बुर्झा होम : काश्मीरमधील नवाश्मयुगीन अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ. श्रीनगर जिल्ह्यात श्रीनगरच्या पूर्वेस सु.

नवाश्मयुगीन गर्तावास, बुर्झाहोम, काश्मीर.

२४ किमी. वर ते वसले आहे. लोकसंख्या सु. ६,००० (१९६१). याठिकाणी प्रथम येल व केंब्रिज विद्यापीठातील डी. टेरा आणि टी. टी. पॅटर्सन यांनी नमुना खड्डा खोदून १९३५ मध्ये प्राचीन अवशेषांची चाचणी घेतली. त्यावेळी त्यांना मातीची अनेक प्रकारची उदा. घडा, हंडा, कांगरी, इ. भांडी मिळाली. त्यानंतर केंद्रीय पुरातत्त्वविभागातर्फे या स्थळी १९६० सालापासून पुढे झालेल्या (१९६१-६३१९६५-६६व १९७१-७२) उत्खननांत प्रामुख्याने नवाश्मयुगीन, महाश्मयुगीन व प्राचीन ऐतिहासिक काळातील वस्त्यांचा पुरावा मिळाला. नवाश्मयुगाच्या पूर्व खंडात येथील रहिवासी जमीनीत खड्डे खोदून त्यात रहात असत. हे खड्डे बुडाशी विस्तृत व वर निमुळते होत गेलेले असून त्यात आत उतरण्यास पायऱ्यांची सोय असे आणि वर बांबूचे छप्पर असावे, असा तज्ञांचा कयास आहे. हाताने बनविलेली करड्या मातीची भांडी त्यावेळी वापरात होती.त्याचप्रमाणे घासून गुळगुळीत केलेली व धारदार टोकाची दगडी हत्यारे व हाडांची अस्त्रेही प्रचलित होती. याच कालखंडाच्या उत्तरार्धात मातीच्या विटांच्या वास्तू लोक हळू हळू बांधू लागल्याचा पुरावा मिळतो. हे लोक दगडी व हाडांच्या हत्यारांशिवाय उत्कृष्ट काळी खापरे बनवीत. मृत मानव व जनावरे व्यवस्थितपणे पुरीत. महाश्मयुगीन रहिवासी मृतांच्या दफनावर अश्मवर्तुळ तयार करी. तो तांबडी खापरे वापरी आणि दगडांची हाडांची अस्त्रे तयार करीत असे. दक्षिण भारतातील महाश्मयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण काळी-तांबडी खापरे बुर्झाहोम येथे सापडली नाहीत. नवाश्मयुगीन वस्तीचा कालखंड कार्बन-१४ पद्धतीनुसार इ.स.पू. दुसरे सहस्त्रक असा निश्चित करता आला आहे.

संदर्भ : Sanklia. H.D. The Prehistory and Protohistory of India and Pakistan, Poona, 1971.

 

देव, शां. भा.