जेम्सफर्ग्युसन, जेम्स : (२२ जानेवारी १८०८—९ जानेवारी १८८६). भारतीय वास्तुशिल्पशैलीचा एक चिकित्सक, स्कॉटिश अभ्यासक व कला समीक्षक. जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात एअर (स्कॉटलंड) येथे. त्याचे वडील विल्यम फर्ग्युसन (१७७३-१८४६) वैद्यकीय पेशातील असले, तरी त्यांना साहित्याचीही अभिरुची होती. नोट्स अँड रिकलेक्शन्स ऑफ ए प्रोफेशनल लाइफ हे त्यांच्या मृत्यूनंतर जेम्स फर्ग्युसनने प्रसिद्ध केलेले त्यांचे पुस्तक, या दृष्टीने उल्लेखनीय आहे. जेम्सचे प्राथमिक शिक्षण स्कॉटलंडमध्ये झाले. त्याच भाऊ विल्यम याची कलकत्त्यात एक व्यापारी कंपनी होती आणि तिचा भागीदार म्हणून जेम्स कलकत्त्यात आला पण कंपनीचा धंदा अल्पावधीतच संपुष्टात आला, म्हणून तो निळीच्या धंद्यात पडला. त्यात त्याने विपुल संपत्ती मिळविली. धंद्याच्या निमित्ताने त्याने १८३५ ते १८४५ या दरम्यान भारतभर प्रवास केला व काही प्राचीन वास्तूंचे निरीक्षण केले व तत्संबंधी तपशीलवार टिपणे करून ठेवली. १८४० साली रॉयल एशियाटिक सोसायटीचा सभासद म्हणून त्याची निवड झाली. मध्यंतरी काही दिवस तो इंग्लंडला गेला (१८४२). त्याने या सोसायटीपुढे रॉक-कट टेम्पल्स ऑफ इंडिया (१८४५) हा शोधनिबंध सादर केला. त्याची दखल तत्कालीन कला समीक्षकांनी घेतली. त्यानंतर तो पुन्हा भारतात आला. या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने उत्साही व सक्षम विद्वानांना उत्तेजन देण्याचे धोरण जाहीर केले. जेम्सने १८५५ ते १८७५ या काळात भारतीय वास्तुशैली व तिची वैशिष्ट्ये यांचा सूक्ष्म व चिकित्सक अभ्यास केला आणि हिस्टरी ऑफ इंडियन अँड ईस्टर्न आर्किटेक्चर (दोन खंड-१८७६) हा मौलिक ग्रंथ प्रसिद्ध केला. या पुस्तकाबद्दल त्यास रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे सुवर्णपदक मिळाले (१८७६). तत्पूर्वी त्याची सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती (१८६९). अलेक्झांडर कर्निगहॅम या प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञाबरोबर त्याचा सहकारी म्हणून काम करण्याची संधीही त्यास लाभली. १८६० ते १८६८ च्या दरम्यान त्याने पॅलेस्टाइनमधील प्राचीन अवशेषांची पाहणी केली. ट्री अँड सर्पंट वर्शिप या त्याच्या ग्रंथात सांची व अमरावती येथील बौद्ध अवशेषांचे विश्लेषण केलेले आहे. (१८६८). रूड स्टोन मॉन्यूमेन्ट्स ऑफ मेनी लॅन्ड्स (१८७२) या दुसऱ्या एका पुस्तकात त्याने भारतीय पूर्वाश्मयुगीन अवशेष हे प्रागैतिहासिक नसून ऐतिहासिक आहेत, असे मत प्रतिपादन केले. याशिवाय त्याने प्राचीन मेसोपोटेमियातील इराणी व ग्रीक वास्तुशैलींसंबंधी लेखन केले. त्याबद्दल त्याची नियुक्ती रॉयल कमिशनचा सदस्य म्हणून करण्यात आली. तो लंडन येथे मरण पावला.

फर्ग्युसनचे संशोधन आणि लेखनकार्य अविरत चालू होते. त्याने विपुल लेखन केले. ॲन एसे ऑन द एन्शंट टॉपॉग्रफी ऑफ जेरुसलेम (१८४७) द ट्रू प्रिंसिपल्स ऑफ ब्यूटी इन् आर्ट (१८४९) द पॅलेसीस ऑफ निनेव्ह अँड पर्सेपलिस (१८५१) नोट्स ऑन द साइट ऑफ द होली सेपल्कर ॲट जेरुसलेम (१८६१) हिस्टरी ऑफ मॉडर्न स्टाइल्स ऑफ आर्किटेक्चर (१८६२) इ. त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

फर्ग्युसनच्या संशोधनामुळे प्राचीन भारतीय कलावास्तूंकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आणि हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न होऊ लागले. प्राचीन कलेचा मर्मज्ञ समीक्षक आणि वास्तुशिल्पाचा तज्ञ इतिहासकार म्हणून फर्ग्युसनचे नाव अजरामर राहील.

संदर्भ : Natesan, G. A. Eminent Orientalist, Madras, 1922.

देव, शां. भा.