पुरावशेष, झिंबाब्वे.

झिंबाब्वे : आफ्रिकेतील एक प्राचीन अवशेषांचे स्थळ. ते ऱ्होडेशियात व्हिक्टोरिया किल्ल्याजवळ आग्नेयीस सु. २५ किमी.वर वसले आहे. ‘दगडांची घरे’ या नावांनी हे अवशेष ओळखले जात असले, तरी तेथील अजस्र भिंती वा मंदिर कोणी बांधले याविषयी काहीच माहिती ज्ञात नाही. या वास्तूंशी अनेक दंतकथा निगडित आहेत. हे अवशेष १८७१ साली प्रथम उजेडात आले. १८९१–१९५८ पर्यंतच्या काळात येथे अनेक उत्खनने झाली. त्यांपैकी कॅटन-टॉम्पसन यांनी विस्तृत प्रमाणावर उत्खनन केले असून त्यांची अनुमाने व निष्कर्ष आधुनिक तज्ञांनी ग्राह्य मानली आहेत. उत्खननात जवळजवळ सु. ९१ मी. लांब व ६० मी. रुंदीच्या दगडी देवळाचे अवशेष सापडले आहेत. त्याशिवाय दगडी प्रवेशद्वारे, तटबंदी, तटबंदीच्या आत मातीच्या वास्तू, मृत्पात्रे , लोखंडी हत्यारे, तांब्याचे व सोन्याचे दागिने, काचेचे मणी इ. अनेक अवशेषही मिळाले. यांतील काही वस्तू भारत, चीन व इराणमधून व्यापारी संपर्कामुळे आल्या असाव्यात, असे वाटते. कार्बन १४ पद्धतीनुसार येथील अवशेषांचा काळ इ. स. सु. सहावे ते आठवे शतक असा येतो, तर काही तज्ञांच्या मते तो १४ वे–१५ वे शतक धरला जातो. कॅटन-टॉम्पसन यांच्या मते नववे शतक हा काळ गृहीत धरण्यात येतो व तो अलीकडे सर्वमान्य झाला आहे.

संदर्भ : Coton-Thompson, Gertrude, Zimbabwe Culture, New York, 1931.

देव, शां. भा.