शिशुपालगढ : भारताच्या ओरिसा राज्यातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते भुवनेश्वरच्या वायव्येस सु. सात किमी. वर वसले आहे. त्याच्या जवळच सम्राट अशोकाचा धौली येथे शैलोत्कीर्ण लेख असून त्या परिसरातच खारवेल राजाचा खंडगिरी येथील लेख आढळला. धौली लेखातील तोसली वा खंडगिरी लेखातील कलिंगनगर म्हणजेच शिशुपालगढ होय, असा समज आहे. येथे १९४७-४८ दरम्यान तीन वेळा उत्खनन झाले. त्यांत इ. स. पू. ३०० ते इ. स. पू. ३५० पर्यंतच्या काळात तेथे तीन वेळा वस्त्या झाल्याचे अवशेषांवरून ज्ञात झाले. दुसऱ्या वस्तीच्या कालखंडात तेथे मजबूत तटबंदी व जांभा दगडाची प्रवेशद्वारे उभारण्यात आली. तटबंदी चौरस होती आणि तिच्या प्रत्येक बाजूस दोन दारे होती. इ.स.पू. तिसऱ्या शतकातील तटबंदी तळाशी सु. ३४ मी. रुंद व टोकाशी ७·७५ मी. रुंद अशी मातीची होती. नंतरच्या काळात विटांच्या बांधकामाने तिला मजबूती देण्यात आली. तिची वारंवार डागडुजी केल्याचे पुरावे उपलब्ध असले, तरी इतकी भक्कम तटबंदी भारतात इतरत्र कुठेही अढळली नाही. येथील रहिवासी उत्कृष्ट मणी, मृत्पात्रे, अलंकार आणि खेळणी बनवीत असत. त्यांची घरे विटांची होती. इ. स. पू. २०० ते इ. स. पहिले शतक या कालखंडातील रोमन नाण्यांच्या मृण्मय प्रतिकृती, कुशाण वंशातील हुविष्काचे नाणे इ. येथे मिळाले. येथील टेकडावर आढळलेल्या एकसंध पाषाणातील १६ स्तंभांवरून येथे एक बहुस्तंभी सभागृह असावे, असे अनुमान करण्यात येते.

संदर्भ : देव, शां. भा. पुरातत्त्वविद्या, पुणे, १९७६.

  देगलूरकर, गो. बं.