सकारा : ईजिप्तमधील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक प्राचीन स्थळ. प्राचीन ईजिप्तमधील मेंफिस या राजधानीची दफनभूमी येथे होती. कैरो शहराच्या आग्नेयीस सु. २४ किमी.वर सकारा आहे. जवळच आधुनिक अरबी अल् फुस्तात शहर आहे. ही दफनभूमी वाळवंटी पठारात उत्तरेकडे अबूशायरपासून दक्षिणेकडे दाशूरपर्यंत सु. ८ किमी. परिसरात आढळते. इथे अनेक उत्खनने झाली. त्यांपैकी पहिले उत्खनन झां द थेवनॉ (१६३३-६७) याने केले. त्याला शिल्पाकृतींनी अलंकृत केलेल्या व हायरोग्लिफिक म्हणजे चित्रलिपीत लेख असलेल्या पाषाणांच्या शवपेटिका मिळाल्या. त्यानंतर व्हॅन्स्लेब या पुरातत्त्ववेत्त्यास एका तळघरात रासायनिक प्रक्रिया केलेले अनेक पक्षी मृत्पात्रात ठेवलेले आढळले. स्ट्रॅबो या रोमन इतिहासकाराने या स्थळाला भेट देऊन काही माहिती लिहून ठेवली होती. त्या माहितीच्या आधारे मॅरिएटने इ. स. १८५० ते १८८१ दरम्यान येथे उत्खनने केली. त्याला वाळूत अर्धवट पुरलेले ⇨ स्फिंक्स चे पुतळे सापडले. शिवाय भुयारात ॲपिस बैलांची थडगी मिळाली. यानंतर किब्ले या पुरातत्त्वज्ञाने १९१२ मध्ये उत्तर सकारात उत्खनन-मोहीम हाती घेतली. १९३६ ते १९३९ दरम्यानच्या काळात येथे विस्तृत उत्खनने झाली. प्राचीन ईजिप्तमध्ये मृतांना विधिपूर्वक चटयांत वा कातडयांत गुंडाळून पुरत. प्रेताबरोबर हस्तिदंती किंवा मातीच्या स्त्री-मूर्ती व भांडीकुंडी पुरलेली आढळतात. यांवरून मरणोत्तर जीवनाची कल्पना त्या काळी रूढ असावी. ईजिप्तच्या सुवर्णकाळात पुरण्याच्या पद्धतीत खूपच फरक पडलेला दिसतो. त्यावेळी वैदयकीय दृष्ट्या सर्व रासायनिक प्रक्रिया करून प्रेत जतन करण्यात येई. मृतांची भव्य मंदिरे व त्यांच्याबरोबर पुरलेल्या अनेक वस्तू, अलीकडच्या उत्खननांत आढळून आल्या आहेत.[⟶ इजिप्त संस्कृती]. येथील थडग्यांना ⇨ मस्ताबा म्हणत आणि ईजिप्शियन संस्कृतीतील पहिल्या राजवंशापासून रोमन काळापर्यंतची ही थडगी आहेत. थडग्यातील सापडलेल्या मातीच्या कुंभांवरपहिल्या राजवंशातील राजांची नावे आहेत परंतु राजांचे दफन ⇨ आबायडॉस ला होत असल्याने त्यांच्या मंत्र्यांची थडगी सकारा येथे असावीत.

पहा : भूमिगत थडगी.

देगलूरकर, गो. बं.