उत्खनित मानव-सांगाडा, दायमाबाद (महाराष्ट्र).

दायमाबाद: महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगरच्या उत्तरेस सु. ६० किमी. व श्रीरामपूरच्या दक्षिणेस सु. १५ किमी. वर प्रवरा नदीकाठी वसले आहे.

ताम्रपाषाणयुगीन अवशेषांकरिता येथील एक टेकाड प्रसिद्ध असून ६ मी. उंचीच्या या टेकाडात तीन भिन्न कालखंडांचे अवशेष सापडले. पहिल्या कालखंडात कर्नाटकातील ब्रह्मगिरी येथील मृत्पात्रांशी साम्य दर्शविणारी जाड करड्या रंगाची मातीची भांडी वापरात होती, असे आढळून आले. याच काळातील एका जाड रांजणावर पळणाऱ्या वाघांच्या आणि हरिणांच्या आकृत्या वैशिष्ट्यपूर्ण रीतीने रेखाटल्या आहेत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे लालसर रंगाची असून त्यांवर काळ्या रंगाने नक्षीकाम केले आहे. भूमितिजन्य प्रतीकांबरोबर यांवर वेलपत्या व क्वचित प्राणीही रेखाटले आहेत. ही मृत्पात्रे पहिल्या कालखंडापेक्षा पातळ आहेत. तिसऱ्या व शेवटच्या कालखंडांतील मृत्पात्रे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन वैशिष्ट्य असणाऱ्या जोर्वेवर्गातील असून पातळ भिंती, आकार, नक्षीकाम या सर्वांतच हे साम्य आहे. या तिन्ही कालखंडात घासलेल्या दगडी कुऱ्हाडी व छिलक्यांची (पाती) हत्यारे असली, तरी शेवटच्या कालखंडात गारगोटीची पाती जास्त आढळतात. दुसऱ्या कालखंडात तांब्याची कुऱ्हाडही मिळाली. याच काळातील शवघटकही मिळाले असून घटांच्या जमिनी चोपून, सारवून तयार केलेल्या आहेत. त्यांवर चुन्याचे सारवण घालीत. घरे गोल अथवा चौकोनी आखणीची होती. इतर अवशेषांत मातीच्या स्त्रीमूर्ती व बैल–कुत्रे यांच्या मूर्ती (खेळणी) या उल्लेखनीय आहेत. तिसऱ्या कालखंडात नदीच्या बाजूला उभारण्यात आलेला मातीचुन्याचा बांध हा इतरत्र आढळत नाही. इ. स. पू. पंधराशेपासून जवळपास एक हजार वर्षे यांदरम्यान येथे वस्ती होती. अगदी अलीकडे येथे तांब्याचा हत्ती, रथ अशा काही मूर्ती मिळाल्या आहेत. त्याही ताम्रपाषाणयुगीनच असाव्यात, असे काही अभ्यासक मानतात.

माटे, म. श्री.