तूतांखामेनचे थडगे, थब्झि : पार्श्वभागी सहाव्या रॅमसीझच्या थडग्याचे प्रवेशद्वार.

थीब्झ : ईजिप्तमधील एक प्रसिद्ध प्राचीन शहर. त्याचे अवशेष नाईल नदीच्या काठी, कैरोच्या आग्‍नेयीस सु. ५७० किमी. वर आढळतात. याच्या जवळच्या कारनॅक आणि लक्सॉर येथेही प्राचीन वास्तू अवशेष आहेत. थीब्झ ही ईजिप्तच्या अकराव्या राजवंशाची राजधानी होती. मात्र नगरीची भरभराट सतराव्या व एकोणिसाव्या वंशांच्या काळात झाली. टॉलेमींच्या कारकीर्दीपर्यंत तेथील वास्तूंत भर पडत होती. नगराची मुख्य वस्ती ॲमन मंदिराभोवती होती. या मंदिराखेरीज येथे दुसरा रॅमसीझ याचे मंडप, हॅटशेपसूट व थटमोझ यांचे सूर्यस्तंभ (ऑबेलिस्क) आणि राजघराण्यांतील व्यक्तींची व सरदार दरकदारांची थडगी हे अवशेष उल्लेखनीय आहेत. यांतील तूतांखामेनचे थडगे जगप्रसिद्ध आहे. या थडग्यात एकूण चार खोल्या असून त्यांत तीन शवपेटिका सापडल्या. यांत विविध वस्तू होत्या. त्यांपैकी तूतांखामेनचा रथ, शस्त्रे, रत्‍नजडित फर्निचर, कपडे, करंडे इ. वस्तू लक्षणीय आहेत. त्यांशिवाय तूतांखामेनची सोन्याची ममी व राजाराणी यांचे एक चित्र सिंहासनावर मागील बाजूस काढले आहे. या सर्व वस्तूंत जडजवाहिरांनी सुशोभित केलेले सोन्याचे सिंहासन अप्रतिम व अद्वितीय आहे. यातील वास्तुशिल्प व मूर्तिशिल्प यांच्यापेक्षा थडग्याच्या भिंतींवरील चित्रे कलादृष्ट्या प्रसिद्ध आहेत.

संदर्भ : Gardiner, A. H. Weigall, A. E. P. A Topographical Catalogue of the Private Tombs of Thebes, London, 1913.

देव, शां. भा.