मेडन कॅसल  : दक्षिण इंग्लंडमधील डॉर्सेट परगण्यातील डॉर्चेस्टर या गावाच्या नैर्ऋत्येस असलेले प्राचीन अवशेषांचे स्थळ. या स्थळाचे उत्खनन १९३० साली ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर मॉर्टिमर व्हीलर यांनी केले. या उत्खननात नवाश्मयुगापासूनच्या वसत्यांचे अवशेष उपलब्ध झाले. शेवटच्या वसतीचा पुरावा इ. स. चौथ्या शतकात बांधल्या गेलेल्या रोमन-केल्टित मंदिराच्या स्वरूपात मिळाला. नवाश्मयुगीन वैशिष्ट्यपूर्ण वसाहत, लोहयुगातील जवळपास वीस हेक्टर विस्ताराचा टेकडीवरील किल्ला आणि उत्खननात वापरलेली शास्त्रीय पद्धती ही या स्थळाची संशोधन वैशिष्ट्ये मानली जातात. नवाश्मयुगीन वस्तीभोवती दुहेरी खंदक होता. इ. स. पू. पाचव्या शतकात लोहयुगीन वसती, टेकडीवर विस्तृत किल्ला बांधून करण्यात आली. किल्ल्यात दगड आणि लाकडी वासे यांचा वापर करून गोल आणि चौकोनी घरे बांधण्यात आली. इ. स. पू. दुसऱ्या शतकात तटबंदी दोन वेळा मजबूत करण्यात येऊन काही ठिकाणी दुहेरी व काही ठिकाणी तिहेरी तटबंदी उभारली गेली. याशिवाय पहारेकऱ्यांच्या खोल्या, भ्रमात पाडणारे दरवाजे आणि गोफणीने मारा करण्यासाठी उंच चौथरे निर्माण करण्यात आले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन सैन्याने हे ठिकाण काबीज केले आणि तेथील वसती दुसरीकडे हलविली. या युद्धात कामी आलेल्यांच्या स्मशानभूमीच्या उत्खननात अनेक सांगाडे सापडले. त्यांतील एकाच्या मणक्यात लोखंडी बाणाग्रासारखे हत्यार अडकल्याचा पुरावा दिसून आला. यानंतर मेडन कॅसलचे महत्त्व कमी झाले. मात्र तेथे इसवी सनाच्या चौथ्या शतकातही थोडीफार वसती होती, असा पुरावा मिळाला. ऐतिहासिक पुराव्यापेक्षा व्हीवर यांनी वापरलेले अचूक शास्त्रीय तंत्र आणि पद्धतशीरपणे नोंदविलेला पुरावा, यांसाठी हे उत्खनन प्रख्यात ठरले आहे.

संदर्भ : Wheeler, R. E. M. Maiden Castle-Dorset, London, 1943.

देव, शां. भा.