लोहयुग: लोह या धातूची उपकरणे व शस्त्रास्त्रे जेव्हा प्रामुख्याने प्रचारात आली, त्या युगाला पुरातत्त्वविद्या विषयात लोहयुग ही संज्ञा देण्यात आली. मानवी विकासातील हा एक कालखंड असून मानवी संस्कृतीची उत्क्रांती अश्यमुग, ब्राँझयुग व लोहयुग या क्रमाने झाली, असे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे अधीक्षक, क्रिस्त्यान यूर्गेन्सन टॉमसन या तज्ञाने प्रतिपादिले होते मात्र ही उत्क्रांती जगभर टप्प्याटप्प्यांनी झाली. अर्थात या तिन्ही अवस्था सर्व प्रदेशांत एकाच वेळी आल्या असे मात्र नाही. आजही अश्मयुगीन जीवन जगणाऱ्या काही आदिम जमाती आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडांत आढळतात. हिटाइटांच्या अवनतीनंतर इ.स.पू. बाराव्या शतकात मध्यपूर्वेत लोह धातूने ब्राँझ धातूची जागा घेतली आणि पुढे हॉलस्टॅट (ऑस्ट्रिया) हे लोहवस्तू निर्मितीचे मोठे, केंद्र बनले.

धातूचा शोध आणि वापर ही मानवी सास्कृतिक जीवनातील क्रांतिकारक घटना असून त्यामुळे मानवाला हरतऱ्हेची शस्त्रे बनविणे शक्य झाले. ज्या जमातींना धातूंचा वापर ज्ञात झाला, त्यांनी साहजिकच आपले वर्चस्व सर्व क्षेत्रांत झपाट्याने प्रख्यपित केले. लोहयुगाची सुरुवात निरनिराळ्या भूप्रदेशांत भिन्न काळी झाली मात्र नैसर्गिक लोहाचा वापर आणि तयार केलेले लोह यांबद्दल सुरुवातीच्या काळात अज्ञान दिसून येते. उल्कापातात मिळणारे लोह हे त्यातील निकेलच्या  समृद्ध प्रमाणामुळे वस्तू बनविण्यास आणि एकूण घडणीस अधिक सुलभ जाई. अशा तऱ्हेचे नैसर्गिक लोह ईजिप्तमधील थडग्यांत त्याचप्रमाणे अर येथील सुमेरियन राजांच्या कबरींत आढळून आले. ही लोहाची प्राथमिक अवस्था होती. लोखंड शुद्ध करण्याची दुसरी अवस्था मेसोपोटेमियातील प्रदेशात दिसून येते. इ. स. पू. २५०० मध्ये तद्देशियांना लोह शुद्ध करण्याचे तंत्र अवगत झाले होते. याचा पुरावा उत्खननात आढळून आला आहे. इ. स. पू. १९०० च्या समुरास कुशी-लोह किंवा घडीव लोखंड वापरण्यात आल्याचा पुरावा मिळतो. त्यानंतर इ. स. पू. १५००-१००० दरम्यानच्या काळात लोखंडावर निरनिराळ्या प्रक्रिया करण्याचे तंत्र वापरात असल्याचे बहुविध पुरावे उपलब्ध झाले आहेत. लोखंड बनविण्याच्या सर्व प्रक्रियांत हिटाइट लोकांनी विलक्षण प्रगती केली होती. त्यांच्या काळात (इ. स. पू. १८००-१६००) आशिया मायनरमधील ओतशालांतून लोखंडाची निर्मिती होऊ लागली. तूतांखामेन (इ.स. पू. १३६६-१३५२) याच्या थडम्यात काही लोखंडी वस्तू मिळाल्या. त्या हिटाइट राजांनीच दिलेल्या असाव्यात. कदाचित त्यामुळेच हिटाइट सर्व बाबतींत ईजिप्शियन राजांना वरचढ ठरले. या अवस्था त्यांना ज्ञात असूनही मध्यपूर्वेत लोखंडाची प्राचीनता इ. स. पू. तिसऱ्या सहस्राइतकी प्राचीन असली, तरीसुद्धा लोखंडाच्या सर्वतांत्रिक बाबींचे ज्ञान इ. स. पू. ६०० पर्यंत बारीकसारीक तपशिलांसह पूर्णपणे ज्ञात झालेले नव्हते, हे अलीकडे झालेल्या उत्खननांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे  या सुमारास अथवा त्याआधी थोडे दिवस लोहयुगास सुरुवात झाली असावी, असे सर्वसाधारणतः मानले जाते. मध्य यूरोपात लोह जरी इ. स. पू. १८०० च्या सुमारास वापरात होते, तरी लोहयुगाची खरी सुरुवात त्यानंतरच झाली. चीनमध्ये इ. स. पू. चौथ्या  शतकापर्यंत लोखंड ओतणे किंवा घडविणे या क्रिया ज्ञात नव्हत्या.

