श्रावस्ती : उत्तर प्रदेश राज्याच्या गोंडा जिल्ह्यातील बौध्दकालीन प्राचीन नगर. संस्कृत-बौध्द वाङ्‌मय आणि ⇨फाहियान ( इ. स. ३४०-४२२), ⇨ह्यूएनत्संग (यूआनच्वांग- इ. स. ६०२-६६४) ह्या चिनी प्रवाशांचे वृत्तांत यांमधून श्रावस्तीविषयी माहिती ज्ञात होते. पाली आणि अर्धमागधी भाषांतील ‘ सावठ्ठी ’ या शब्दाचे श्रावस्ती हे

बुद्धाचा महाचमत्कार : गांधार शैली, इ.स. दुसरे-चौथे शतक, श्रावस्ती.संस्कृत रूप होय. तिथे वास्तव्यास असणाऱ्या सावठ्ठ या साधूवरून हे नाव रूढ झाले आहे. श्रावस्तीच्याच परिसरात आधुनिक साहेत-माहेठ ही जुनी गावे आहेत.बलरामपूरच्या दक्षिणेला १६ किमी. व अयोध्येच्या उत्तरेस सु. ९६ किमी.वर राप्ती ( अचिरावती ) नदीकाठी श्रावस्ती आहे. बौद्धांच्या पाली वाङ्‌मयात सावित्थी असा श्रावस्तीचा उल्लेख असून, जैन वाङ्मयात त्यास चंद्रपूर वा चंद्रिकापुरी म्हटले आहे. विष्णुपुराण  हरिवंशपुराण यांच्या मते ते युवनाश्व राजाचा मुलगा श्रावस्त याने वसविले, म्हणून त्यास श्रावस्ती नाव पडले. वायुपुराणा नुसार श्रावस्त हा इक्ष्वाकू राजाच्या विकुक्षी या मुलाचा सहाव्या पिढीतील वारस असून, त्याच्या वडिलांचे नाव आंध होते तर मत्स्यब्रह्म पुराणांनुसार श्रावस्त हा युवनाश्वाचा मुलगा आणि आद्र ( आंध्र) याचा नातू होय. महाभारताप्रमाणे श्रावस्तक हा श्रावचा मुलगा आणि युवनाश्वाचा नातू होय. वायुपुराणा नुसार दाशरथी रामाने आपले राज्य लव व कुश यांत विभागले, तेव्हा श्रावस्ती लवाला मिळाली. गौतम बुद्धाच्या वेळी ( इ. स. पू. सु. ६२३५४३) श्रावस्ती प्राचीन ⇨कोसल देशाची राजधानी होती व प्रसेनजित ( पसेनदी ) हा राजा होता. त्यावेळी ते वैदिक धर्माचे केंद्र होते. प्रसेनजिताने बुद्धाची राजगृह येथे भेट घेतली आणि तो त्याचा अनुयायी बनला. त्यानंतर त्याचा खजिनदार व एक श्रेष्ठी अनाथपिंडिक बुद्धाकडे गेला असता, बुद्धाने ‘ सुदत्त’ या मूळ नावाने त्यास हाक मारली, तेव्हा तो चकित झाला आणि बुद्धाचा अनुयायी झाला. त्याने बुद्धाला श्रावस्तीस येण्याचे निमंत्रण दिले व त्याच्याकरिता जेतवन नावाचे उद्यान जेत राजपुत्राकडून त्याच्या म्हणण्यानुसार जमीन झाकण्याकरिता जितक्या सुवर्णमोहरा लागतील, तेवढया देऊन खरेदी केले आणि त्या ठिकाणी जेतवनविहार बांधला. या प्रसंगाचे शिल्पांकन बौद्ध शिल्पांतून आढळते. पुढे बुद्ध या विहारात सु. चोवीस वर्षे राहिले. त्यांनी येथनूच मज्झिम निकायता तील ६५ सूत्रे आणि विनयपिटका तील ३५० पैकी २९४ शिक्षापदे सांगितली. अनाथपिंडिकानंतर मिगार श्रेष्ठी, त्याची सून विशाखा व अन्य अनेकांनी बुद्धाचे अनुयायित्व स्वीकारले. विशाखाने बुद्ध व त्याच्या भिक्षुसंघाकरिता पूर्वाराम नावाच्या उद्यानात एक प्रासाद बांधला. जेताने जेतवनात गंधकुटी व कोसंबकुटी नावाचे दोन मठ बांधले.

बौद्धांप्रमाणे श्रावस्ती जैनांचेही पवित्र स्थान आहे. येथे तिसरे जैन तीर्थंकर संभवनाथ व आठवे तीर्थंकर चंद्रप्रभनाथ यांचा जन्म झाला. महावीरांनी एक चातुर्मास या ठिकाणी वास्तव्य केले होते. जैनांतर्गत ⇨आजीवक शाखेचे हे एक प्रमुख स्थान असून जैन धर्माच्या अध्ययनाचे ते केंद्र होते. श्रावस्तीत संभवनाथांचे मंदिर बांधले होते. त्याचे अवशेष अदयापि आढळतात. आजीवकांचा नेता मंखलीपुत्र गोशाल याने महावीरांची भेट इथेच घेतली आणि जैन धर्म अंगीकारला. श्रावस्तीतच जैनांची आठ महा-निमित्ते आणि दोन मग्गन या जैन संस्कार प्रकरणांची रचना झाली. बौद्ध-जैन धर्मांप्रमाणेच ते ब्राह्मण ( हिंदू ) धर्माचे एक महत्त्वाचे स्थान होते. नालजंघ आणि संजय आकासगोज हे दोन विव्दान ब्राह्मण राजदरबारात होते. त्यामुळे नगरात वैदिक अध्ययनाच्या संस्था असून त्यांचे प्रमुख त्रैविदयांत पारंगत होते. एक धार्मिक स्थान म्हणून श्रावस्तीचे माहात्म्य इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंत असल्याचे दाखले मिळतात मात्र फाहियान या चिनी प्रवाशाच्या वृत्तांतात श्रावस्तीच्या अवनत अवस्थेचे चित्र असून, तो जेतवनाराममध्ये बुद्ध प्रतिमा पाहिल्याचा उल्लेख करतो. त्यानंतर भारतात आलेल्या यूआनच्वांग या चिनी प्रवाशास उजाड व उदध्वस्त श्रावस्ती पहावयास मिळाली. दीपंकर श्रीज्ञान (९८२-१०५४) या बौद्ध आचार्याने या स्थळास भेट दिली होती.


