मृत समुद्र लेख: (डेड सी स्क्रॉल्स). पॅलेस्टाइनमधील मृत समुद्राकाठच्या डोंगरातील कुमरान जवळच्या गुहांत सापडलेली हस्तलिखिते. यांचा शोध अगदी अनपेक्षित रीत्या १९४७ साली लागला. एका मेंढपाळास यातील एक हस्तलिखित सापडले. यानंतर एकामागून एक असे नवीन लेख सापडत आहेत. पुरातत्त्वज्ञांनी येथे प्रथम १९५१ मध्ये प्रायोगिक उत्खनन केले. आतापर्यंत अकरा गुहा ज्ञात झाल्या असून यांतील काही नैसर्गिक आहेत, तर काही मुद्दाम खोदलेल्या कृत्रिम गुहा आहेत. यांतील लेख प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत: जुन्या करारासंबंधीचे व इतर अन्य लेखन. त्यात इसाहच्या दोन प्रती, हबाक्‍कुकवरील टीका (मिट्राश), लॅमेकची अपोकॅलिप्सी, कुमरानच्या साधूंसाठी लिहिलेली आचारसंहिता, भक्तिगीते, ऋणनिर्देशक श्लोक आदींचा समावेश होतो. यातील मजकूर बायबलच्या जुन्या कराराशी जुळणारा, पण सध्या ज्ञात असलेल्या त्याच्या हस्तलिखितापेक्षा एक हजार वर्षांनी प्राचीन आहे. यावरून इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पूर्वार्धातील व त्या आधीचे ख्रिस्ती मुनिजीवनाचे आणि धार्मिक रिवाजांचे चित्र प्रत्यायास येते. यातील काही लेख जवळजवळ सहा मीटर लांबीचे आहेत आणि ते हिब्रू, ॲरेमिक व ग्रीक अशा तीन भाषांत लिहिलेले आहेत. 

संदर्भ : 1. Allegro, J. M. The Treasure of the Copper Scroll, Doubleday, 1964.

             2. Mansoor, M. The Dead Sea Scrolls, Brill, 19-4.

             3. Mowry, Lucetter. The Dead Sea Scrolls and the Early Church, Chicago, 1962.

देव. शां. भा.