घारापुरी : महाराष्ट्रातील शैव संप्रदायी लेण्यांचे प्रसिद्ध स्थळ.मुंबईच्या पूर्वेस सु. ११ किमी. वरील एका बेटावर ही लेणी खोदली आहेत. यात पाच लेण्यांचा समूह असून तो घारापुरी या नावाने ओळखला जातो. अग्रहारपुरी या नावावरून घारापुरी हे नाव बहुतेक आले असावे. याचे प्राचीन नाव श्रीहरी होते. या बेटावरील अवाढव्य दगडी हत्तीमुळे त्यास पाश्चात्त्यांनी एलेफंटा हे नाव दिले. सध्या हा हत्ती मुंबई येथील जिजामाता उद्यानातील वस्तुसंग्रहालयाजवळ ठेवण्यात आला आहे. ते एलेफंटा व घारापुरी अशा दोन्ही नावांनी आज प्रसिद्ध आहे.

ही लेणी कोणी खोदली, यासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. शिवाय तत्संबंधी एकही लिखित पुरावा वा लेख येथील लेण्यांत उपलब्ध झाला नाही. शिल्पाकृती, त्यांची घडण, पेहराव वगैरेंवरून जेम्स बर्जेस, जेम्स फर्ग्युसन, भगवानलाल इंद्रजी वगैरे पुरातत्त्ववेत्त्यांनी ही लेणी सु. आठव्या-नवव्या शतकांत खोदलेली वा राष्ट्रकूटांची असावीत, असे अनुमान काढले आहे. येथील आकृत्या गुप्त व शक परंपरांशी निगडित असल्यामुळे चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने हर्षवर्धनाच्या पराभवानंतर ही लेणी खोदली, असेही काहींचे म्हणणे आहे. पांडवांनी अथवा बाणासुराने या गुहा खोदल्याचीही दंतकथा सांगण्यात येते. शिल्पांशिवाय येथील भिंतींवर व छतांवरही चित्रे व रंगीत नक्षीकाम असावे, असा काही तज्ञांचा कयास आहे. येथील वास्तूच्या एकूण अवशेषांवरून सहाव्या ते नवव्या शतकांतील कोकणात राज्य करणाऱ्या मौर्य-शिलहार राजांची मंगळपुरी नामक राजधानी म्हणजेच घारापूरी असावी, असेही काहींचे म्हणणे आहे. १५३४ मध्ये हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले आणि या शिल्पांस प्रसिद्धी मिळाली.

घारापुरीच्या लेण्यांचा आलेख सर्वसाधारणपणे अधिक या चिन्हासारखा आहे. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना, येथील स्तंभ आणि शिल्पे यांची रचना वेरूळच्या दुमार लेण्यासारखी आहे. तथापि येथील त्रिमूर्ती मुख्य प्रवेशद्वारासमोर नाही, ती एका स्वतंत्र गर्भगृहात आहे. तसेच स्तंभशीर्षे गोल उशीच्या आकाराची आहेत. त्यांवर अत्यंत रेखीव व प्रमाणबद्ध पन्हाळ्या कोरलेल्या आहेत.

घारापुरीतील शिल्पे त्यांच्या उदात्त भावप्रकटनाच्या दृष्टीने अद्वितीय ठरलेली आहेत. बहुतेक सर्व शिल्पे शिवाच्या जीवनाशी निगडित असून ती तत्कालीन शैवपंथीय पुनरुज्जीवनाची साक्ष देतात. प्रत्येक शिल्पाच्या मागे काहीतरी पौराणिक कथा गुंफलेली असून शिल्पज्ञाने तिचे वास्तवरूप चित्रित करण्यात प्रयत्न केला आहे. येथील मुख्य शिल्प त्रिमूर्तीचे आहे. या शिवाय अर्धनारीश्वर, गंगावतरण, शिवपार्वती विवाह, अंधकासूरवधमूर्ती, उमामहेश्वर, तांडवनृत्य, रावणानुग्रह इ. शिल्पे प्रमाणबद्धता, जोष व भावरेखाटन या दृष्टींनी विशेष उल्लेखनीय आहेत.

