बेग्रॅम : अफगाणिस्तानातील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक प्रसिद्ध स्थळ. प्राचीन काळी कपिशी नावाने ते प्रसिद्ध होते. काबूलजवळील चारिकारच्या पूर्वेस सु. ८ किमी. वर पंजशीर व गोरबंड या नद्यांच्या संगमाजवळ ते वसले आहे. कुशाण काळात हे उंची मद्याकरिता वाङ्‌मयात ख्यातनाम असलेले एक महत्त्वाचे नगर होते. त्याचा उल्लेख फिनी, फाहियान, ह्यूएनत्संग इत्यादींच्या लेखनातून आढळतो. १९३६ साली जोसेफ हॅकिन आणि राय हॅकिन या दांपत्यास सु. ६०० च्यावर हस्तिदंती शिल्पे, ग्रीको-रोमन बनावटीच्या काचेच्या वस्तू, ब्राँझच्या मूर्ती व चिनी बनावटीच्या लाखेच्या कलात्मक वस्तू येथे मोठ्या प्रमाणात सापडल्या. येथील शिल्पांमध्ये दैनंदिन जीवनातील विविध प्रसंग दर्शविणाऱ्या स्त्री प्रतिमांचा अधिक भरणा असून पुरुषांच्या प्रतिमा तुलनात्मक दृष्ट्या फक्त ८-१० आहेत. या सर्वांत हस्तिदंताच्या वस्तू अत्यंत कलात्मक असून वैविध्यपूर्ण आहेत. हस्तिदंताच्या कोरीव कामात विविध पक्षी, हंस, मकर, लतापल्लव, मीनयुगुल मंगल चिन्हे, सुरसुंदरी, मिथुन शिल्पे, यक्ष-यक्षी, आई आणि मूल, दर्पणधारी इ. प्रकारच्या प्रतिमा अत्यंत प्रमाणबद्ध, रेखीव व मोहक पद्धतीने कोरलेल्या आढळून येतात. सातवाहन-कुशाण साम्राज्यातील हमरस्त्याद्वारे जे व्यापारी दळणवळण चाले, त्यातून हे भारतीय कलेचे नमूने अफगाणिस्तानात पोहोचले असावेत. त्यांच्या कालाविषयी निश्चित अनुमान काढण्यास कोणताच लिखित पुरावा उपलब्ध नाही तथापि चित्रणाचा आशय आणि शैली या दोन्ही दृष्टींनी बेग्रॅमची कला भारतीय कलासंप्रदायाशी निकटचे साम्य दाखविते. ब्रेगॅमच्या कलावस्तूंचा काल सातवाहन-कुशाण असावा, असे तज्ञांचे मत आहे.

हस्तिदंती

कनिष्काचे राज्य अफगाणिस्तानात पसरले होते आणि बौद्ध धर्माच्या प्रसार-प्रचारानिमित्त त्याने अनेक स्तूप तेथे बांधले व बुद्धाच्या मूर्ती खोदवून घेतल्या. त्या वेळी ही कलात्मक ज्ञापके तेथील कलाकारांनी आत्मसात केली असावीत.

संदर्भ : 1. Anand, Mulk Raj, Ed. Marg. Vol. XXIV, June 1971, Bombay.

2. Hackin, y3wuoeph Hackin, J. R. Recherches Archeologiques a Begram, 2 Vols., Paris, 1939.

देव, शां. भा.