 ⇨सर अलेक्झांडर कनिंगहॅम ने १८६३ मध्ये श्रावस्तीत प्रथम उत्खननास सुरूवात केली. त्यानंतर त्याचे काम डब्ल्यू. सी. बेनेटने पुढे नेले. त्याने पक्की कुटी टेकाडात उत्खनन केले. पुढे कनिंगहॅमने पुन्हा १८७६ मध्ये साहेत येथे उत्खनन केले. त्यात त्याला सोळा वास्तू , विशेषत: स्तूप व नंतरच्या काळातील काही मंदिरे आढळली. त्यांतील एका स्तूपात एक बोधिसत्त्वाची भव्य मूर्ती आढळली. कनिंगहॅमच्या उत्खननाच्या वेळीच डब्ल्यू. होये याने माहेठ येथे उत्खनन केले. त्याला शोभनाथ या जैन मंदिराच्या परिसरात काही मूर्ती मिळाल्या. पुढे त्याने १५ डिसेंबर १८८४ ते १५ मे १८८५ दरम्यान विस्तृत उत्खनन केले. त्यातून साहेत-माहेठ या दोन्ही ठिकाणच्या अनेक वास्तू उजेडात आल्या. त्याच्या उत्खनित अवशेषांतएक इ. स. १११९ चा कोरीव लेख मिळाला. त्यात कनौजचा गहडवाल राजा मदनपाल याचा मंत्री ( सल्लगार ) विदयाधर याने बौद्ध भिक्षूंसाठी संघाराम बांधल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर या ठिकाणी जे. पी. फोगेल याने १९०८ मध्ये दयाराम सहानी यांच्या सहकार्याने उत्खनन केले. त्याचा वृत्तांत पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध झाला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने येथे विस्तृत उत्खनन केले. कनिंगहॅमचे उत्खनन यूआनच्वांगने उल्लेखिलेल्या स्थळांचा शोध घेणे हा होता. त्याला जेतवन भागात सव्वादोन मी. उंचीची एक बोधिसत्त्व विशीर्ष मूर्ती मिळाली. ज्या भागात मूर्ती सापडली, तिथे कोसंबीकूट विहार आणि त्याच्या उत्तरेला गंधकुटी विहार असावा, असे त्याचे मत होते.विविध उत्खननांत बुद्ध पूर्वकाळातील राखी मृत्पात्रापासून गुप्तकाळाअखेरपर्यंतचे विविध अवशेष उपलब्ध झाले. त्यांत जैनमूर्ती, बोधिसत्त्वादिकांच्या मूर्ती, मातीच्या मूर्ती, नाणी, स्तूप, तटबंदी, काही कोरीव लेख आणि सु. ३०० मृण्मूर्तींचे शिल्पपट्ट इ. अवशेष आहेत. यांतील विदयाधराचा इ.स. १११९ चा शिलालेख, अवलोकितेश्वराच्या मूर्तीखालील दोन ओळींचा संस्कृत लेख आणि गहडवाल राजा गोविंदचंद्र याचा तामपट हे महत्त्वाचे होत. येथील मूर्ती आरक्त वालुकाश्मात घडविलेल्या असून शैलीकरण दृष्ट्या त्या कुशाणकालीन मथुराशैलीच्या आहेत. प्राचीन काळी सु. साडेचार किमी. परिघाच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या तटबंदीयुक्त परिसरात हे नगर वसले होते. तटाला भव्य प्रवेशव्दारे होती. मौर्यपूर्व व मौर्यकाळातील एका स्तूपात अस्थींचे अवशेष मिळाले. याशिवाय भाजलेल्या मातीच्या कोरीव पट्टांत रामायणा तील प्रसंगांचे चित्रीकरण असून ते लखनौच्या मध्यवर्ती संगहालयात ठेवले आहे. विदयमान माहेठच्या नैऋर्त्येला सु. अर्धा किमी.वर साहेत आहे. तिथे म्यानमारमधील ( ब्रह्मदेश ) बौद्ध धर्मीयांनी एक स्तूप व धर्मशाळा बांधली आहे, तसेच एक चिनी बौद्ध स्तूपही आढळतो.

संदर्भ : 1. Bapat, P. V. 2500 Years of Buddhism, New Delhi, 1997.

            2. Singh, Nagendra Kr. Ed. International Encyclopedia of Buddhism : India, Vol. 33. New Delhi, 1977.

            ३. नागर, मदन मोहन, श्रावस्ती, लखनऊ, १९५६.

देशपांडे, सु. र. देगलूरकर, गो. बं.