 कल्याणसुंदरमूर्ती, घारापुरी. सहा चौ. मीटरच्या गाभाऱ्यात सु. पाऊण मी. उंचीच्या आसनावर त्रिमूर्तीची मुख्य प्रतिमा आहे. तीत फक्त हृतकमलापासून वरचा भाग दर्शविला आहे. मूर्तीचे खोदकाम उत्थित पद्धतीचे असून प्रतिमेभोवती प्रदक्षिणापथ नाही. शिरस्त्राणासह त्रिमूर्तीची उंची ५.२३ मी. असून यात विधाता, त्राता आणि संहारक अशी तिन्ही अंगे कोरली आहेत. ब्रह्मा, रुद्र व विष्णू यांचे अनुक्रमे शांत, रौद्र व उदात्त भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर विलक्षण वास्तवतेने दर्शविलेले आहेत. ब्रह्मदेवाची मुद्रा शांत आहे, श्वास रोधून धरलेला आहे. गळ्यात मोत्यांचा हार आणि छातीवर मोत्यांची पेंडी व लोलक लावलेला रत्नांचे जडावाचा हार आहे. डाव्या हातात महाळूंग आहे. ते गर्भाचे प्रतीक मानण्यात येते. उजवा हात तुटलेला आहे. मस्तकावर जटाभार व त्यावर जडावाचे काम केलेला उंच मुकुट आहे. उजव्या कानात व्याघ्रकुंडल आणि डाव्या पाळीत मकरकुंडल आहे. कपाळावर कीर्तिमुखाच्या धर्तीचे जडावकाम आहे, तर रुद्रमूर्तीची मुद्रा उन्मत्त आहे. त्याच्या कपाळावर मध्यभागी उंचवटा आहे. तेथे त्याचा तिसरा नेत्र असावा, असे वाटते. ओठावर मिशा आहेत, रुद्राच्या मस्तकावर मुकुट आहे. ब्रह्मदेवाच्या मुकुटापेक्षा हा उंचीला कमी आहे. त्याची ठेवणही वेगळी, रुद्र स्वभावानुसार आहे. मुकुटावर जागोजाग सर्पांची वेटोळी व वर फणा काढलेला नाग आहे. एकूण मूर्तीचा आविर्भाव उन्मत्त दिसतो. मात्र विष्णूची मुद्रा प्रसन्न आहे. तिचा मुकुट वरील दोन्हींपेक्षा नाजूक व लहान वाटतो. मुकुटाखालील कुरळ्या केसांनी कान झाकून गेलेले आहेत. मुकुटाला मोत्यांच्या माळा व घोस आहेत. वरच्या बाजूस उमललेले कमळ आहे. विष्णूच्या उजव्या हातात कमळ आहे. या त्रिमूर्तीविषयी संशोधकांनी दोन भिन्न मते दिली आहेत. एक, या मूर्तीत ब्रह्मा, विष्णू व महेश यांचा समन्वय आहे आणि दुसरे हे की, ही तिन्ही रूपे शंकराचीच आहेत. प्रसिद्ध विदुषी स्टेला क्रॅमरिश यांनी ही तीन रूपे महादेवाचीच आहेत, असे ठामपणे म्हटले आहे. त्यांच्या मते घारापुरीच्या त्रिमूर्तीत तत्पुरुष– महादेवमध्ये डावीकडे अधोर–भैरव आणि उजवीकडे वामदेव-उमा ही रूपे दाखविलेली आहेत. शिवाय ही मूर्ती खोदण्यात आली त्या वेळी दत्तात्रयाची कथा निर्माण झाली असली, तरी त्याची उपासना मूर्तीरूपात विशेष रूढ झालेली नव्हती.


