उत्खनित मूर्तिशिल्प, पौनी.

पौनी : महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील नागपूरच्या आग्नेयीस सु. ८० किमी. अंतरावर वैनगंगा नदीच्या उजव्या काठी वसलेले प्राचीन स्थळ. १९८७ साली हेन्‍री कझिन्स यांनी या स्थळाचा शोध लावला. त्यानंतर १९३८ साली हे स्थल संरक्षित करण्यात आले व १९६९—७० साली येथे भारतीय पुरातत्त्व खाते व नागपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे उत्खनन केले. त्या आधी पौनी येथे क्षत्रप रुपिअम्म याचा लेख व वाकाटक दुसरा प्रवरसेन याचा ताम्रपट उपलब्ध झाला होता. प्रत्यक्ष उत्खननात जगन्नाथनामक टेकडीभागात एका प्रचंड स्तूपाचे अवशेष उपलब्ध झाले. या स्तूपाचा व्यास ४१·२ मी. असून त्याचा घुमट विटांत पेटिकापद्धतीने बांधल्याचे आढळले. या स्तूपाभोवती ६ मी. रुंदीचा फरशांनी आच्छादलेला प्रदक्षिणापथ होता व त्याच्या भोवती सांची-भारहुतपद्धतीचा दगडी कठडा वा वेदिका होती आणि चार दिशांना भव्य प्रवेशद्वार होती, असे आढळले. सांची येथील स्तूपापेक्षा या स्तूपाचा परिघ मोठा असून तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरलेली आहेत. या दगडी कठड्याच्या उभ्या खांबांवर भक्तांची, यक्षांची व नाग मुचुलिंदाची शिल्पे असून आडव्या सूचीवर प्रदानलेख आहेत. या स्तूपाचा काळ शुंगशैली, लेख व शिल्पे यांनुसार इ. स. पू. तिसरे-दुसरे शतक असा ठरतो. या जगन्नाथ टेकडीशेजारीच १·६२ किमी.वर दक्षिणेस दुसऱ्या एका स्तूपाचे अवशेष मिळाले. या स्तूपाची बांधणी ‘पायरी’ पद्धतीची असून याचा काळ इ. स. चे पहिले-दुसरे शतक असावा. प्राचीन काळी पौनी हे विदर्भातील हीनयान पंथाचे मोठे केंद्र होते व या केंद्राद्वारे दक्षिणेत बौद्ध धर्म व कला यांचा प्रसार झाला असावा, असे पौनीच्या उत्खननाने सूचित केले आहे.

संदर्भ : Deo, S. B. y3wuohi, J. P. Pauni Excavation, Nagpur, 1972.

देव, शां. भा.