नावडातोडी : मध्य प्रदेश राज्यातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. नावडातोली, नावडाटोडी, नौरातोरी वगैरे विविध नावांनी ते ओळखले जाते. नर्मदेच्या दक्षिण काठी असलेले हे स्थळ महेश्वरच्या समोरच्या तीरावर वसलेले आहे. महेश्वर हे इंदूरपासून दक्षिणेस सु. १०० किमी. अंतरावर आहे. नावडातोडी येथे नावडे म्हणजे नावाडी यांची छोटीशी वस्ती आहे. या वस्तीपासून सु. पाव किमी. वर पुरावस्तुयुक्त टेकाडे आहेत. नावाड्यांच्या वस्तीव्यतिरिक्त इथे दुसरी फारशी वस्ती आढळत नाही. येथील उत्खननांमध्ये प्रामुख्याने ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे अवशेष मिळाले. ही वस्ती एकूण चार कालखंडांमध्ये झाली. सर्वांत पहिली वस्ती कार्बन – १४ नुसार इ. स. पू. सतराव्या शतकांमध्ये झाली, दुसरी वस्ती त्याच शतकाच्या अखेरीस झाली, तिसरी त्यानंतर थोड्या काळाने झाली आणि चौथी इ. स. पू. सु. पंधराव्या-चौदाव्या शतकांमध्ये झाली. या चारही वस्त्या आगीने भस्मसात झाल्याचा पुरावा उत्खननांमध्ये उपलब्ध झाला आहे. प्राचीन ऐतिहासिक काळामध्ये देखील नावडातोडी येथे काही टेकाडांवर वस्ती झाल्याचा पुरावा मिळाला आहे पण तत्संबंधी फारशी तपशीलवार माहिती मिळत नाही.

मध्य प्रदेश : माळवा संस्कृतीची मृत्पात्रे.सर्वप्रथम वस्ती इ. स. पू. सतराव्या शतकात झाली. या वस्तीचे लोक चौकोनी अथवा काटकोनी आकाराची घरे व गोल झोपड्या बांधत असत. घरांच्या भिंती बांबू व माती थापून बनवल्या जात. घराचे छप्पर कसे होते, याबद्दल फारसे सांगता येत नाही परंतु तेही फार वजनदार नसावे. मोठमोठ्या लाकडांचा उपयोग कुठेच आढळून आला नाही. घरे एकमेकांजवळ असून त्यांची आखणी पद्धतशीर नव्हती. हे लोक विविध तऱ्हेची मातीची भांडी वापरीत असत. त्यांवर पिवळसर पांढरट रंगाचा लेप देऊन काळ्या रंगात चित्रण करीत. हे चित्रण भौमितिक आकाराप्रमाणेच इतरही वैशिष्ट्यपूर्ण नक्षीत केले जाई. वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांत हरतऱ्हेची जनावरे व हातात हात अडकवून नृत्य करणाऱ्या व्यक्तींचा समूह असून तो उल्लेखनीय आहे. पिवळ्या रंगाच्या मृत्पात्रांत छोटे कप अथवा वाडगे हेच आकार प्रामुख्याने दिसतात. या काळातील काळ्या-तांबड्या मृत्पात्रांवरही मळकट पांढऱ्या रंगामध्ये नक्षी केलेली आढळते परंतु ही नक्षी फारशी आकर्षक नाही. याचबरोबर तांबड्या रंगाच्या लेपावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली मृत्पात्रे बरीच प्रचारात होती. यांचे आकार मात्र ह्या आधीच्या दोन मृत्पात्रांच्या प्रकारांपासून वेगळे यांमध्ये मातीचे गडवे, घागरी, तवे, रांजण, छोटे प्याले, वाडगे इ. अनेक प्रकार प्रचलित होते. या लोकांची हत्यारे गारगोटीच्या लांब छिलक्यांची बनविलेली असून त्यांशिवाय तांब्याच्या चपट्या काटकोन-चौकोनी कुऱ्हाडीही ते वापरीत असत.