त्रिमूर्ती शिल्प, घारापुरी.मूर्तिकाराने ही मूर्ती अत्यंत कौशल्याने घडविलेली आहे. महादेवाच्या या तीन रूपांत केवढा फरक आणि तोही अत्यंत लालित्यपूर्ण रीतीने दाखविलेला आहे. प्रत्येकाची प्रतीके वेगळी, चेहऱ्यांची ठेवण वेगळी, मुखावरील आविर्भाव वेगळे, मुकुटही वेगळे डोळे मिटलेले असूनही भिन्न भाव त्यात व्यक्त झालेले दिसतात. अघोर-भैरव, तत्पुरुष महादेव आणि वामदेव यांचे भिन्न भाव येथे स्पष्ट दिसतात.

त्रिमूर्तीच्या शेजारी पूर्वेस अर्धनारीश्वराची मूर्ती आहे. अर्धनारीश्वर म्हणजे शिव-पुरुष आणि उमा-प्रकृती यांचा समन्वय. उजवे अंग शिवाचे व डावे उमेचे. या मूर्तीची उंची ५.१० मी. असून शंकराचा जटाभार व पार्वतीचा केशसंभार, यांना जरतारी वस्त्रात आच्छादून त्यावर जडावाचा उंच मुकुट चढविलेला आहे, असे भासते. मुकुटाच्या घडणीतून बाहेर आलेल्या उजवीकडील शंकराच्या जटा आणि डावीकडील पार्वतीच्या कुरळ्या बटा दिसतात. शंकराच्या जटांमध्ये चंद्रकला असून कानाची पाळी लांब व तीत एकच बाळी आहे, तर पार्वतीच्या कानात कर्णफुलांची जोडी दिसते. शंकराचा एक हात नंदीला आवरीत आहे, तर पार्वतीच्या दुसऱ्या हातात वर्तुळाकार दर्पण आहे. मूर्ती एक असूनही दोन्ही बाजूंनी भिन्न भाव दिसतात, तसेच साजेसी शारीरिक  ठेवणही आढळते. पार्वतीचे नितंब नि स्तन तिच्या बांधेसूद स्त्रीत्वाची साक्ष देतात, तर भरदार वक्षःस्थळ व सडपातळ कटिप्रदेश शंकराच्या पुरुषत्वाचा दाखला देतात. अर्धनारीश्वराच्या मागे आणि आजूबाजूला अनेक मूर्ती आहेत. त्यांपैकी गरुडाच्या खांद्यावर बसलेला चतुर्हस्त विष्णू, दोन दासी, मकरवाहन वरुण, ब्रह्मदेव, इंद्र वगैरेंच्या मूर्ती कलात्मक आहेत.

त्रिमूर्तीच्या पश्चिमेला गंगाधर वा गंगावतरणाची एक मूर्ती आहे. ही मूर्ती ३·७५ × ५·५० मीटरच्या चौकटीत खोदलेली आहे. तीमधील शिवाची उंची सु. ५ मी. असून पार्वतीची उंची सु. ३·७५ मी. आहे. शंकराचे दोन हात मोडले आहेत. उरलेल्या दोन हातांपैकी एक बुटक्या गणाच्या मस्तकावर व दुसऱ्याची तर्जनी पार्वतीच्या हनुवटीवर आहे. शंकराच्या जटाभारावर त्रिधारी मुकुटाचे आच्छादन असून त्याच्या शिखरातून त्रिमुख स्त्रीची अर्धमूर्ती दाखविलेली आहे. ही मुखे गंगा, यमुना व सरस्वती या तीन पवित्र नद्यांची प्रतीके असावीत, असे अनुमान करण्यात येते. शंकर या भाराने किंचित कलला आहे आणि पार्वतीला जवळ घेण्याचा प्रयत्न करीत असून पार्वती लज्जेने दूर सरकण्याचा यत्न करीत आहे, असे वाटते. तिच्या कुरळ्या केसांवर मुकुट आहे नि मागे मल्याळी धर्तीचा अंबाडा बांधलेला आहे. कुंडलांपासून नूपुरापर्यंत ती अलंकारांनी नटलेली आहे व झुळझुळीत वस्त्र ल्याली आहे. तिच्या शेजारी प्रसाधन–साहित्याची मंजूषा धारण करणारी दासी उभी आहे. एकूण पार्वतीची मूर्ती त्रिभंगात असून फक्त स्कंधाकडील भाग शंकराकडे कलला आहे.

