बोगाझकई : प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले तुर्कस्तानातील एक स्थळ. अंकाराच्या पूर्वेस २०० किमी. वर ते वसले आहे. हॅटुसस असेही त्याला म्हणत. येथे हिटाइट (१४०० – १२०० इ. स. पू.) साम्राज्यातील अनेक अवशेष हूगो विंक्‌लर यास १९०६ – ०७ दरम्यान सापडले. तत्पूर्वी चार्ल्स टेशिएर या संशोधकास १८३४ मध्ये येथील प्राचीन प्राकारांच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्यानंतर १८९३ मध्ये येथे हिटाइट लेख असलेल्या कित्येक मृण्वटिका अर्न्स्ट शांत्र याला सापडल्या. विंक्‌लर आणि थीओडोर मॅक्रिडी (बे) यांना १९०६ साली केलेल्या पहिल्या उत्खननात अशा दहा हजार मृण्‌वटिका हाती लागल्या. १९३१ ते १९३९ या दरम्यानच्या काळात कुर्ट बिटल यांनी येथे विस्तृत उत्खनन केले. उत्खननात अतिविस्तृत-जवळजवळ १२० हे. आवारात विखुरलेल्या नगरीचे अवशेष मिळाले. त्यात तटबंदी, भव्यद्वार आणि मंदिरे आढळली. त्यांतील याझिलिकया या हिटाइट देवतेचे मंदिर भव्य आहे. इ. स. पू. सोळाव्या शतकात हिटइट राजा पहिला हटुसिलिस याची राजधानी येथे होती. इ. स. पू. चौदाव्या शतकात शुब्बिलुलिउमा याने ती वाढवली. येथील मातीच्या कोटावर प्रचंड दगडी शिळांचा कोट असून त्यास दर ३२ मी. वर बुरुज आहेत आणि कोटाला एकूण पाच प्रवेशद्वारे आहेत. त्यांवर सिंह, लढवय्ये यांची उठावदार शिल्पे असून मंदिरातील मृण्वटिकांवरुन वरुण, इंद्र वगैरेंची माहिती मिळते. पुरातत्त्वज्ञांना याच्याही खालच्या स्तरात याहून प्राचीन अवशेष सापडले. बोगाझकई येथील उत्खननांमुळे हिटाइट संस्कृतीच्या इतिहासावर प्रकाश पडला.

हिटाइटकालीन स्फ्रिंक्सच्या पुतळ्याच्या पायाजवळील एक प्रतीक

संदर्भ : Bittel, Kurt, Hattusha : The Capital of the Hittites, Oxford, १९७०.

देव, शां. भा.