ही पहिली वस्ती आगीमध्ये जळून संपूर्ण नाश पावली. दुसरी वस्ती हे आगीत नष्ट झालेले अवेशष जमिनीसारखे करून त्यांवर झाली. या लोकांची संस्कृतीही पहिल्या कालखंडातील संस्कृतीसारखीच होती परंतु या वस्तीच्या काळामध्ये काळी-तांबडी व पिवळसर रंगाची मडकी फारशी वापरात नव्हती. या काळात घरादारांच्या बांधणीत गोल वास्तूंची पद्धती प्रचलित होती. तांबड्या रंगाच्या लेपावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली माळवा मृत्पात्रे, विशेषतः वाडगे, कप व तिवई असलेल्या थाळ्या व मद्याचे विविध आकाराचे चषक आणि त्याचबरोबर पन्हाळीसारखी तोटी असलेली पात्रे अनेक मिळाली. अशा तऱ्हेचे वाडगे आणि चषक इराणमध्ये टेपे हिस्सार, टेपे सियाल्क इ. ठिकाणी सापडलेले आहेत. यांशिवाय तांब्याच्या तलवारींचे अवशेषही मिळाले.

हीही वस्ती आगीत जळून गेली. हे आगीत जळालेले घरादारांचे अवशेष सपाट करून त्यांवर पुन्हा तिसरी वस्ती झाली. या वस्तीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे या आधीच्या दुसऱ्या वस्तीसारखी जरी असली, तरी या सुमारास गोल वास्तूचे बांधकाम खूपच कमी झालेले आढळते. या काळातील माळवा पद्धतीच्या मृत्पात्रांवर उत्कृष्ट तऱ्हेची नक्षी काढल्याचे आढळून आले. मोर, खेकडा, बगळा, वाघ इ. प्राणी कुशलतेने चितारलेले दिसून येतात. याशिवाय उगवत्या सूर्याचे चित्रणही काही भांड्यांवर आढळून येते. शिवाय त्रिकोण, चौकोन, नागमोडी रेखा, पट्टे व एकांत एक काढलेली चक्रे आढळून येतात. या वस्तीच्या अखेरच्या काळामध्ये एका नव्या तऱ्हेची मृत्पात्रे वापरात असल्याचे दिसून आले. ही मृत्पात्रे महाराष्ट्रातील जोर्वे या ठिकाणी प्रथम मिळाली, म्हणून त्यांना मृत्पात्रे असे म्हणतात. या जोर्वे मृत्पात्रांशिवाय या तिसऱ्या कालखंडातील वस्तीत पन्हाळीसारखी तोटी असलेले वाडगे आणि मद्याचे चषक मोठ्या प्रमाणात सापडले. मात्र गारगोटीच्या छिलक्यांची हत्यारे व इतर बाबींत बदल झाला नाही.

चौथी वस्ती तिसऱ्या वस्तीच्या भस्मीभूत अवशेषांवर झाली. या वस्तीमध्ये जोर्वे पद्धतीचे वाडगे, कळशा, तोटीची भांडी, माळवा पद्धतीचे वाडगे, तवे, उंच मानेची भांडी, छोट्या मानवी आकृत्या चिटकवलेले मातीचे रांजण व मोठमोठाली चौकोनी भांडी ठेवण्यासाठी केलेले स्टँड इ. सापडले आहेत. या कालखंडात गोल वास्तू बांधण्याची पद्धती पूर्णतः नष्ट झाली होती. या काळातील सर्वांत महत्त्वाचा पुरावा म्हणजे एका जळलेल्या घराच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या मूग, उडीद, हरभरा, तांदूळ, गहू, वाटाणा या धान्यांच्या बिया व बोरांच्या बिया, हे होत. यांवरून मध्य प्रदेशामध्ये इ. स. पू. पंधराव्या-चौदाव्या शतकांत शेती होत असे, हे सिद्ध होते. शेती करण्याकरता नांगराऐवजी लाकडी टणक काठ्यांचा उपयोग करीत. हे लोक मांसाहारी होते, हेही उत्खननांत सापडलेल्या पाळीव जनावरांच्या हाडांवरून सिद्ध झाले.

या शेवटच्या वस्तीचा नाश कसा झाला, याविषयी निश्चितपणे सांगता येत नाही परंतु प्राचीन ऐतिहासिक काळात इ. स. पू. ४००–३०० च्या सुमारास नावडातोडीच्या काही टेकड्यांवर बौद्ध धर्मीयांची वस्ती झाल्याचा पुरावा मिळतो. तेथे काही स्तूपांचे अवशेष मिळाले. हे स्तूप नर्मदेच्या पुरामुळे नष्ट झाल्याचा पुरावा तेथील थरांच्या अभ्यासावरून मिळतो. नावडातोडीच्या संस्कृतीचे राजस्थान व महाराष्ट्र ह्या विभागांतील ताम्रपाषाणयुगीनांशी घनिष्ठ संबंध आले.

संदर्भ : Sankalia, H. D.  Subbarao,  Bendapudi  Deo, S. B. The Excavations at Maheshwar and Navdatoli. 1952-53, Poona, 1958.

 

देव, शां. भा.