शिवपार्वतीविवाह या मूर्तीत पार्वतीची मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध व बांधेसूद असून शिवपार्वती या दोन्ही मूर्तींची बरीच मोडतोड झाली आहे. पार्वती शंकराच्या उजव्या बाजूस असून तिचा उजवा हात शंकराच्या डाव्या हातात होता, असे मूर्तींच्या ठेवणीवरून वाटते. एकूण प्रसंगावरून वेरूळ येथील रामेश्वर लेण्यातील प्रसंगाची आठवण येते. या मूर्तीला कल्याणसुंदर असे नाव दिले आहे. देखणा, दयाळू शिव प्रसन्न दिसत आहे. त्याचा एक हात कंबरेवरच्या वस्त्रावर असून दुसऱ्या हाताने तो पार्वतीला आधार देत आहे. लज्जावनतमुखी पार्वतीचे कन्यादान तिचा पिता करीत आहे तिला शिवाच्या हाती देत आहे. ब्रम्हा या मंगलप्रसंगी पुरोहित असून तो शिवाच्या डावीकडे बसला आहे. मेघमंडलातून देव हा मंगल समारंभ पहात आहेत, असे दाखविले आहे.

अंधकासुरवधमूर्तीचा खालचा भाग फुटून गेला असला, तरी एकूण सारा प्रसंग स्पष्ट दिसतो. विक्राळ शिव खडकांमधून पुढे घुसून अंधक राक्षसाला ठार करीत आहे, त्याच्या शरीरातून पडणारे रक्ताचे थेंब पकडण्यासाठी त्याने एका हातात कुंडिका धरली आहे. उजव्या हाताने शिवाने हत्तीचे कातडे धरले आहे. अंधकाचा मित्र नील याने गजरूप धारण करून शिवावर हल्ला चढविला होता. पण शिवाच्या एका सेवकाने त्यास ठार केले. एकूण या चित्रातून उग्र शिवाने यथार्थ दर्शन होते.

शिवपार्वतीविवाह मूर्तीच्या पश्चिमेकडे अंगणात डाव्या हातास एक लहानसे शिवालय आहे. दारात खुला मंडप, उत्तरेस कमलाधिष्ठित शिवमूर्तीचे शिल्प मुख्य लेण्यातील योगीश्वरासारखेच दिसते. शिवालयाच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, असून वर आकाशात विद्याधर आहेत. डावीकडे टाक्यावर आणखी एक शिवतांडवनृत्य शिल्प आहे. याची उंची सु. ३·५० मी. असून पार्वतीच्या अंगावर ठळक अलंकार आहेत. मागल्या बाजूला गरुडारूढ शंखचक्रधारी विष्णू, ऐरावतावर इंद्र आणि हंसारूढ ब्रह्मदेव आहेत. कार्तिकेय वरच्या बाजूला तर गणपती शिवाच्या उजवीकडे आहे. उजव्या हातात सोटा व डाव्या हातात हत्तीचा सुळा आहे. वीणा वाजविणारी स्त्री आणि अवकाशगामी यांच्या मूर्ती बाइकाईने पाहण्यासारख्या आहेत.

तांडवनृत्यातील मूर्ती इतकी छिन्नविच्छिन्न झालेली आहे की, तिच्या आजच्या स्वरूपावरून मूळच्या सौंदर्याची मुळीच कल्पना करता येत नाही.

