मॉर्तीये, गाब्रिएल : (२९ ऑगस्ट १८२१–२५ सप्टेंबर १९९८). फ्रेंच पुरातत्त्वज्ञ व मानवशास्त्रज्ञ. त्याचे पूर्ण नाव ल्वी लॉरां गाब्रिएल मॉर्तीये. फ्रान्समधील मेलान (इझॅर) या गावी जन्म. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्याचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. त्यानंतर तो वृत्तपत्रव्यवसायाकडे वळला पण त्याच्या शासनविरोधी प्रचारामुळे त्यास १८४८ च्या क्रांतीनंतर कारावासाची शिक्षा झाली. ती चुकविण्यासाठी तो भूमिगत झाला आणि परदेशांत, विशेषतः इटली व स्वित्झर्लंड येथे राहिला. स्वित्झर्लंडमधील त्याने जिनीव्हा येथील नॅचरल हिस्टरी म्यूझियममध्ये नोकरी धरली. येथील अनुभवातून स्वित्झर्लंडमधील सरोवर-वस्तीचा अभ्यास करण्याची त्याला संधी मिळाली. परिणामतः १८६४ मध्ये पॅरिसला परतल्यानंतर त्याने उर्वरित जीवन पुरातत्वीय अवशेषांचा अभ्यास करण्यात व्यतीत केले. त्याची सँ जर्‌मँ वस्तुसंग्रहालयाचा अभिरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८६८). या पदावर तो सु. १७ वर्षे होता. पुढे त्याची पॅरिस येथील ‘स्कूल ऑफ अँन्थ्रपॉलॉजी’ या संस्थेत प्रागैतिहासिक मानवशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८७६–९८). या पदावर असतानाच तो सँ जर्‌मँ आं लॅ येथे मरण पावला.

मॉर्तीये याने मानवाच्या प्रागितिहासातील सांस्कृतिक विकासाचे महत्त्व प्रथमतः कालक्रमानुसार वर्गीकरण करून सूत्ररूपाने प्रतिपादन केले. पुराणाश्मयुगाचे त्याने शेलीअन, अश्यूलियन, मौस्टेरियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन इ. कालखंड पाडले. ते आजतागायत ग्राह्य मानले जातात. मानवशास्त्रीय वर्गीकरणासाठी ते वापरले. मॉर्तीयेच्या आल्पस् पर्वतराजींच्या परिसरातील पुराजीवविज्ञान आणि भूविज्ञान यांच्या अभ्यासाचे सार जेओलोजी एमिनेरालॉजी द् ला साव्हा (१८५८) या ग्रंथात आढळते. त्याचे सांस्कृतिक विकासाचे वर्गीकरण ला प्रिइस्तोरीक आन्तिकिते द् लॉम (१८८२) या बृहद्ग्रंथात आढळते.

देशपांडे, सु. र.