वत्स, माधोस्वरूप : (? − ?). भारतातील प्रसिद्घ पुरातत्त्वज्ञ व भारतविद्याविषयक चिकित्सक अभ्यासक. त्यांच्या जन्माविषयी तसेच बालपणाविषयी थोडीही माहिती उपलब्ध नाही. ऐन तारूण्यात त्यांना प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधनाचा छंद जडला आणि त्यांनी भारतीय सर्वेक्षण खात्यात नोकरी धरली. सर जॉन ह्यूबर्ट मार्शल या प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्याच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सिंधू संस्कृतीतील हडप्पा या शहराच्या उत्खननात १९२०-२१ दरम्यान त्यांनी काम केले. पुढे १९३३-३४ मध्ये त्यांनी याच परिसरात पुन्हा उत्खनन केले. ही दोन्ही उत्खनने भारतीय सर्वेक्षण खात्यामार्फत करण्यात आली होती. माधोस्वरूपांनी दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत प्रस्तुत उत्खननाचे तपशीलवार अहवाल दोन खंडांमध्ये प्रसिद्ध केले आहेत. (१९४०). १ जुलै १९५० रोजी त्यांची पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या महानिदेशकपदी नियुक्ती करण्यात आली. या पदावरून ते २ मार्च १९५३ रोजी निवृत्त झाले. या कालखंडात त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने अनेक मौलिक कामे केली. भारतात एतिहासिक दृष्ट्या अनेक प्राचीन वास्तू इतस्ततः विखुरलेल्या असून त्यांच्याकडे संशोधकांचे फारसे लक्ष गेलेले नव्हते. अशा सर्व राज्यांतील राष्ट्रीय स्मारकांची आणि ऐतिहासिक वास्तूंची सूची तयार करून यांतील अत्यंत महत्त्वाच्या व मूल्यवान वास्तूंची डागडुजी करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

माधोस्वरूप यांचा लिपिविषयक अभ्यास व संशोधन एपिग्राफिया इंडिया या शासकीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या ताम्रपट व शिळालेख यांच्या वाचनावरून ज्ञात होते. प्रस्तुत नियकालिकातून त्यांनी पृथ्वीचंद्र भोगशक्ती याचे दोन ताम्रपट, कार्ले लेण्यातील ब्राह्मी लेख, प्रथम ध्रुवसेन (मैत्रिक राजा) याचा ताम्रपट, विजयादित्य चालुक्य राजा, तिसरा जयभट गुर्जर राजा (अंजनेरी लेख), अवंतिवर्माचा सोहंग येथील मृण्मुद्रेवरील लेख. इ. लेखांचे वाचन प्रसिद्ध केले आहे. तत्संबंधी फारसे वादविवाद उद्भवले नाहीत. त्यावरून प्राचीन लिपींचे, विसशेषतः ब्राह्मी लिपीचे, त्यांचे ज्ञान सर्वश्रुत होत.

भारतीय मंदिर वास्तुशैलीविषयी त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. देवगड येथील गुप्तकालीन मंदिराचे विधान, वास्तुशैली, पंचायतन वास्तुवैशिष्ट्ये आणि तेथील शिल्पशैली यांचे वत्स यांनी टिपलेले बारकावे, आजही कलासमीक्षकांना उपयुक्त ठरतात. तत्संबंधीचा आपला अहवाल त्यांनी मेम्वाअर्स ऑफ द आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, खंड-७० (१९५१) यात प्रसिद्ध केला आहे.

गोखले, शोभना