मिडलॅरेन (हॉलंड) येथील सुस्थिंतीतील डॉलमेनडॉलमेन : पूर्वाश्मयुगातील दगडी स्मारकांना किंवा थडग्यांना दिलेली सर्वसाधारण संज्ञा. आरंभी ही थडगी नवाश्मयुगाच्या संदर्भात इंग्लंडमध्ये आढळून आली, तेव्हा त्यांना डॉलमेन हे नाव मिळाले. त्यांनाच क्रॉमलेक असेही म्हणत. चार बांजूना किंवा फक्त दोनच बांजूना दगडी फरशांसारखे मोठे दगड उभे करून त्यांच्या डोक्यावर आडवी सपाट फरशी ठेवली, की डॉलमेन तयार होई. ह्याखाली मृताला गाडलेले असते. हे अवशेष मध्य अश्मयुगापासून नवाश्मयुगापर्यंतच्या सर्व काळात सापडतात, तसेच ते यूरोपात इतत्रही व आशिया खंडात आढळून आले आहेत. काही ठिकाणी सगळीकडून दगड उभे करून त्या स्मारकाला जवळजवळ पेटीचेच स्वरूप देण्यात येई. डॉलमेन या स्मारकाभोवती दगडांचे वर्तुळही रचलेले आढळते. स्टोनहेंजसारखी शिळावर्तुळे आणि डॉलमेन भोवतालची वर्तुळे ही एक नव्हते. डॉलमेन हे मुख्यतः मृताचे स्मारक असे. फ्रान्समधील लॉकमारीआकेरचे डॉलमेन या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

माटे, म. श्री.