रोझेटा शिलालेख : ईजिप्तमधील नाईल नदीच्या पश्चिम त्रिभुजप्रदेशात रोझेटा किंवा रशिद या खेड्याजवळ सापडलेला तीन लिप्यांतील शिलालेख. त्याचा शोध पहिल्या नेपालियनच्या फ्रेंच सैन्यास १७९९ मध्ये लावला. पुढे ईजिप्त ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर (१८०१) त्यांनी तो इंग्‍लंडला आणला आणि ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात ठेवला. या काळ्या बेसाल्ट दगडाची लांबी १.१ मीटर, रुंदी ०.७५ मीटर व जाडी ०.३० मीटर आहे. या दगडावर वरून खाली एकच मजकूर हायरोग्‍लिफिक, डेमॉटिक व ग्रीक या तीन स्वतंत्र लिप्यांत लिहिला आहे. मजकुरात टॉलेमी इपिफनीझ (इ. स. पू. २०३-१८१) याच्या राज्यरोहणानिमित्त मेंफिसच्या पुरोहितांनी घोषित केलेले लोक व पुरोहित यांना दिलेल्या देणग्यांचा हुकूमनामा आहे. हा हुकूमनामा इ. स. पू. २७ मार्च १९६ मध्ये देण्यात आला. ग्रीक लिपीचा आधार घेऊन सिल्व्हेस्ट्र द सासी आणि यान डाव्हिट एकरब्‍लेड या संशोधकांनी त्यातील काही मजकूर शोधण्याचा प्रयत्‍न केला. एकरब्‍लेडने १८०२ मध्ये डेमॉटिक पाठ ग्रीक पाठाशी जुळवून काही निष्कर्ष काढले. त्यानंतर टॉमस यंगने १८१२ मध्ये काही राजनामांची हायरोग्‍लिफिक लिपीतील नावांशी तुलना केली. त्याला हायरोग्‍लिफिक चिन्हांवरून ध्वनी मूल्यांकन शक्य झाले. झां फ्रान्स्वा शांपॉल्याँ या फ्रेंच संशोधकाने प्रथमच हायरोग्‍लिफिक पाठाचे भाषांतर केले आणि ती लिपी केवळ चित्रमय नसून तीत काही वर्णाक्षरे आहेत, हे दाखविले (१८२४). त्याच्या प्रेसी द सिस्टेम हायरोग्‍लिफिक या ग्रंथात व्याकरण व अन्य स्पष्टीकरणे यांचे तपशील आहेत. त्याच्या अभ्यासामुळे हायरोग्‍लिफिक लिपीचे वाचन सुलभ झाले. या लिपीच्या अक्षरवटिकांच्या स्वरूपाबद्दल त्याने काही निश्चित सिद्धांत मांडले. या प्रकारात काही चिन्हे ध्वनिचिन्हे व काही अर्थचिन्हे आहेत, हेही त्याने दाखविले. यानंतर हायन्‍रिख कार्ल ब्रुख्श या संशोधकाने डेमॉटिक लिप्यंतर व हायरोग्‍लिफिक लिप्यंतर यांतील बारकावे सांगितले आणि त्याचे विवेचन १८६८ साली प्रसिद्ध केलेल्या आपल्या ग्रंथात Hieroglyphisch-demotisches Worterbuch या ग्रंथात केले. संशोधकांच्या प्रयत्‍नांमुळे हायरोग्‍लिफिक लिपीच्या द्वारे ईजिप्शियन इतिहास बराचसा उजेडात आला. त्याचे श्रेय साहजिकच रोझेटा दगडावरील त्रिलिप्यात्मक मजकूराकडे जाते. हायरोग्‍लिफिक लिपीतील मजकूर बराचसा अस्पष्ट झाला आहे. (पहा : हायरोग्लिफिक लिपि.)

संदर्भ : 1. Budge, E. A. W. The Rosetta Stone, London, 1913.

           2. Cottrell, L. The Concise Encyclopaedia of Archaeology, London, 1960.  

देव, शां. भा.