झिगुरात : पश्चिम आशियातील विशेषतः सुमेरियन, ॲसिरियन व बॅबिलोनीयन संस्कृत्यांतील समाजांनी उभारलेली प्रचंड मंदिर-मनोरे. झिगुरात म्हणजे कृत्रिम डोंगर. मेसोपोटेमियाच्या परिसरातील अशा सु. तीस झिगुरातांचे अवशेष आतापर्यंत ज्ञात झाले आहे. टप्प्याटप्प्याने वर निमुळत्या होत जाणाऱ्या विटामातीच्या प्रचंड टेकडांच्या माथ्यावर हे देवालय उभारण्यात येई. वर जाण्यास एकच जिना असे. अशा कृत्रिम टेकड्या उभारण्यामागचा हेतू निश्चितपणे ज्ञात नसला, तरी त्या विश्वाची–पृथ्वी व स्वर्ग यांची–प्रतिकृती असावी. वास्तुकलादृष्ट्या आयताकृती व चौकोन असणारे हे मंदिर-मनोरे आकार व भव्यता ह्यांमुळे भक्ताच्या मनावर छाप पाडण्यास समर्थ ठरले. या टेकडीत समाध्या व थडगी नाहीत, याची उत्खननाद्वारे खात्री करून घेण्यात आली आहे. इ. स. पू. २७०० च्या थोड्या आधीपासूनच हे उत्तुंग मंदिर-मनोरे बांधण्यास आरंभ झाला होता. पुढे झिगुरातांची उंची व आकार वाढविण्याची प्रथा पडली. अरच्या झिगुरातचा पहिला मजला १० मी. उंच X ५७ मी. लांब X ३८ मी. रुंद (इ. स. पू. २१५०) आहे. बॅबिलन, मारी, कुश (आल्कूश), लगाश, निमरूद अशा बहुतेक सर्व महत्त्वाच्या ठिकाणी निरनिराळया प्राचीन देव-देवतांचे असे मंदिर-मनोरे इ. स. पू. ५०० पर्यंत उभारण्यात आलेले आढळतात.

माटे, म. श्री.