे एक पर्यटनस्थळ झाले आहे. या चित्रांचे तंत्र अजिंठा चित्रशैलीसारखेच असून त्या शैलीचा प्रभाव येथे जाणवतो. या गुंफा-मंदिराचा शोध प्राध्यापक जोव्हाऊ-डुब्रेल या पुरातत्त्वज्ञाने १९२० मध्ये लावला व त्यानंतर कलासमीक्षकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. शैलीच्या दृष्टीने पाहता ही भित्तिचित्रे विविध काळात काढली असावीत.

संदर्भ : 1. Bhatt, S. C. Ed. The Encyclopedic District Gazetteers of India, New Delhi, 1997.

2. Ghosh, A. Ed. The Jain Art and Architecture, Vol. II, New Delhi, 1975.

3. Havell, E. B. Indian Sculpture and Painting, New Delhi, 1980.

4. Srinivasan, K. R. Proceedings of The Indian History Congress : A Note on the date of Sittannavasal Paintings, Calcutta, 1944.

देशपांडे, सु. र.