झां फ्रान्स्वा शांपॉल्याँशांपॉल्याँ, झां फ्रान्स्वा : (२२ डिसेंबर, १७९० – ४ मार्च,१८३२). फ्रेंच पुरातत्त्वज्ञ. ईजिप्तमध्ये मिळालेल्या त्रैभाषिक रोझेटा शिलालेखाचे वाचन करून ईजिप्तच्या प्राचीन इतिहासाचे दालन त्याने खुले केले. जन्म फ्रान्समधील फीझाक येथे. परिसच्या कॉलेज द फ्रान्समधून उच्च शिक्षण. ग्रीक व लॅटिन भाषांबरोबरच त्याने अनेक प्राच्यभाषांचाही अभ्यास सिल्व्हेस्ट्र द सासी या प्राच्यविद्या पंडिताच्या मार्गदर्शनाखाली घरीच केला. ग्रनॉबल अकादमीपुढे त्याने कॉप्टिक ही ईजिप्तची प्राचीन भाषा आहे, अशा आशयाचा शोधनिबंध वाचला. त्यानंतर त्याने ईजिप्त अंडर द फेअरोज : द रिलिजन अँड हिस्ट्री ऑफ ईजिप्त जिऑग्रफी ऑफ ईजिप्त  या ग्रंथांचा पहिला भाग प्रसिद्ध केला (१८०९). त्याची ग्रनॉबल येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याला अठरावा लूई आणि नंतर नववा चार्ल्स या फ्रेंच राजांचा आश्रय होता.

प्रथमपासून त्याला ईजिप्तचे विलक्षण आकर्षण होते. ईजिप्तमधील नाईल नदीकाठच्या रोझेटा येथील शिलालेखाच्या शोधाने ईजिप्तविषयक संशोधनाचे दालनच खुले झाले. या शिळेवर वरून खाली एकच मजकूर हायरोग्लिफिक, डेमॉटिक आणि ग्रीक या तीन स्वतंत्र लिप्यांत कोरलेला आहे. शांपॉल्याँने त्यातील हायरोग्लिफिक पाठाचे १८२४ मध्ये भाषांतर केले आणि ती लिपी केवळ चित्रमय नसून तीत काही वर्णाक्षरे आहेत हे दर्शविले. त्याच्या प्रेसी द सिस्टेम हायरोग्लिफिक (१८२४) या पुस्तकात व्याकरण व अन्य काही स्पष्टीकरणे यांचे तपशील आढळतात. त्याच्या संशोधनामुळे हायरोग्लिफिक लिपीचे वाचन सुलभ झाले. या लिपीच्या अक्षर व टिकांच्या स्वरूपाबद्दल त्याने निश्चित सिद्धांत मांडून तिच्यात काही चिन्हे, ध्वनिचिन्हे व काही अर्थचिन्हे आहेत, हे निदर्शनास आणले. त्यामुळे ईजिप्तविद्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासास चालना मिळली. यानंतर त्याने इटलीमध्ये जाऊन तूरिन वस्तुसंग्रहालयातील प्राचीन ⇨ पपायरसावरील लेखनाचा अभ्यास केला (१८२४). त्यात ईजिप्तमधील इ.स.पू. १२५० मधील फेअरो राजांची यादी त्यास आढळली. त्यानंतर त्यास फ्रान्समधील पॅरिस येथील लूव्हर वस्तुसंग्रहालयात प्राचीन ईजिप्शियन वस्तुसंग्रहाचा अभिरक्षक नेमण्यात आले. १८२८–२९ या काळात त्याने ईजिप्तमध्ये पुरातत्त्वीय अवशेषांच्या शोधार्थ एक संशोधक पथक नेले. त्याच साली त्याच्यासाठी पॅरिसमधील कॉलेज द फ्रान्स या संस्थेत एक अध्यासन निर्माण करण्यात आले आणि ईजिप्तविद्येचा तो प्रमुख झाला (१८२९). त्यानंतर केवळ तीन वर्षांनी पॅरिसमध्ये तो मरण पावला. शांपॉल्याँ-फीझाक या त्याच्या भावाने ईजिप्शियन व्याकरण   आणि हायरोग्लिफिक शब्दकोश  हे त्याचे दोन ग्रंथ (म.शी.) त्याच्या मरणोत्तर प्रसिद्ध केले (१८४१–१८४४). याशिवाय त्याचा मॉन्युमेंट्स द ला ईजिप्त एट द ला न्यूबी  (चार खंड १८३५–४७) हा बृहत्‌ग्रंथही प्रकाशित करण्यात आला.

पहा : ईजिप्त संस्कृति ग्रीक लिपी रोझेटा शिलालेख हायरोग्लिफिक लिपी.    

संदर्भ : 1. Ceram, C.W.Ed. The World of Archaeology : The Pioneers Tell Their Own Story, London, 1966.

            2. Dawson, Warren R. Who Was Who in Egyptology, London, 1974.

            3. Doblhofer, Ernst, Voices in Stone  : The Decipherment of Ancient Scripts and Writings, New York, 1961.                        

देव, शां. भा.