प्राचीन स्यूसाचे एक विहंगम दृश्यस्यूसा : एक प्राचीन पुरातत्त्वीय स्थळ, ईलमचे राजधानीचे शहर व पहिल्या डरायसची प्रशासकीय राजधानी. नैर्ऋत्य इराणमधील आधुनिक शूश, बायबलमधील शूशान व ग्रीक स्यूसिएन या नावांनीही ते प्रसिद्ध. ते झॅग्रॉस पर्वतश्रेणीच्या पायथ्याला कारखेह व कारून या नदीकाठांजवळ वसले आहे. पहिला डरायस आणि त्याच्या ॲकिमेनिडी वंशजांनी इ. स. पू. ५२२ पासून त्यावर आपली अधिसत्ता प्रस्थापिली. स्यूसाची नैसर्गिक ठेवणच अशी होती की, त्यायोगे आजूबाजूच्या समृद्ध मैदानी मुलूखावर कबजा ठेवणे सोपे जाई. यामुळे इ. स. पू. चौथ्या सहस्रकापासून ते अलेक्झांडरच्या काळापर्यंत येथे अनेक वस्त्या झाल्या. १८५० मध्ये डब्ल्यू. के. लॉफ्टस याने या स्थळाचा शोध लावला. तेथे त्याला मातीचे चार ढिगारे ( माउंड्स ) आढळले. त्यांपैकी एकात अंतर्दुर्ग होता. पुढे तेथे जॅक्विस द मॉर्गन या पुरातत्त्ववेत्त्याने १८९७ १९०८ यांदरम्यान उत्खनन केले. तेथे त्याला एक अकेडियन शंकुस्तंभासह अन्य काही अवशेष आढळले. शिवाय हामुराबीची विधिसंहिता मिळाली.

सर्वांत प्राचीन वस्ती ‘ स्यूसा १ अ ’ या काळात झाली. या काळातील सु. दोन हजार थडगी उत्खननात सापडली. या थडग्यांत मानवी सांगाड्यां-बरोबर दगडी व तांब्याच्या कुर्‍हाडी,गदा, चाकू, आरसे व छत्र्या हाती लागल्या. लॅपिस व फियान्सचे मणी, उत्कृष्ट बनावटीची मातीची मडकी आणि त्यांवरील काळ्या रंगात काढलेली चित्रे, नक्षी या इतर उल्लेखनीय बाबी आहेत. यांशिवाय ‘ स्यूसा १ अ ’चे रहिवासी मातीच्या स्त्रीमूर्ती, जनावरांच्या मूर्ती व पक्षीही बनवीत असत.

यानंतरचे ‘ स्यूसा ब ’चे रहिवासी चाकावर तांबड्या रंगाची मडकी बनवीत, असे दिसून आले. याशिवाय दांडे बसविलेल्या दगडी व तांब्याच्या कुर्‍हाडी, बटनाच्या आकाराच्या चिन्हांकित मुद्रा आणि तोटीची व कान असलेली मडकी बरीच वापरात होती. यानंतरच्या ‘ स्यूसा क ’ या काळात मात्र स्यूसा नागरी संस्कृतीचे केंद्र बनले. या काळात वैशिष्ट्यपूर्ण चित्रलिपीचा वापर सुरू झाला. ‘ स्यूसा ड ’ या काळात उत्कृष्टपणे चितारलेले मातीचे कुंभ वापरात आले. यावर काळ्या व तांबड्या रंगांत विविध नक्षी आणि प्राणी चितारलेले आढळतात.

इसवी सन पूर्व बाराव्या शतकात स्यूसाचा परमोत्कर्ष झाल्याचे आढळून येते परंतु बॅबिलनच्या नेबुकॅड्नेझरचा उदय झाल्यावर स्यूसाच्या समृद्धीला उतरती कळा लागली. सायरसने स्यूसा ॲकिमेनिडी साम्राज्याला जोडले. त्या काळातील डरायसच्या राजवाड्याचे स्थान पूर्वेस आढळले. यानंतर अलेक्झांडरने स्यूसाचा नाश केला, त्या वेळी स्यूसाच्या चौथ्या कालखंडातील वस्ती होती. ग्रीक, ईलम, इराणी व ससानियन संस्कृतींचे अवशेष येथे आढळले. आधुनिक शूश येथे चौदाव्या शतकापासून उसाची लागवड होऊ लागली. सांप्रत ते ऊस,संत्री व रेशीम यांसाठी प्रसिद्ध आहे.

देव, शां. भा.