विंकलमान, योहान योआखिम : (९ डिसेंबर १७१७-८ जून १७६८). सुविख्यात जर्मन पुरातत्त्वज्ञ आणि थोर कलासमीक्षक. एका सामान्य चर्मकाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म श्टेंडाल (प्रशिया) येथे झाला. त्यांनी हाल आणि येना येथील विद्यालयांतून अनुक्रमे धर्मशास्त्र व वैद्यक यांचा अभ्यास केला आणि झाल्ट्‌स्वेडल येथे अध्यापकाचे काम अंगीकारले (१७४३-४८). ग्रीक आणि लॅटिन भाषांतील विशेश विंकलमान : मेंग्जने रंगविलेले चित्र.प्रावीण्यामुळे त्यांची ड्रेझ्डेनजवळील नॉथनिट्झ शहरातील ग्रंथालयाचे कार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आली (१७४८) या ठिकाणी काम करीत असताना (१७४८-५४) त्यांचा ॲडम फ्रीड्रिख ओझर (१७१७-९९) या जर्मन चित्रकाराशी परिचय झाला आणि त्यांना अभिजात ग्रीक संस्कृतीविषयी विस्तृत माहितीही मिळविता आली. ओझरच्या सान्निध्यात त्यांनी चित्रकलेचाही विशेष अभ्यास केला. त्यामुळे इटालियन कलाकारांशी त्यांचा निकटचा संबंध आला. पुढे ते रोमन कॅथलिक चर्चचे अनुयायी झाले (१७५४). त्यांची ‘डोमेनीको कार्डिनल पॅशनेई’ ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि पुढील वर्षीच ते रोम येथे रहावयास गेले. रोममध्ये प्रसिद्ध जर्मन चित्रकार आंटोन मेंग्ज (१७२८-७९) आणि प्राचीन वस्तूंचा संग्राहक व इटालियन धर्मगुरू आलेस्सांद्रो ऑल्बानी (१६९२-१७७९) यांच्याशी विंकलमान यांचा परिचय झाला. त्यानंतर पोपच्या संग्रहातील प्राचीन अवशेष विभागाचे अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली (१७६३). इटलीतील मुक्कामात त्यांनी नेपल्समधील उत्खननांचे निरीक्षण केले (१७५८-६२) व लेटर अबाउट द हर्क्यूलॅनिअम डिस्कव्हरीज (१७६२) व रिपोर्ट अबाउट द लेटेस्ट हर्क्यूलॅनिअम डिस्कव्हरीज (१७६४) हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले. यामुळे ⇨पाँपेई व ⇨हर्क्यूलॅनिअम येथील उत्खननांची माहिती सर्वत्र प्रसृत झाली. विंकलमान यांनी विविध कलावस्तूंची वर्णने लिहून ठेवली व त्यांचे गुणात्मक मूल्यमापनही केले. त्याचीही परिणती म्हणजे Geschichte der Kunst des Altertums (१७६४, इं.शी. ‘हिस्टरी ऑफ द आर्ट ऑफ अँटिक्विटी’) हा ग्रंथ होय. यामुळे विंकलमान यांची यूरोपभर ख्याती झाली. त्यांची कलासमीक्षा, कलाविषयक दृष्टिकोन आणि ऐतिहासिक साधनांचे ज्ञान या गोष्टी या ग्रंथाद्वारा स्पष्ट होतात. विंकलमान यांनी केलेल्या संग्रहालयातील अभ्यासपूर्ण सूचीवरून त्यांच्या सूक्ष्म व विकित्सक बुद्धिमत्तेची कल्पना येते. विंकलमान यांनी ग्रीक पुराणे व दंतकथा यांचा आधार घेऊन ग्री मूर्तिशिल्पे आणि त्यांची उपलब्ध वर्णने यांचा अर्थ लावून तसेच कालक्रमाची संगती स्पष्ट करून, या सर्वांचा अन्वयार्थ लावून दाखविणारा Monumenti anrichi inediti (इं.शी. अनपब्लिश्ड एन्शन्ट मॉन्युमेंट्‌स) हा द्विखंडीय ग्रंथ १७६७ मध्ये प्रसिद्ध केला व तो आलेस्सांद्रो ऑल्बानीला अर्पण केला. पुरातत्त्वीय कलावशेषांचा अभ्यास कसा करावा, याचे मार्गदर्शन करणारा हा आद्य ग्रंथ ठरला.

आधुनिक शास्त्रीय पुरातत्त्वविद्येचे विंकलमान हे प्रणेते मानण्यात येतात. उत्खनित शिल्पांची सापेक्ष प्राचीनता ठरविण्यो पहिले तंत्र त्यांनी विकसित केले. त्यांचा दृष्टिकोन तात्विक होता आणि अभिजात ग्रीक कला हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते. त्यांनी विविध कलाप्रकार आणि त्यांच्या शैली यांच्या व्यासंगावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांच्या लिखाणातून त्यांची काव्यात्म प्रवृत्ती आणि रसिकता यांची साक्ष वाचकाला पटते. अठराव्या शतकात नव-अभिजाततावादी कला संप्रदायास उत्तेजन देण्यास विंकलमान यांचे ग्रंथ साधनभूत ठरले आहेत. जर्मनीमध्ये त्यांना यथार्थपणे अभिजात पुरातत्त्वविद्येचे जनक मानण्यात येते.

विंकलमान यांचे बहुतेक लेखन जर्मन भाषेतच आहे आणि इटलीला गेल्यानंतरही त्यांनी जर्मनीबरोबरचे आपले ऋणानुबंध कायम राखले. १७६५ मध्ये बर्लिन येथील ‘फ्रीड्रिख द ग्रेट’ ग्रंथालयात त्यांची ग्रंथपाल म्हणून जवळजवळ नियुक्ती झाली होती तथापि इटलीत त्यांचा मुक्काम वाढला. इटलीतून परतीच्या प्रवासात रेगेन्झबर्ग येथे थांबून पुढे ते व्हिएन्नाला गेले. तेथे सम्राज्ञी माराया टेरिसाने त्यांना सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला. तेथून ते ट्रीएस्ट येथे ८ जून १७६८ मध्ये गेले. त्या ठिकाणी पूर्वी गुन्हेगार म्हणून शिक्षा झालेल्या एका आचाऱ्याने त्यांना लुबाडले आणि त्यांचा खून केला. चिकित्सक बुद्धी, काव्यात्म रसिकता आणि नेटक्या शब्दांचा वापर यांमुळे विंकलमान यांचे लेखन चिरंजीव ठरले आहे.

संदर्भ : 1. Daniel, Glyn, A Hundred and Fifty Years of Archaeology, London, 1975.

                2. Hatfield H. C. Aesthetic Paganism in German Literature from Winckelmann to the Death of     Goethe, Cambridge, 1964.

               3. Hatfield, H. C. Winckelmann and His German Critics:1755-1781, New York, 1943.

               4. Leppmann, Wolfgang, Winckelmann, New York, 1970.

देव, शां. भा.