अलंकृत लाकडी पळी, इ. स. पू. सु. १४ वे शतक.फायूम : ईजिप्तमधील नवाश्मयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश. कैरोच्या पश्चिमेस लिबियन वाळवंटात तो पसरला आहे. क्षेत्रफळ सु. १,८५० चौ. किमी. लोकसंख्या १०,०८,००० (अंदाजे १९७१). समुद्रसपाटीखाली ४५ मीटर हा प्रदेश असल्यामुळे त्यास भौगोलिक दृष्ट्याही आगळे महत्त्व आहे. राजधानी एल्-फायूम ही कैरोच्या नैर्ऋत्येस सु. १८० किमी.वर वसली आहे. लोकसंख्या १,५४,८०० (१९७१). बिर्कत करून (प्राचीन मीरिस) हे सरोवर व बाहर यूसुफ हा कालवा यांमुळे हा प्रदेश सुपीक झाला आहे. येथील कालवा इ. स. पू. १७०० मध्येच खोदण्यात आला. एल्-फायूम येथे सूतगिरण्या, कातडी कमविण्याचे कारखाने यांसारखे उद्योगधंदे आहेत. याशिवाय या प्रदेशात मच्छीमारी, मेंढपाळ हे महत्त्वाचे धंदे असून कडधान्ये, फळे, ऊस कापूस इ. पिके होतात.

राजाचा अर्धपुतळा, इ.स.पू.सु. १९ वे शतक.प्राचीन काळी फायूमला ईजिप्तची बाग समजत. क्रॉकडाइल या देवतेवरून पडलेले क्रोकोडिलोपोलिस हे त्याचे प्राचीन नाव. दुसरा टॉलेमी फिलाडेल्फस (इ. स. पू. ३०८-२४६) याने त्यास आर्सिनोई हे आपल्या पत्नीचे नाव दिले. मेदीनेत एल्-फायूम या अरबी नावावरून पुढे फायूम हे नाव रूढ झाले असावे. ईजिप्त संस्कृतीमधील सर्वात प्राचीन अवशेषांचा हा प्रदेश नैसर्गिक रीत्या बनलेल्या सरोवरांचा (मरूद्यान) असून सरोवरांकाठी नवाश्मयुगात मोठ्या प्रमाणात शेती व शिकार करणाऱ्या लोकांची वस्ती होती. ऑक्सफर्ड विद्यापीठातील ईजिप्तविद्येचे प्राध्यापक एम्. चेर्नी यांना येथील उत्खननात कामगारांचे एक खेडे आढळले (१९७२). हे लोक गोपालक असून गहू व बार्ली ही धान्ये पिकवीत. येथील उत्खननात धनुष्यबाण, हाडांचे गळ व दगडी बाणाग्रे आढळली आहेत. लाकडाच्या सरळ दांड्यात एक खाच करून त्यात सरळ एकापुढे एक धारदार दगडी छिलके बसवून हे लोक धान्यकापणीसाठी विळे तयार करीत. कापलेले धान्य जमिनीत खड्डे (वळद) करून त्यांत साठविले जाई. धान्य किडू नये म्हणून खड्ड्यांत गवती चटया आंथरत. दगडी पाट्याचाही ते वापर करीत. जमिनीची नांगरट लाकडी दांड्यावर वजनदार दगडी कडे ठेऊन त्या दांड्यावर जोर देऊन करीत असत, असे दिसते. कुऱ्हाडी, मातीची भांडी, वेताच्या करंड्या, शहामृगाच्या अंड्याच्या टरफलापासून केलेले मणी आणि बहुधा, पातळ कातड्याचे कपडे इत्यादींचा वापर या लोकांत रूढ होता.याशिवाय सुती वस्त्र निर्मितीचेही तंत्र त्यांना अवगत होते, असे दिसते.

नवाश्मयुगानंतरही ईजिप्शयन संस्कृतीच्या राजवंशपूर्व काळात फायूमला वस्ती होती आणि त्या काळी जमिनीच्या भरणीचे काम मोठ्या प्रमाणावर झाले.१२व्या राजवंशाच्या काळात (इ. स. पू. २०००-१७७७) या प्रदेशात हावार, एल्-लॅहून व माझकून येथे पिरॅमिड बांधण्यात आले. त्यांपैकी आमेनेमहेत (इ. स. पू. १८४२ -१७९७) राजाचे पिरॅमिड प्रसिद्ध आहे. ग्रीक इतिहासकार हीरॉडोटसने ‘लॅबरिंथ’ या मंदिराच्या सौंदर्यांचे विशेषत्वाने कौतुक केले आहे. ग्रीकांनी पार्थनॉनबरोबर जगातील सात आश्चर्यांत त्याचाही समावेश केला होता. खाणकामामुळे येथील अवशेष नष्ट झाले. इ. स. तिसऱ्या शतकात ज्यू लोकांनी येथे वस्ती केल्याचा पुरावा मिळतो. अरबांनी इ. स. ६४० मध्ये हा प्रदेश ताब्यात घेतला. प्राचीन ईजिप्त संस्कृतीच्या दृष्टीने फायूम या पुरानगरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

संदर्भ : 1. Grenfell, B. P. Faiyum Towns and Their Papyri. 1972.

2. Woldering. Irmgard Egypt : The Art of the Pharaohs, London, 1967.

देव, शां. भा.