कॉरिंथ : ग्रीसमधील कॉरिंथिया प्रांताची राजधानी. लोकसंख्या २०,७७३ (१९७१). हे अथेन्सच्या पश्चिमेस सु. ६४ किमी. वर एका आखातावर वसले आहे. प्राचीन ग्रीसमधील कॉरिंथ हे समृद्ध व्यापारी शहर होते. सध्याचे कॉरिंथ हे नवे शहर असून प्राचीन कॉरिंथच्या नैर्ॠत्येस आहे. १८५८ मधील भूकंपात कॉरिंथ नष्ट झाले, ते पुन्हा वसविण्यात आले, परंतु तेही १९२८ च्या भूकंपात उद्ध्वस्त झाले. सध्याचे कॉरिंथ उत्तम बंदर, दळणवळणाचे केंद्र आणि मद्य व रेझिन यांचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

इ.स.पू. आठव्या-सातव्या शतकांत कॉरिंथ नगरराज्याचे सभोवतालच्या सागरी प्रदेशावर स्वामित्व प्रस्थापिले होते आणि सिराक्यूस, कॉर्फ्यू, पॉटिडॅईआ आणि ॲपोलोनिया या प्रदेशांत त्याने वसाहती स्थापल्या होत्या. मृत्पात्रे व जहाजबांधणी या धंद्यांत ते खूपच प्रगतिपथावर होते. त्यांच्या वैभवाचा उल्लेख होमरने आपल्या काव्यात केला आहे. अथेन्स तुल्यबळ असल्यामुळे कॉरिंथचे शत्रू, तथापि कॉरिंथयन युद्धाच्या वेळी (इ.स.पू. ३९५-३८७) स्पार्टाविरूद्ध कॉरिंथने अथेन्सचे साहाय्य घेतले. पेरीअँडरच्या नेतृत्वाखाली कॉरिंथने अनन्यसाधारण प्रगती केली. पुढे कॉरिंथवर मॅसेडोनिया (इ.स.पू. ३८८), रोम (इ.स.पू. १४६) इत्यादींचे हल्ले झाले. ज्यूलियस सीझरने (इ.स.पू. ४४) उद्ध्वस्त झालेले कॉरिंथ पुन्हा वसविले. सेंट पॉलने तेथे चर्च स्थापन केले. ऑगस्टसने ते ॲकिया प्रांताचे राजधानीचे ठिकाण केले. तथापि, १,३०० वर्षे व्यापारउदिमात पुढारलेले कॉरिंथ १२०४ नंतर अवनतीस लागले व लॅटिन, तुर्की आदी अंमलांखाली याची पिछेहाट झाली. उत्खननातील अवशेषांत अपोलो देवतेचे मंदिर व बाजार (ॲगोरा) यांचे अवशेष महत्त्वपूर्ण आहेत.

 

देशपांडे, सु. र.