गीझा : ईजिप्तमधील प्राचीन अवशेषांचे प्रसिद्ध स्थळ. ते कैरोच्या नैर्ऋत्येस सु. ५ किमी.वर नाईल नदीच्या पश्चिम तीरावर वसले आहे. लोकसंख्या २,५०,००० (१९६०). कैरोशी ते अनेक लहानमोठ्या पुलांनी जोडले आहे. कैरोचे उपनगर म्हणूनच ते आजकाल ओळखले जाते. कापड, कातडी, चित्रपट वगैरे महत्त्वाचे उद्योगधंदे तसेच सिगारेटचा एक मोठा कारखाना तेथे आहे. तेथील वनस्पति-उद्यान, प्राणिसंग्रहालय तसेच धान्याची बाजारपेठ प्रसिद्ध असून कैरो विद्यापीठाचे ते केंद्र आहे.  गीझा शहराच्या पश्चिमेस सु. ८ किमी.वर सर्वांत प्राचीन असे तीन ⇨ पिरॅमिड  व एक भव्य ⇨ स्फिंक्स आहे. कीऑप्स (कूफू) राजाच्या पिरॅमिड समोरील प्रचंड स्फिंक्स त्यांचा काल सु. इ.स.पू. २६०० मानण्यात येतो. पिरॅमिडमधील कूफूचा पिरॅमिड समतोल रचनाकौशल्याबद्दल व निर्दोष बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. त्यात शवागाराखेरीज अनेक दालने आहेत. त्याचा अंतर्भाव जगातील सात आश्चर्यांत होतो. उरलेल्या कॅफ्रे व मेंकूरे या राजांच्या पिरॅमिडांमध्ये कामगारांसाठी बांधलेल्या खोल्या असून त्यांत सु. ४,००० कामगार राहू शकतील एवढी जागा आहे. कॅफ्रेचा पिरॅमिड ग्रॅनाइट दगडात बांधलेला आहे, तर मेंकूरेचा तांबड्या दगडात बांधला आहे. दोन्हीही पिरॅमिड कूफूपेक्षा लहान आहेत. तिन्ही पिरॅमिडांमध्ये अश्मपेटिका सापडल्या असून त्या ग्रॅनाइट दगडाच्या बनविलेल्या आहेत. त्यांपैकी आलंकारिक नक्षी कोरलेली एक अश्मपेटी १८३८ मध्ये समुद्रात पडून नष्ट झाली. येथील स्फिंक्सची आकृती जणू काही नाईल खोऱ्याच्या मुखाचे संरक्षण करीत आहे, असे वाटते. हा रुबाबदार मानवशीर्षधारी सिंहकाय ५८ मी. लांब व २० मी. उंच असून तो एकसंध खडकात खोदला आहे. अर्वाचीन व प्राचीन वास्तुविशेषांना नटलेले हे शहर जागतिक पर्यटनाचे केंद्र बनले आहे.  देव, शां. भा.”