व्हेंट्रिस मायकेल जॉर्ज फ्रॅन्सिस : (१२ जुलै १९२२–६ सप्टेंबर १९५६). प्रसिद्ध ब्रिटिश पुरालिपिसंशोधक. जन्म व्हिदमस्टेड (हर्टफर्डशर) येथे. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर आर्थर एव्हान्झ यांचे लिनिअर बी या प्राचीन चित्रलिपीवरील भाषण ऐकले. नॉसस, क्रीट, पिलॉस इ. प्राचीन नगरांच्या मृण्मुद्रांवरील या चित्रलिपीचा उलगडा झालेला नव्हता. व्हेंट्रिसने तो करण्याचा निश्चय केला. वयाच्या अठराव्या वर्षीच लिनिअर बी लिपी आणि विवाद्य इट्रुस्कन भाषा यांतील संबंधावर त्याने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. व्हेंट्रिस हा व्यवसायाने वास्तुरचनाकार होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९ – ४५) त्यास शाही हवाई दलात काही वर्षे सेवा करावी लागली. दरम्यान सांख्यिकीय विश्लेषणाची पद्धत वापरून व अवयवदर्शक चिन्हांचा आधार घेऊन त्याने लिनिअर बी या लिपीचे प्रथम वाचन केले. जून १९५२मध्ये ब्रिटिश नभोवाणीच्या कार्यक्रमात त्याने लिनिअर बी या लिपीचा शोध लावल्याचे जाहीर करून ती प्राचीन ग्रीक लिपीचे रूप असल्याचे दाखविले. पुढे केंब्रिज विद्यापीठातील भाषाशास्त्रज्ञ जॉन चॅडविक याच्या सहकाऱ्याने त्याने ‘एव्हिडन्स फॉर ग्रीक डायलेक्ट इन द मायनीनियन आर्काइव्ह्‌ज’ हा ऐतिहासिक महत्त्वाचा शोधनिबंध १९५३मध्ये प्रसिद्ध केला. त्यात लिनिअर बी ही ग्रीक अक्षरवटिकांची लिपी क्रीटमधील प्राचीन मिनोअन लोक वापरीत असत, असे म्हटले आहे. चॅडविकच्या सहकाऱ्याने लिहिलेले व्हेंट्रिसचे डॉक्युमेंन्सट्‌स इन मायसीनियन ग्रीक (१९५६) हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

मोटार अपघातात हॅटफिल्ड येथे त्याचे अकाली ‍निधन झाले.

संदर्भ : 1. Ceram, C. W. A Picture History of Archaeology, London, 1958.

2. Chadwick, John, The Decipherment of Linear B, London, 1958.

3. Cottrell, Leonard, Ed. The Concise Encyclopaedia of Archaeology, London, 1960.

देशपांडे, सु. र. देव. शां. भा.