नेवासे : महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. अहमदनगर शहराच्या ईशान्येस सु. ५६ किमी. अंतरावर प्रवरा नदीच्या दक्षिण तीरी ते वसले आहे. प्राचीन वाङ्मय, कोरीव लेख वगैरेंतून त्याचे उल्लेख मिळतात. ते निधिवास, निदवास, निवास इ. भिन्न नामांतरांनी उल्लेखिलेले आहे. तेराव्या शतकात येथे ज्ञानेश्ररांनी ज्ञानेश्वरी लिहिली अशी परंपरा सांगते. ज्ञानेश्वराकालीन म्हणजेच यादवकालीन आणि त्यानंतरच्या बहमनी काळातील अवशेष नेवासे येथे अद्याप विद्यमान आहेत. नेवासे येथील लाडमोड टेकाडात डेक्कन कॉलेजच्या वतीने १९५४–६० च्या दरम्यान विस्तृत प्रमाणात उत्खनन करण्यात आले. तेथील उत्खननांत मिळालेल्या विविध पुराव्यांनुसार नेवाशाला पहिली वस्ती इ.स.पू. दुसऱ्या सहस्रकाच्या शेवटी झाली होती, हे आढळून आले. ही वस्ती ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या लोकांची असून हे लोक तांब्याच्या कुऱ्हाडी, छिन्न्या व मासे पकडण्याचे गळ वापरीत असत. याबरोबरच गारगोटीच्या छिलक्यांपासून बनविलेली व काळ्या दगडाची घासून गुळगुळीत बनविलेली नवाश्मयुगीन परंपरेची धारदार हत्यारेही ते उपयोगात आणीत. काळ्या रंगात नक्षी काढलेली तोटीची भांडी, वाडगे, कळशा आणि मातीचे तवे ते वापरीत. मृत मुलांना राखी रंगाच्या मडक्यांत व प्रौढ मृतांना रांजणांत उत्तर-दक्षिण ठेवून पुरीत असत. घरे मातीची व भुई काळी माती व चुना यांच्या मिश्रणाने बनवीत. लहान मुलांच्या गळ्यांत रेशमी दोऱ्यांत ओवलेल्या तांब्याच्या मणी- माळा घालीत. हे बहुतांशी मांसाहारी होते. दुसरी वस्ती इ. स. पू. दुसऱ्या-पहिल्या शतकांत सातवाहन राजांच्या काळी झाली. विटांची पक्क्या पायावर बांधलेली घरे, सांडपाण्याकरिता कूप, काळ्यातांबड्या रंगांचे वाडगे, कळशा, थाळ्या, झाकण्या इ. मृत्पात्रे, लोखंडाची आयुधे, सातवाहन नाणी व शाकाहारी-मांसाहारी अन्नपद्धती ही या काळाची वैशिष्ट्ये होती. तिसरी वस्ती इ. स. पू. पहिले ते इसवीसनाचे तिसरे शतक या काळात झाली. या काळात नेवाशाच्या रहिवाशांच्या जीवनात रोमन बनावटीच्या अनेक वस्तू व्यापारी संपर्कामुळे वापरात आल्या: मोठमोठाले मद्यकुंभ, रोमन काचेचे मणी, रोमन पुतळ्या, अर्चना कुंडे इत्यादी. शेवटची वस्ती बहमनी-मराठा सत्तांच्या काळात झाली. या काळातील नाण्यांवरून हे स्पष्ट दिसते. या काळात तिथे अनेक लहान-मोठ्या वास्तू बांधण्यात आल्या. त्यांपैकी मुसलमानांचा इदगा, कामिलशाहचा दर्गा, जामी मस्जीद, मोहिनी राजचे मंदिर, हनुमान व गणेश मंदिरे आणि घाट इ. प्रसिद्ध आहेत.
नेवाशाच्या उत्खननांत महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तृत पुरावा पहिल्या प्रथम हाती येऊन या लोकांचा नवाश्मयुगीन संस्कृतीशी निकटचा संबंध आला, हे उघड झाले. याशिवाय नेवाशानजीकच प्रवरेच्या काठच्या संशोधनात प्राचीनतम अश्मयुगातील व प्राचीनतर अश्मयुगातील हत्यारे व अश्मीभूत रानटी बैलांचे अवशेष सापडल्याने अश्मयुगापासून ते तहत मध्ययुगापर्यंत मानवी वस्तीची उत्क्रांती जाणण्यास मदत झाली.
संदर्भ : 1. Sankalia, H.D. Mate, M. S. Antiquities of Nevasa, Bombay, 1960.
2. Sankalia, H. D. & Others, From History to Prehistory at Nevasa, Poona, 1960.
देव, शां. भा.
“