हीलीऑपोलिसचा ऑबेलिस्क (इ.स.पू. पंधरावे शतक).

ऑबेलिस्क: प्राचीन ईजिप्तमधील सूर्यदेव ‘रे’  किंवा ‘रा’  ह्यास अर्पण कलेले ध्वजस्तंभ. मूळ ग्रीक ऑबेलिस्कॉस (Obeliskos) म्हणजे खंजीर या शब्दावरून त्यास हे नाव प्राप्त झाले असावे. हे स्तंभ तांबूस एकसंध ग्रॅनाइटचे असून शंक्वाकार, उंच, निमुळते व टोकदार आहेत. साधारणतः इ.स.पू. दुसऱ्या सहस्रकात ईजिप्तमधील मंदिरांसमोर दोनदोनच्या जोड्यांनी हे स्तंभ उभारण्यात आले. यांतील सर्वांत प्राचीन ऑबेलिस्क इ.स.पू.सु. २६९० ते इ.स.पू. २५६५ च्या दरम्यानचा आहे. बहुतेक स्तंभांवर शिल्पांकन व कोरीव लेख आढळतात. कारनॅकच्या स्तंभावर तो सात महिन्यांत पूर्ण केला अशी नोंद आहे. थीब्ज येथील हटशेपसुटच्या स्तंभावर अनेक शिल्पाकृती असून हा सर्वांत उंच म्हणजे ३० मी. आहे. लंडनमधील क्लीओपात्राची सूची (क्लीओपॅट्राज निडल) म्हणून ओळखला जाणारा स्तंभ पूर्वी ईजिप्तमध्ये हीलिऑपोलिसच्या मंदिरासमोर होता. यांशिवाय काही ऑबेलिस्क पॅरिस, रोम, फ्लॉरेन्स आदी ठिकाणी आहेत.

संदर्भ : 1. Budge, E.A. W. Cleopatra’s Needles &amp Other Egyptian Obelisks, London, 1926.

देव, शां. भा