भारतात लोखंडाच्या प्राचीनतेबद्दल विद्वानांत भिन्न मते असून भारतीयांना इ, स. पू. चौथ्या शतकापूर्वी लोखंडाचा वापर माहीत नव्हता, असे मत विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्रचलित होते. ऋग्वेदात जरी अयस् हा लोहधातूविषयी शब्द आला असला, तरी त्याच्या अर्थाबद्दल दुमत होते. संस्क़ृतमध्ये मुंड या शब्दाचा अर्थ लोह असाही होतो. भारतात मुंड जमातीची वस्ती होती आणि या लोकांत लोहाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मुंड म्हणजे लोह असा अर्थ प्रचलित झाला असावा. यावरून मुंड हे लोहाशी किती तादात्म्य पावले होते, याची कल्पना येते. लोहाला मुंडायसम् व मुंडलोहम् ही नामेही आहेत तथापि निरनिराळ्या ठिकाणी यापूर्वी झालेल्या उत्खननांत लोखंडाविषयी मिळालेला पुरावा इ. स. पू. चौथ्या शतकाच्या आधीच्या थरात मिळाला नाही. त्यानंतर अलीकडे झालेल्या उज्जैन व हस्तिनापूर येथील उत्खननांत लोखंडाची प्राचीनता दर्शविणारा ठोस पुरावा उपलब्ध झाला आहे. हस्तिनापूर येथील उत्खननात इ. स. पू. ११०० ते ८०० या काळातील अवशेषांच्या वरवरच्या स्तरांत लोखंड मिळाले तर उज्जैन येथे भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागातर्फे इ. स. १९५५-५८ दरम्यान विस्तृत प्रमाणात उत्खनने झाली. त्यांत इतर वस्तूंबरोबर  लोखंडी हत्यारे आणि कच्चे लोखंड मोठ्या प्रमाणावर आढळले. त्यावरून इ. स. पू. सहाव्या शतकात लोखंडाचा वापर होता, हे सिद्ध झाले आणि पूर्वीच्या मतात बदल झाला. साहजिकच भारतात इ. स. पू. ८०० किंवा त्या आधीही लोखंडाचा वापर असावा, असे पुरातत्त्वेवेत्त्यांचे मत झाले. ऋग्वेदातील अयस् शब्दाचा वापर आणि उत्खननात लोखंडाच्या वापराची प्राचीनता दर्शविणारा पुरावा या दोन्हींवरून भारतात आर्यांनी लोखंडाचा वापर सुरू केला असावा, हे मत आता मांडले जाते.

लोहयुगाची सुरुवात निरनिराळ्या देशांत भिन्न काळी झाली परंतु ज्या प्रदेशात त्याचा वापर सुरू झाला, तेथील मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडून विकास झाल्याचे दिसते. तांब्यापेक्षा लोखंडाची उपलब्धी विपुल प्रमाणात असून त्याच्या शुद्धीकरणाचा खर्चही कमी असल्याने लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊन हरतऱ्हेची शेतीची अवजारे व आयुधे बनविण्यात मानवाला सहज रीत्या यश प्राप्त झाले. परिणामतः आर्थिक स्थिती सुधारण्यास या युगाची मदत होऊन लोखंडाचा वापर करणारा समाज अधिक सुस्थिर बनला.

पहा : महाश्मयुगीन संस्कृति.

संदर्भ : 1. Arbman, Helger, Ancient Peoples and Places, London, 1961.

           2. Banerjee, N. R., The Iron Age in India, Delhi, 1965.

           3. Chakravarti, D. K. The issues of the Indian Iron  Age, New Delhi, 1983.

           4. Klindt-Jensen. O. Ancient Peoples and Places, New York. 1957.

 

देव, शां. भा.