येथून पूर्वीच्या द्वारमंडपात डावीकडील शिल्पांत रावणानुग्रह कथा चित्रित केली आहे. गर्वाने धुंद झालेल्या दशमुखी रावणाने आपल्या वीस हातांनी कैलासपर्वत समूळ उचलण्याचा खटाटोप आरंभलेला दिसतो पण इतक्यात शिवाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने तो जमिनीवर दाबला. त्यामुळे रावण पर्वताखाली अडकला. शिल्पात गोल खडक पुढे आलेले दिसतात ते म्हणजे कैलास. त्याखाली रावणाची मूर्ती अतिशय विच्छिन्न झालेली दिसते. शिव उंच व ऐटदार असून त्याचा तिसरा डोळा यात स्पष्ट दिसतो. शिवाचे हात तुटले आहेत एकाने त्याने पार्वतीला आधार दिला आहे, दुसऱ्या हाताने त्याने आपल्या सेवकाचे केस धरून त्याला सावरले आहे.

वरील सुप्रसिद्ध शिल्पाकृतीं व्यतिरिक्त चतुर्भुज द्वारपाल, गणेशमूर्ती, कार्तिकेय, ब्रह्मा, विष्णू वगैरेंच्या मूर्तीही नजरेत भरण्यासारख्या आहेत. मुख्य लेण्याव्यतिरिक्त उरलेल्या लेण्यांतही काही मूर्ती आहेत, परंतु त्या विशेष उल्लेखनीय नाहीत. ज्या आहेत त्यांचीही फार मोडतोड झालेली आहे.

घारापुरीतील काही शिल्पाकृती सध्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत. त्यांपैकी चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती, शांत मुद्रा व प्रमाणबद्धता या दृष्टीने उल्लेखनीय आहे. तसेच शिवाची एक भग्नमूर्ती त्याचा फक्त कटिभागच अविशिष्ट असून, शिवाबरोबर पार्वती व एक सेवक आहे. त्यांच्या पायांची घडण तर विशेष अप्रतिम आहे. गुळगुळीत पोटऱ्या व किंचित फुगलेली पावले पाहून त्यांतील जिवंतपणा मनावर ठसतो. इतर मूर्तींमध्ये नटराजाची कबंधमूर्ती व महिषासुरमर्दिनी यांचा उल्लेख करावयास हवा. लेण्याव्यतिरिक्त इतरही काही अवशेष येथे सापडले आहेत. इ. स. तिसऱ्या शतकातील विटांच्या स्तूपाचे अवशेष, अनेक शिवलिंगे, शिवमूर्तीचे भग्नावशेष, वास्तूचे पाये आणि मोठमोठ्या विटांचे तुकडे इतस्ततः विखुरलेले आहेत.

येथील साऱ्या शिल्पांची फार मोठ्या प्रमाणावर मोडतोड झालेली आहे. सतराव्या-अठराव्या शतकांत पोर्तुगीज सैनिकांनी नेमबाजीचा सराव करण्याकरिता तसेच प्रतिध्वनींची गंमत ऐकण्यासाठी अनेक शिल्पे बंदुकी व तोफा यांच्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न केली. १९३९ साली पाणी झिरपून त्रिमूर्तीचा बराच मोठा ढलपा निखळून पडला. नैसर्गिक आणि मानवी नासधुसीमुळे येथील शिल्पांच्या जतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. हवेतील आणि पाण्यातील क्षारामुळे खडक ठिसूळ बनत चालला आहे. त्याचप्रमाणे झिरपणाऱ्या पाण्यामुळे गुहांमध्ये नासधूस होत असते. याकरिता पुरातत्त्वखात्याने चिरांत दाबाने सिमेंट भरणे, पाणी जाण्याकरिता पन्हाळ्या खोदणे, वरचे छत तोलून धरण्याकरिता दगडी खांब उभारणे इ. महत्त्वाची कामे कुशलतेने हाती घेतली आहेत. अलीकडे त्रिमूर्तीमध्ये कागदाचा ओला लगदा क्षार काढण्याकरिता भरून नंतर मूर्तीवर एक रक्षक लेप दिला आहे.

संदर्भ : 1. Fergusson, J. Burgess, J. The Cave Temples of India, London, 1880.

  २. जांभेकर, रामकृष्ण, अनु. एलेफंटा (घारापुरी ),मुंबई, १९५७.

  ३. जोगळेकर, सदाशिव आत्माराम, घारापुरी, पुणे, १९४८.

देशपांडे, सु. र.