दुसर्‍या रॅमसीझची (इ.स.पू. तेरावे शतक) ममी, ईजिप्त.

ममी : प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीमधील मृत व्यक्तीच्या शारीरिक सांगाड्याच्या जतनाची एक विलक्षण पद्धती. मानवी शरीर मृत्यूनंतरही अविकृत राहावे, या हेतूने विशिष्ट रासायनिक प्रक्रियेद्वारा जतन केलेल्या मृत शरीराला ‘ममी’ ही पुरातत्त्वज्ञांनी संज्ञा दिली आहे. मृताचे शरीर संरक्षित करण्यासाठी शिलाजीत (बिटूमेन) वापरीत अशी समजूत होती. शिलाजीतवाचक ‘मोमियाई’ या अरबी शब्दापासून ‘ममी’ असा शब्द रूढ झाला. ममी तयार करताना मृताचा मेंदू सळईने नाकपुडीतून कोरून बाहेर काढला जाई. त्यांनंतर शरीरांतर्गत अवयव पोकळ कलेवरात बहुधा सोडा भरून सर्व शरीर द्रवरहित करीत पुढे त्यावर राळेचा लेप देऊन आवरणे बांधीत आणि मुखावर मुखवटा ठेवीत. माणसांप्रमाणे काही पवित्र जनावरांची शरीरही ममी बनवीत असत. प्राचीन ईजिप्तमधील पहिल्या आणि दुसर्‍या राजवंशाच्या काळी विशेषत: इ. स. पू. २६०० पासून ती प्रसृत झाली असावी. पुढे ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतरही ती इ. स. चौथ्या शतकात ईजिप्तमध्ये प्रचारात होती. यावेळी मृत शरीरावर एक प्रकारच्या डिंकामध्ये कापड भिजवून ते अशा तर्‍हेने गुंडाळत की आतील शरीर जरी आकसले, तरी वरच्या वेष्टनाचा आकार त्या मृताच्या शरीराप्रमाणे राहावा. यावरून नंतरच्या काळातील पद्धतशीर ममीकरणाचे तंत्र विकसित झाले असावे. ममीच्या शोधामुळे ईजिप्तमधील संस्कृतीसंबंधी विशेषत: तत्कालीन नित्यनैमित्तिक वस्तूंच्या वापरासंबंधी तपशीलावर माहिती उपलब्ध झाली.

ममीच्या प्रक्रियेविषयी ईजिप्तमधील प्राचीन साहित्यात काहीच उल्लेख मिळत नाहीत; तथापि हीरॉडोटस आणि डायोडोरस सिक्युलस या लेखकांनी त्यांना उपलब्ध झालेली माहिती दिली आहे. ती साक्षेपी संशोधन आणि रासायनिक विश्लेषण यांच्या मदतीने पडताळून पाहण्याच्या प्रयत्नांतून तत्संबंधी शास्त्रीय माहिती मिळेल.

संदर्भ : 1. Budge, E. A. Mummies, New York, 1972.

2. Smith, G. E.; Dawson, W. R. Egyptian Mummies, London, 1924.

देव, शां. भा.