माचू-पिक्चू या इंका नगरीतील अवशेषमाचू-पिक्चू : प्राचीन इंका संस्कृतीचे हे परकोटयुक्त नगर दक्षिण-मध्य पेरू देशातील अँडीज पर्वतराजीत वसले असून ते कुझ्कोपासून वायव्येस सु. ७५ किमी. वर आहे. उरंबा नदीच्या खोल दरीच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या दोन उंच सुळक्यात वसलेल्या या नगरीचा शोध हिरॅम बिंगहॅमने १९११ मध्ये लावला. त्याला येथील अवशेष जवळजवळ जसेच्या तसे आढळून आले. कोलंबसपूर्व काळच्या उद्ध्वस्त न झालेल्या थोड्या नागरी ठिकाणापैकी हे एक आहे. येथील वस्ती १३ चौ. किमी. क्षेत्रफळात झाली असून त्यातील घरे, एक मंदिर, बालेकिल्ला इ. वास्तू अवशिष्ट आहेत. हा प्रदेश उंचसखल असल्याने अनेक दगडी जिन्यांची योजना माचू-पिक्चूच्या रहिवाशांना करावी लागली. अशा जिन्यांच्यासु. ३,००० पायऱ्यांनी येथील वास्तू एकमेकांना जोडल्या आहेत तसेच येथील भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊन उंच उंच ठिकाणी बागाही केलेल्या असाव्यात. 

वास्तूकाम, खापरांची उकृष्ट भांडी आणि धातुकाम ही इंका संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये येथे आढळतात. या लोकांना विणण्याची कलाही अवगत होती. नागरी भागातील लोक विणकाम करीत तर ग्रामीण भागातील लोक शेती करीत. या संस्कृतीने वीरकोचा हा निर्माता देव मानला होता तर इंटी म्हणजे सूर्य देवतेचे मंदिर व सुवर्ण प्रतिमाही निर्माण केल्या होत्या. पावसासाठी अपु-इलापु या कृषी-देवतेची उपासना हे लोक करीत. 

वास्तुशैलीच्या दृष्टीने येथील वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रचंड आणि सुबकपणे तासलेल्या शिळा वास्तूंत वापरलेल्या आहेत. वास्तुकामात सांधण्यासाठी चुना किंवा तत्सम द्रव्याचा उपयोग न करता वास्तूचे संतुलन न बिघडेल अशा रीतीने दगड एकमेकांवर रचून येथील इमारती उभारलेल्या होत्या.

इ. स. १५३२ मध्ये स्पॅनिशांनी इंका साम्राज्याचा नाश केला, त्यावेळी त्यांना माचू-पिक्चूचा सुगावा लागला नाही. त्यामुळे ही नगरी अनाघ्रात राहिली होती.

पहा : इंका.

संदर्भ : Cottrell, L. Concise Encyclopaedia of Archaeology, London, 1960.

देव, शां. भा.