टेल एल् अमार्ना : उ. ईजिप्तमधील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. कैरो शहराच्या उत्तरेस सु. ३०० किमी.वर नाईल नदीच्या उजव्या किनाऱ्यावर वसले आहे. चौथ्या आमेनहोतेपने (आक्नातन) आपली राजधानी थीब्झहून या ठिकाणी आणली. त्यामुळे अमार्नास इ. स. पू. चौदाव्या शतकात महत्त्व प्राप्त झाले. सर विल्यम मॅथ्यू फ्लिंडर्झ पेट्री याने १८८०–१९२४ च्या दरम्यान ईजिप्तमध्ये अनेक ठिकाणी उत्खनने केली. त्यांत टेल एल् अमार्नाही होते. येथे केलेल्या उत्खननात या नगरीतील अनेक रस्ते आणि वास्तू उजेडात आल्या. याशिवाय १८८७ मध्ये राजप्रासाद आणि सु. ४०० मृण्मुद्रा यांचे विस्तृत संग्रहालयही सापडले. प्रासादात चुनेगच्चेचे काम व रंगविलेली फरशी होती. मृण्मुद्रांवर लिखित मजकूर असून तो क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेला आहे. तिसरा आमेनहोतेप व आक्नातन यांचा पत्रव्यवहार, पॅलेस्टाइन व सिरिया येथील राज्यपालांना पाठविलेली पत्रे, तह वगैरे नोंदीचे हे दप्तरच आहे. याशिवाय प्राचीन ईजिप्तच्या इतिहासासंबंधी तसेच अतिपूर्वेकडील प्राचीन प्रदेशांविषयी यांतून बरीच माहिती मिळते. यांतील काही मृण्मुद्रा बर्लिन, ब्रिटिश आणि कैरो येथील वस्तुसंग्रहालयांत ठेवल्या आहेत. या सर्व मुद्रांचे भाषांतर सॅम्युएल ए. बी. मर्सर याने इंग्रजीत केले आहे. याशिवाय येथे खडकांत खोदलेली थडगीही सापडली आहेत. यांत काही शिल्पे असून त्यांतील नेफरतीती राणीचे शिल्प प्रसिद्ध आहे.

संदर्भ : Pendlebury, J. D. S. Tel el-Amarna, London, 1935.

देव, शां. भा.