फुट, रॉबर्ट ब्रूस : (? १८३४ – २९ डिसेंबर १९१२). भारतातील ब्रिटिश सनदी अधिकारी, अश्मयुगीन अवशेषांचा संशोधक व भूवैज्ञानिक. त्याच्या बालपणाविषयी तसेच शिक्षणासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. १८५८ साली वयाच्या चोविसाव्या वर्षी त्याने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण खात्यात प्रवेश केला आणि त्यानंतर तेहतीस वर्षे त्याच खात्यात काम करून वरिष्ठ अधीक्षक या पदावरून १८९१ साली तो सेवानिवृत्त झाला. त्याचा नोकरीचा बहुतेक काळ दक्षिण भारतात, विशेषतः मद्रास विभागात गेला. नोकरीत असताना व सेवानिवृत्तीनंतरही त्याने अखंडपणे भूविज्ञान आणि प्रागितिहास या क्षेत्रांत संशोधन चालू ठेवले. ३० मे १८६३ रोजी फुट याला मद्रासजवळ पल्लवरम् येथे आणि सप्टेंबर महिन्यात त्याच साली अतिरंपकम् येथेही अश्मयुगीन हातकुऱ्हाड सापडल्याने फुट हा भारतीय प्रागितिहासाचा जनक ठरला. १८६४ ते १८६६ या काळात कुर्नूल जिल्ह्यातील बिल्ल सुर्गम येथील गुहेचा संशोधकपूर्वक अभ्यास करून तिची अश्मयुगीन प्राचीनता त्याने सिद्ध केली. १८६३ ते १९०४ या चाळीस वर्षांच्या आपल्या संशोधनात त्याने ४० प्राचीन अश्मयुगीन व २५२ नवाश्मयुगीन स्थळांचा शोध लावला. या कामात त्याला एम्. जे. वॉलहाउस व पी. बॉझवर्थ स्मिथ या दोघांचे अमूल्य साहाय्य लाभले. त्याचप्रमाणे त्या युगातील हत्यारांचे तंत्र व वर्गीकरण यांचा त्याने अभ्यास करून प्रागैतिहासिक संशोधनाचा पाया घातला. आर्कियन खंडकांचे वैशिष्ट्य व त्यांचे वर्गीकरण धारवाड संघाच्या खडकांचा वेगळेपणा अश्मयुगीन स्तरविज्ञान आणि प्राचीन प्राणी यांवर त्याने मोलाचे संशोधन केले. बेळगावनजीकच्या प्राचीन भूस्तरात अतिप्राचीन काळातील गेंड्याच्या एका नव्याच जातीचा शोध त्याने लावला. संगनकल्लू व पिकलीहाल येथील उत्खननांनुसार (१८५७-५८) प्राचीन अश्मयुग व नवाश्मयुग या दोन युगांच्या कालदृष्ट्या अंतर होते, हेही त्याने यूरोपप्रमाणे भारतीय संदर्भात पहिल्यांदाच निदर्शनास आणले. १८७२ च्या सुमारास तिनेवेल्ली येथील वालुका टेकडावर त्याने क्षुद्राश्म हत्यारे शोधून काढली, त्याचप्रमाणे आंध्र-कर्नाटकातील राखेची टेकाडे नवाश्मयुगीन असून ती पशुपालन करणाऱ्या लोकांनी शेणाचे साठे जाळल्यामुळे निर्माण झाली, असे सिद्ध केले. निवृत्तीनंतर बडोदे संस्थानात त्याने तीन वर्षे भूवैज्ञानिक म्हणून काम केले. म्हैसूर संस्थानातील भूवैज्ञानिक प्रशासकीय सेवा या शाखेची संघटनाही त्यानेच केली. पुढे १९०४ पर्यंत सेलम जिल्ह्यातील शेवराय टेकड्यांतील येरकॉड या गावी तो स्थायिक झाला. व्हिएन्ना येथे १८७३ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्याने आपला वस्तुसंग्रह मांडला होता. हा संग्रह मोठा आणि वैविध्यपूर्ण होता. त्या वेळच्या मद्रास सरकारने तो विकत घेतला (१९०४). या संग्रहाची यादी करण्याचे काम त्याने स्वतःच सुरू केले परंतु या यादीचे दोन खंड त्याच्या मृत्यूनंतरच पूर्ण होऊन प्रकाशित होऊ शकले. कॅटॅलॉग रेअसॉन (इं. शी. क्‍लासिफाइड लिस्ट) हे या सूचीचे नाव असून त्यावरून व त्याने केलेल्या संशोधनावर आधारित द फुट कलेक्शन ऑफ इंडियन प्रीहिस्टॉरिक अँड प्रोटोहिस्टॉरिक अँटिक्‍विटीज हा ग्रंथ १९६६ साली प्रसिद्ध करण्यात आला. फुट याच्या संशोधनामुळे भारतीय भूविज्ञान, प्रागितिहास व पुराप्राणिविज्ञान या शास्त्रांना चालना मिळाली. अचूक नोंदणी, तपशीलवार वर्णन आणि वैज्ञानिक विश्लेषण ही फुट याच्या संशोधनाची वैशिष्ट्ये भारतीय पुरातत्त्वविद्येला पायाभूत ठरलेली आहेत.

संदर्भ : Sen. D. Ghosh, A.K. Ed. Studies in Prehistory : Robert Bruce Foote Memorial Volume, Calcutta, 1966.

देव, शां. भा.