बहाळ : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील ताम्रपाषाणयुगीन अवशेषांचे एक स्थळ. ते चाळीसगावच्या उत्तरेस सु. ३० किमी. वर गिरणा नदीकाठी वसले आहे. लोकसंख्या ३,१९८ (१९६१). तेथे भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे १९५६-५७ मध्ये प्रथम उत्खनन झाले. उत्खननात ताम्रपाषाणयुगापासून ते मध्ययुगीन काळापर्यंतचे अनेक अवशेष आढळून आले.

ताम्रपाषाणयुगीन रंगीत मृत्तिकापात्रांचे अवशेष, बहाळ, महाराष्ट्र.

पहिली वस्ती येथे इ. स. पू. पहिल्या सहस्त्रकाच्या थोडी आधी  झाली  असावी.  तिचे  दोन  कालखंड  पडतात :   (अ) पूर्व कालखंडात  येथील  लोक  मळकट  राखी  रंगाची  मृद्-भांडी  वापरीत असत.  त्यांत  वाडगे, तोटीची  भांडी, बोळकी, माठ, कळश्या इ. विविध  प्रकार  होते.  यांशिवाय ⇨नेपासे, टेकेवाडा  इ.  ठिकाणी सापडलेले  राखी  दफनकुंभही  प्रचारात  होते. काही राखी मृद्-भांड्यांवर तांबड्या गेरूने वरच्या काठावर रंगकाम केलेलेही आढळते. (ब) या उत्तरकालखंडात ⇨जोर्वे येथे सापडलेल्या माळवा वर्गाची काळ्या रंगाची व तांबड्या पृष्ठभागावर नक्षी असलेली मृद्-भांडी प्रचलित होती पण भौमितिक नक्षीव्यतिरिक्त रेघा, इतर कलाकुसर आढळत नाही. याशिवाय ⇨रंगपूर (बांगला देश) वर्गातील चकचकीत लाल रंगाची व ⇨अहाड (राजस्थान) वर्गाप्रमाणे काळ्या रंगाची व तांबडी मृद्-भांडीही वपारात होती. यानंतर जोर्वेपद्धतीची मृद्-भांडी येथे वापरात आली. मातीच्या मडक्यांबरोबरच या काळातील लोक क्षुद्राश्म हत्यारे, अकीक, कार्नेलियन, स्टिअटाइट इ. खनिजांचे मणी, मातीचे कंगवे व फण्या बनवीत. तांबे या धातूचाही सर्रास वापर ते करीत असत. बहाळ येथे मातीच्या स्त्रीमूर्ती सापडल्या. त्यांची बनावट ओबडधोबड असून सांकेतिक स्वरूपाची आहे. अशा काही मूर्ती रांजणांवर चिकटविलेल्या आढळून आल्याय त्यांवरून या लोकांत मातृकादेवतेची पूजा प्रचलित असावी. लोहयुगीन संस्कृतीच्या काळात (इ. स. पू. ६०० ते ३००) बहाळला वस्ती झाली. काळी-तांबडी घोटीव मातीची भांडी, लोखंडी भाले, सुऱ्या व चाकू तसेच विटांच्या वास्तू, चौखुरी दगडी पाटे आणि तांदूळ व कडधान्य यांचा वापर, ही यानंतरच्या संस्कृतीची काही ठळक वैशिष्टये होत.

इ. स. पू. ३०० ते इ. स. पू. १०० या काळातील बहाळचे र-हिवासी कौलारू छपरांच्या घरांतून राहत असत. उत्कृष्ट तांबड्या झिलईचे मातीचे चंबू ते वापरीत व रंगीबेरंगी दगडांचे मणी आभूषण म्हणून अंगावर घालीत. या काळातील काही अहत नाणी बहाळ येथे सापडली.

यादव काळात बहाळ येथे अनंतदेव या सिंघणच्या ज्योतिषाने एक मंदिर बांधल्याचा उल्लेख इ. स. १२२२ च्या कोरीव लेखात आढळतो. इ. स. १४०० ते १८०० या काळातील थरांत मुसलमान सुलतान व मराठे यांची नाणी, चिनी मातीची भांडी, काचेच्या बहुरंगी बांगड्या व काचेचा मुलामा दिलेली मातीची भांडी आढळली.

संदर्भ : १. देव, शां. भा. महाराष्ट्र  : एक पुरातत्त्वीय समालोचन, मुबंई,१९६९.

          २. देव, शां. भा. महाराष्ट्रातील उत्खनने, दिल्ली,१९६२.

देव, शां. भा.