हॉलस्टॅट : ऑस्ट्रियातील ब्राँझ व लोहयुगीन अवशेषांचे प्राचीन स्थळ. इ. स. पू. सातव्या शतकात लोहवस्तू निर्मितीचे ते एक मोठे केंद्र होते. त्यावरून हॉलस्टॅट ही संज्ञा आधुनिक काळात प्रामुख्याने उत्तर ब्राँझयुग आणि सुरुवातीचे लोहयुग म्हणजे साधारणतः इ. स. पू. ११०० नंतरच्या सांस्कृतिक काळासाठी वापरली जाते. या ठिकाणी १८४६ आणि १८९९ दरम्यान उत्खनने करण्यात आली. त्यांमध्ये सु. २,००० थडगी आढळली. 

 

कालखंडानुसार हॉलस्टॅटचे दोन समूह असून पहिला समूह इ. स. पू. ११००–१००० ते ८००–७०० आणि दुसरा इ. स. पू. ८००–७०० ते ४५० या काळातील आढळला. प्रागैतिहासिक काळात येथे स्मशानभूमीजवळ मिठाची खाण होती. खाणीच्या जवळच खाणीत काम करणाऱ्या कामगारांची वस्ती होती. या कामगारांची अनेक प्रेते, खाण खोदण्याची हत्यारे, ब्राँझचे विळे, कट्यारी, तलवारी, कुर्‍हाडी तेथे सापडल्या. यांशिवाय मृतांची राख ठेवलेले अनेक घटही मिळाले. खाणीत काम करणाऱ्या लोकांनी उपयुक्त प्राणी पाळण्याची प्रथा प्रचलित करून स्वतःकरिता लाकडी घरे बांधली होती. लोहयुगाच्या वस्तीचा पुरावाही येथे विस्तृत प्रमाणावर सापडला. येथील अवशेषांचे अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यात येते परंतु त्या वर्गांच्या काळाविषयी पुरातत्त्वज्ञांत एकमत नाही. ‘अ’ वर्गात लोहाचा अत्यल्प वापर होई परंतु व्हिलानोव्हन (इटलीतील लोहयुगाचा) प्रभाव त्यात स्पष्ट दिसतो. तसेच पातळ कडा असलेली मृत्पात्रे आढळली असून त्यांवर धातूचा प्रभाव जाणवतो. ‘ब’ वर्गातील अवशेषांत ब्राँझचा वापर सर्रास आढळतो आणि मृत्पात्रे सुबक आहेत. ‘क’ वर्गातील मृत्पात्रे बहुरंगी असून त्यांवर रेखांकन नाही लोखंड व ब्राँझच्या शंक्वाकृती तलवारी यात आढळल्या असून पंखाकृती कुर्‍हाडही आढळली. ‘ड’ वर्गात दुधारी खंजीर, तलवार व अंगठी वगैरे धातूचे दागिने मिळाले आहेत. एकूणच हॉलस्टॅट कला ही प्रामुख्याने भौमितिक कलाशैलीची असून तिच्यात सौंदर्यापेक्षा तांत्रिकतेला अधिक महत्त्व दिलेले आढळते. लोहयुगीन हॉलस्टॅट संस्कृतीचा काल इ. स. पू. सातवे-सहावे शतक असा असला, तरी इ. स. पू. पाचव्या शतकात यूरोपातील पश्चिमेकडील प्रदेशात, विशेषतः नैर्ऋत्य जर्मनीत, तिचा खूप प्रसार झाला. 

 

संदर्भ : Hawkes, C. F. C. Proceedings of the Prehistoric Society, London, 1948. 

देव, शां. भा.