कोल्डेव्हाइ, रोबेर्ट : (१० सप्टेंबर १८५५–४ फेब्रुवारी १९२५). सुप्रसिद्ध जर्मन स्थापत्यविशारद व पुरातत्त्वज्ञ. ब्लांकेनबुर्ख ह्या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्याला प्रथमपासून अभिजात पुरातत्त्वविद्या आणि वास्तुकलेचा इतिहास या विषयांची आवड होती. म्हणून त्याने एफ्.एच्. बेकन ह्या अमेरिकन मित्राबरोबर १८६२-६३ मध्ये ॲसॉसच्या बालेकिल्ल्याचे सर्वेक्षण केले. ह्याच सुमारास त्याने सुर्गुल व एल् हिब्बा येथे उत्खनने केली. त्या वेळी उत्खनने केवळ पुरावस्तू मिळविण्यासाठीच प्रामुख्याने केली जात. ट्रॉय येथे त्याने जर्मन पुरातत्त्वसंस्थेतर्फे उत्खनन केले. १८८७ मध्ये बर्लिन वस्तुसंग्रहालयातर्फे तो इराकमध्ये उत्खननासाठी गेला. १८९९ ते १९१७ या काळात त्याने बॅबिलन येथे विस्तृत प्रमाणात उत्खनन केले. ह्या उत्खननात त्याने स्तरशास्त्राचा आधार घेऊन आलेखांच्या साहाय्याने उत्खनन पुरे  केले. या आलेखांमुळे बॅबिलनची शहररचना नेबुकॅड्नेझर व होमर ह्यांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे होती, हे त्याने सिद्ध केले. ह्यामुळे बॅबिलोनियाकडे विद्वानांचे लक्ष वेधले. तो बर्लिन येथे मरण पावला.

संदर्भ : Ceram, C. W. Gods, Graves and Scholars, London, 1960.

देव, शां. भा.