कार्ले : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध लेण्यांचे सुप्रसिद्ध स्थळ. ही लेणी पुणे–मुंबई रस्त्यांवरील मळवली रेल्वे स्थानकापासून उत्तरेस सु.पाच किमी. वर एका डोंगरात खोदलेली आहेत. येथील बौद्ध भिक्षूंच्या अनेक विहारांवरून त्यास विहारगाव असेही म्हणतात. ही लेणी इ.स.पू. पहिल्या शतकात खोदलेली असावीत येथील अवशिष्ट लेख, शैली व शिल्पे यांवरून ही सर्व लेणी एकाच वेळी खोदलेली नसावीत असे दिसते. त्यांतील चैत्यगृह इ.स.पू. पहिल्या शतकात खोदले गेले असावे दर्शनी भिंतींवरील दंपतिशिल्पे व बौद्धशिल्पे मात्र तत्कालीन नसावीत, सिंहस्तंभादी शिल्पे दुसऱ्या शतकातील आहेत.

सातवाहनकालीन मिथुनशिल्प, इ. स. पू. पहिले शतक, कार्ले.

येथील मुख्य गुंफा म्हणजे चैत्यगृह असून ते विस्तीर्ण आहे. तेथील सभामंडप सु.३८ मी. लांब, ११.५ मी.रुंद व ११ मी. उंच आहे. सभामंडपात अनेक स्तंभ असून त्यांवर सुंदर शिल्पे आहेत. उत्कीर्ण शिल्पवास्तूच्या दृष्टीने कार्ल्याचे चैत्यगृह आकाराची भव्यता आणि शैलीची प्रौढता दर्शविते. उत्कृष्ट चैत्यगवाक्ष, सरळ स्तंभ, रसरशीत शिल्पाकृती आणि लेण्यासमोरील उत्तुंग सिंहस्तंभ ही येथील काही ठळक वैशिष्टये मानता येतील. ह्याशिवाय सभामंडपाच्या ओवऱ्यांच्या स्तंभांवर घोडेस्वारांच्या मूर्ती आणि विविध प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. एका भिंतीवर तीन गजराज उभे असून त्यांच्या वरखाली जाळीदार नक्षी कोरलेली आहे. येथील लेण्यांत बुध्दाच्या अनेक मूर्ती आहेत तसेच भिंतीवर स्त्रीपुरुष नर्तकांची युगुले कोरलेली आहेत. दर्शनी भागावरील महाव्दारावर मिथुनशिल्प काढलेले आहे. चैत्यगृहाच्या छपराच्या आतील भागावर काष्ठकाम, काही स्तंभ आणि भिंतीवर पुसट भितिचित्रे आढळतात. हयांवरून पूर्वी येथे भरपूर काष्ठशिल्पे व भित्तिचित्रे असावीत.

हया लेण्यांत भिन्नभिन्न काळातील सु. बावीस शिलालेख उपलब्ध झाले आहेत. त्यांतील एका लेखानुसार हे चैत्यगृह म्हणजे ‘जम्बुव्दीपातील अव्दितीय लेणे’ असे म्हटले आहे आणि ते वैजयंतीच्या भूतपाल श्रेष्ठीने खोदविले, असा त्यात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे सिंहस्तभांवरील लेखानुसार हा स्तभ महाराथी अग्निमित्राने दान म्हणून उभा केल्याची माहिती मिळते. तसेच नहपान क्षत्रपाचा जावई उषवदात सु. १२० द्ध व पुळुमावी सातवाहन हयांचेही येथे लेख आहेत.

संदर्भ : 1.Burgess, James, Report on the Buddhist Cave Temples &amp Their Inscriptions. Varanasi, 1964. 2.Fergusson, James Burgess, James, Cave Temples of India, London, 1880

देव, शां.भा.