बाणगड : बांगला देशातील एक पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते दिनाजपूर जिल्ह्यात पूर्णभवा नदीच्या पूर्वकाठावर मौझा राजिबपूर जवळ वसले आहे. या ठिकाणी प्राचीन देवकोट वा कोटिवर्ष नगरी असावी, असे मानले जाते. बाणासुराची राजधानी येथेच असावी, असेही समजले जाते. कुंज गोविंद गोस्वामी यांनी या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर येथे कलकत्ता विद्यापीठाच्या वतीने १९३८-४१ दरम्यान उत्खनन केले. या उत्खननांत त्यांना इ.स.पू. तिसरे शतक ते इसवी सनाचे दहावे-अकरावे शतक या दरम्यानच्या काळातील अनेक वस्तूंचा पुरावा उपलब्ध झाला. सर्वांत खालच्या स्तरात सापडलेल्या वास्तूंवरून मौर्य अथवा शुंगकालीन वास्तुशैलीचा बोध होतो. नंतरच्या स्तरात विटांच्या घरांबरोबरच विटांच्या प्राकारांचे अवशेषही उघडकीस आले आणि त्यांतून लहान खोल्याही असल्याचे दिसून आले. गुप्तांच्या काळात अशी बांधणी होत असे. शिवाय आहत नाणी व मुद्रा, मूर्ती आणि विशेषत: शुंगकालीन मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर सापडल्या. सर्वांत वरच्या स्तरात पालवंशकालीन वस्तीचे काही अवशेष उपलब्ध झाले. त्यांपैकी कमलाकृती कुंड वैशिष्ट्यपूर्ण आहे. या अवशेषांवरून तत्कालीन समाज व सामाजिक जीवन यांवर प्रकाश पडतो. तसेच त्या काळातील लोकांची राहणी, वस्त्रप्रावरणे व दागदागिने यांचीही कल्पना येते. या स्थळाजवळच दोन प्राचीन कुंडे असून त्यांना अनुक्रमे अमृतकुंड व जीवतकुंड म्हणतात.

संदर्भ : Goswami, K.G. Excavations at Banagarh, Calcutta, 1948.

देव, शां. भा.