राजसिंहासनाचा महाल, नॉसस.

नॉसस : ग्रीसच्या दक्षिणेस असलेल्या क्रीट बेटाच्या उत्तर किनाऱ्यावरील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. या ठिकाणी आर्थर एव्हान्झ याने १९००–१९३५ या काळात उत्खनन केले व या संस्कृतीला मिनोअन असे नाव दिले. नंतर व्हेन्ट्रिस, चॅडविक इ. संशोधकांनी येथील अवशेषांचे क्रमवार वर्गीकरण व लिपीचे वाचन केले. नॉससला पहिली वस्ती नवाश्मयुगात इ. स. पू. २५०० च्या सुमारास झाली. याला पूर्व- मिनोअम असे नाव एव्हान्झने दिले. नवाश्मयुग, ब्राँझयुग आणि लोहयुग या तिन्ही सांस्कृतिक कालखंडांचे विस्तृत अवशेष येथे मिळाले. इ. स. पू. २००० नंतरच्या संस्कृतीस त्याने मध्यमिनोअन हे नाव दिले. इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या सहस्रकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या पूर्व-मिनोअन काळात वास्तू, शिल्पे व उत्कीर्ण नक्षी असलेली रंगीत मृत्पात्रे मिळाली. मात्र त्यानंतरच्या मध्यमिनोअन काळातील थरांत सुप्रसिद्ध मिनॉसच्या राजप्रसादाचे अवशेष मिळाले. मिनॉसचा भव्य राजप्रसाद याच काळात बांधला गेला. त्याची लांबी सु. १२५ मी. व रुंदी सु. १४० मी. होती आणि मधला चौक २७ मी. रुंद व ५५ मी. लांब होता. याच्या भोवती निरनिराळी दालने होती. यातील दरबार सभागृह व स्वागत खोली प्रशस्त असून पश्चिमेकडील बाजूस अनेक गर्भगृहे होती. पूर्वेकडील बाजूस तीन मजल्यांत निवासासाठी खोल्या व दालने होती. या राजप्रासादाची भूकंपामध्ये दोनदा नासधूस झाली. दुसरा भूकंप इ. स. पू. १४५० च्या सुमारास झाला आसावा. याशिवाय प्रासादात अनेक चौक, खोल्या व स्नानगृहे होती. प्रासाद व इतर घरे कलाकुसरीने सुशोभित केलेली होती. घराच्या जमिनी फरसबंद असून जमिनीखाली पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा, म्हणून गटारे बांधलेली होती. राजप्रासादातून आणि इतर घरांतून भिंतींवर विविध प्रकारची भित्तिचित्रे रंगविलेली होती. मृत्पात्रांवरही उत्कृष्ट चित्रकाम केलेले होते. भिंतीवरील चित्रकामात पक्षी, प्राणी व विविध वनस्पती असून व्यक्तींची चित्रेही भरपूर आहेत. त्या चित्रांत त्यांचे खेळ, कपडे व वेशभूषा, यांचे दर्शन घडते. बैलांवरील कसरत तसेच मिरवणूक व राजपुरोहिताची कृत्ये किंवा नागदेवतांची पूजा अशाप्रकारची चित्रे यात अनेक आहेत. मृत्पात्रांवरील अभिकल्पांत फुलांचे चित्रण अप्रतिम आहे. याशिवाय नॉससला शेकड्याने मृण्मुद्रा आढळल्या. यांवर लेख उत्कीर्ण केलेले असून हे लेख लिनिअर ए व लिनिअर बी लिप्यांत लिहिलेले आहेत.

नॉससचे वैभव इ. स. पू. १५५० ते इ. स. पू. १४०० मध्ये शिखराला पोहोचले होते. मृत्स्नाशिल्प व चित्रकला ह्या बाबतींत नॉसस हे प्राचीन संस्कृतींत सर्वश्रेष्ठ मानले जाते. या काळातील असंख्य अवशेष कलेची समृद्धी दर्शवितात, तसेच तत्कालीन लोकांचे धार्मिकव सामाजिक जीवन दिग्दर्शित करतात. मायकेल व्हेन्ट्रिस या भाषातज्ञाने १९५२ मध्ये येथील मुद्रांवरील लिप्यांचे वाचन केले. त्यावरून या लोकांची भाषा प्राचीन ग्रीक आहे, हे ज्ञात झाले. लोहयुगात नॉससचे महत्त्व कमी झाले आणि इ. स. पू. १४०० च्या सुमारास राजप्रासाद भस्मसात झाला. मिनोअन संस्कृती नष्ट झाली आणि ग्रीक कला आणि जीवनाची त्यावर छाप पडली.

पहा : इजीअन संस्कृति.

देव, शां. भा.