अनुराधपुर : श्रीलंकेमधील एक शहर. लोकसंख्या ३०,००० (१९६८). प्राचीन बौद्ध अवशेषांकरिता व भिक्षूंचे यात्रास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ते कोलंबो-जाफना लोहमार्गावर आरूव्ही नदीकाठी, कोलंबोच्या ईशान्येस १७२ किमी. वर वसले आहे. सध्या ते जिल्ह्याचे प्रमुख स्थान असून उत्तर-मध्य प्रांताच्या राजधानीचे ठिकाण आहे. त्यामुळे आजचे अनुराधपुर हे सर्व आधुनिक सुखसोयींनी अद्यावत शहर बनले आहे.अनुराधपुर : थूपाराम डागोवा.

हे शहर प्रथम अनुराध नावाच्या राजाने वसविले, अशी एक कथा प्रचलित आहे. इ. स. पू. ४३७ मध्ये पण्डुकभय &gtपण्डुखभय&gt पडुकभय राजाने ह्या गावाची स्थापना करून तेथे आपली राजधानी नेली. त्या वेळेपासून पुढे कित्येक वर्ष ते सिंहली राजांच्या राजधानीचे शहर होते. अशोकसमकालीन तिस्स राजाने या शहराचे सौंदर्य व कीर्ती वाढविली. त्याने अनेक सुंदर इमारती बांधल्या. त्यांपैकी थूपाराम व कुज्‍जतिस्साराम हे डागोबा (स्तूप) आणि काही मुनिविहार प्रसिद्ध आहेत. इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या अखेरीस तमिळांनी ह्या शहरावर अनेक आक्रमणे केली आणि आपला अंमल शहरावर बसविला. त्यांच्याकडून दुत्थगामनि (१०१-७७ इ. स. पू.) ह्या राजाने ते जिंकून घेतले. त्यास श्रीलंकेतील आख्यायिकांत तसेच बखरींत मोठा मान आहे. यानेही लोहप्रासाद, रूवनवेलि स्तूप इ. अनेक इमारती बांधल्या. यानंतर पुन्हा तमिळांनी अनुराधपुरावर आक्रमण केले, परंतु वट्टगामणि (२९-१७ इ.स.पू.)ह्या सिंहली लोकांच्या पुढाऱ्याने त्यांस प्रतिकार करून ते परत मिळविले. त्याच्या स्मरणार्थ अभयगिरी डागोबा बांधण्यात आला. यानंतर राज्यावर आलेल्या सिंहली राजांत महासेन (३३४-३६१) व धातुसेन (४६०-४७८) ह्या राजांनी बांधलेले अनुक्रमे जेतवनाराम डागोबा व कालवापी सरोवर ही महत्त्वाची होत. फाहियान हा चिनी प्रवासी ४११-४१२ च्या दरम्यान अनुराधपुर येथे होता. त्याने आपल्या प्रवासवर्णनात अनेक इमारतींचे सुरेख वर्णन केले असून एका विद्यापीठाचाही उल्लेख केला आहे. येथे सिंहली घराण्यातील सु. नव्वद राजांनी जवळजवळ तेराशे वर्षे राज्य केले. फक्त पाचव्या शतकातील धातुसेन आणि काश्यप ह्या राजांनी आपली राजधानी काही वर्षे अन्यत्र हलविली होती. ९ व्या शतकाच्या प्रारंभी तमिळांच्या आक्रमणांमुळे सिंहली राजांनी आपली राजधानी पोलोन्नरुव गावी नेली तमिळानी अनुराधपुर काबीज केले आणि तेव्हापासून अनुराधपुरचे महत्व क्रमशः कमी होऊन ते सर्वस्वी उजाड बनले.

 

एकोणिसाव्या शतकात श्रीलंका ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांनी ह्या ऐतिहासिक स्थानी उत्खनन केले. त्यात त्यांना विविध शिल्पाकृती, डागोबा, स्नानगृहे, शिलालेख इ. बौद्धकालीन अवशेष मिळाले. त्यांतील स्तूप व विहार प्रचंड आहे. अर्थात त्यांचे बृहत्करण झाल्याचे उल्लेख महावंशात मिळतात. स्तूपांपैकी जेतवनाराम, अभयगिरी व रूवनवेलि हे मोठे असून थूपाराम, मिरिसवेतिय, कुज्जतिस्साराम, अंबस्थाल, महासेय इ. लहान आहेत व त्यांच्या रचना मोठ्या स्तूपांहून वेगळ्या दिसतात. अर्थात वरीलपैकी थोडे सुस्थितीत आहेत. जेतवनाराम येथील स्तूपाचा व्यास ९४मी. व उंची ७६मी. असून त्यात पाया, अंडाकृती घुमट व त्यावरील निमुळते शिखर—असे तीन प्रमुख घटक दिसून येतात. अभयगिरी येथील स्तूपाचा व्यास १०७मी. असून उंची सु. १०१मी. होती मात्र आज सुस्थितीतील भाग ७०मी. उंचीचा दिसतो. जेतवनाराम स्तूप बांधणीत अभयगिरीसारखा पण अधिक सफाईदार आहे. रूबनवेली येथील स्तूपाचा वर्तुळाकृती जोत्याचा भागच आज सुस्थितीत आहे. त्याचा व्यास ७६मी. आहे. स्तूपाची उंची महावंशानुसार सु. ८२मि. होती, परंतु सद्यकालीन उंची ५५मी. आहे. स्तूप व विहारांचे बांधकाम विटांचे आहे. महावंशानुसार येथील लोहप्रासाद नऊ मजली असून त्याची उंची ४६मी. होती व छप्पर तांब्याच्या पत्र्यांचे व रत्नजडित होते, अशी माहिती मिळते. येथील प्राचीन स्नानगृहे रोम व पाँपेई येथील स्नानगृहांची आठवण करून देतात तर कालवापी व विलान सरोवरे आधुनिक तलावांची प्रतिमाच वाटतात. येथील प्राचीन बोधिवृक्ष कालवापी सरोवराच्या काठी आहे. तो २,२०० वर्षांचा जुना असून गया येथील मूळ बोधिवृक्षाच्या फांदीपासून फोफावला  आहे. ही फांदी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र याच्याकरवी तेथील तिस्स राजास भेट दिली होती. हा बोधिवृक्ष अद्यापि जिवंत असून बौद्ध भिक्षूंच्या यात्रेचे एक प्रमुख आकर्षण आहे. तेथील सरोवराच्या काठी पूर्वी जैन, आजीविक व इतर धर्मांच्या संन्याशांना राहण्यासाठी विहार बांधलेले होते. स्तूप आणि विहार हे सर्वसाधारणतः इ.स.पू. ३००ते इ.स. ३०० ह्या काळातील आहेत. येथील सर्व वास्तूंवर दक्षिण भारतीय वास्तुशिल्पाचा ठसा उमटलेला दिसतो, तर मूर्तिकामावर अमरावतीशैलीचा प्रभाव पडला आहे. सर्व अवशेषांत स्तूप वेगळे वाटतात. त्यांना सांचीप्रमाणे कठडे वा तोरणे नाहीत.

देशपांडे, सु. र.