सिगिरिया : श्रीलंकेतील भित्तिचित्रांसाठी प्रसिद्घ असलेले एक प्राचीन पुरातत्त्वीय स्थळ व खडकावरील किल्ला. तो श्रीलंकेच्या मध्य भागात कँडी शहराच्या उत्तरेस सु. ७२ किमी.वर आहे. पहिला कश्यप (कार. ४७७–९७) या राजाने शत्रूपासून संरक्षणार्थ हा अभेद्य किल्ला सस.पासून ३४९ मी. उंचीवरच्या एका प्रशस्त आणि रुंद प्रस्तरावर (स्तंभावर) बांधला (इ. स. ४७७). काही काळ हे राजधानीचे स्थळ होते. या पर्वताला सिंह पर्वत म्हणत आणि त्यावर जाण्याचा मार्गसिगिरिया : किल्ल्याचे प्रवेशद्वार. सिगिरी–मानेपासून वरचा जबड्याचा आकार– असा होता, म्हणून त्यास सिगिरिया म्हणत. या किल्ल्यावर राजाने भव्य प्रासाद बांधला आणि पश्चिमाभिमुख दोन गुंफा खोदून घेतल्या. प्रासादात व जवळपासच्या गुंफांतून त्याने आपल्या दरबारातील चित्रकारांकडून सुरेख भित्तिचित्रे काढून घेतली. त्यांतील २१ भित्तिचित्रे सुस्थितीत असून अवशिष्ट आहेत. त्यांत बहुविध अलंकार ल्यालेल्या राण्या आणि त्यांच्या दासी यांच्या लालित्यपूर्ण प्रतिमा असून त्यांची अंगकाठी सडपातळ व आकर्षक आहे. एका दासीच्या हातात कमलफुलांनीयुक्त ताम्हण असून ती अदबशीर दर्शविली आहे. सर्व स्त्रीप्रतिमांच्या माथ्यावर कलाकुसरयुक्त मुकुट आहेत आणि गळ्यातील मौक्तिकमाला उन्नत उरोजांमधून लटकत आहेत. ही शारीरिक वैशिष्ट्ये त्यांवरील सिंहली छाप दर्शवितात मात्र अलंकार, ठेवण आणि भावदर्शनात अजिंठ्याचा प्रभाव जाणवतो. या प्रतिमांपैकी दोन स्वर्गीय देवता असून त्यांचे दैवीस्वरुप दर्शविण्यासाठी त्या कमरेखाली धुक्यात बुडलेल्या दाखविल्या आहेत. एकूण भित्तिचित्रांतून तांबड्या रंगाच्या भिन्न छटा असलेले रंग वापरले असून शिवाय पिवळा, हिरवा व काळा रंगही वापरला आहे. रंगसंगती, रेखाटन, गतिमानता आणि भावदर्शन यांबाबतीत ही भित्तिचित्रे उठावदार व लक्षणीय ठरतात. मानवी चेहऱ्यांची ठेवण चीनशी सांस्कृतिक संपर्क सुचविते. तज्ज्ञांच्या मते हे चित्रतंत्र बॉन फ्रेस्को या इटालियन पद्घतीशी मिळते-जुळते आहे. सध्या ते श्रीलंकेच्या पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत असून एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे. राजप्रासादाचे अवशेष अवशिष्ट असून भित्तिचित्रांचे संवर्धन-संरक्षण केले आहे.

देव, शां. भा.