सोमपूर : बांगला देशातील एक प्राचीन बौध्द अवशेषांचे स्थळ. ते राजशाही जिल्ह्यात नाटोरच्या उत्तरेला सु. ६४ किमी.वर वसले आहे. त्याला सोमपुरी व ओंपूर म्हणत. विद्यमान पहाडापूर म्हणजेच प्राचीन सोमपूर होय. इथे विसाव्या शतकाच्या मध्यास उत्खनने झाली. त्यात येथील एक उत्तुंग जैन मंदिराचे व बौध्द विहाराचे अवशेष आढळले. अशा प्रकारचे मंदिर भारतात अन्यत्र कुठेच आढळत नाही, असे तज्ञ पुरातत्त्ववेत्त्यांचे म्हणणे आहे. प्राचीन वास्तुशिल्पशास्त्रावरील ग्रंथांत या प्रकाराला सर्वतोभद्र असे नावा दिलेले आढळते. सोमपूरचा प्राचीन इतिहास ४७९ च्या एका ताम्रपटावरून ज्ञात होतो. त्यात एक ब्राम्हण दांपत्याने (नाथसर्मा व रामी) एका जैन मंदिराच्या देखभालीसाठी जमीन दिल्याचा उल्लेख असून जैनधर्मी गुहनंदी हा तिथे प्रमुख (पुजारी) होता. ताम्रपटात तेथील स्थानाचा उल्लेख वट-गोहाळी (गोपालनाची भूमी) असा केला असून अद्यापि पहाडपूर शेजारच्या खेड्याला गोआपारा असे म्हणतात. ह्यूएनत्संग (सु. ६०२–६६४) याने ६३९ मध्ये या स्थानाला भेट दिली होती. तेव्हा त्याला तुरळक बौध्द वास्तू (स्तूप) आढळल्या तथापि जैन धर्मीय नग्न निरग्रंथ तिथे अनेक असून त्यांच्या बस्त्या विपुल प्रमाणात असल्याचे त्याने नोंदविले आहे. पुढे पाल वंशाच्या कारकीर्दित (सातवे ते अकरावे शतक) बौध्दधर्माला उर्जितावस्था प्राप्त झाली आणि धर्मपाल (७८०–८१५) व त्याचा मुलगा देवपाल (सु. ८१५–८५५) यांनी अनेक विहार बांधून बौध्द धर्माचा उत्तरेत प्रसार-प्रचार केला. धर्मपालाने महाविहार जैन मंदिराच्या भग्न अवशेषांवर बांधला आणि त्यास सोमपूर हे नाव दिले. तो धर्मपाल महाविहार म्हणून प्रसिध्द असून त्याच्या वास्तुरचनेत जैन मंदिराचे अनेक वास्तुघटक पुरातत्त्वज्ञांना उत्खनांत आढळले. किंबहुना या प्राचीन जैन मंदिराला पुर्नप्रतिरूप देऊन धर्मपालाने विहार बांधला असावा, असा उल्लेख शिला कोरीव लेखात व अनेक मृण्मुद्रावरील लेखांत आढळतो. विहाराची लांबी दक्षिणोत्तर सु. १०७ मी. व पूर्वपश्‍चिम रुंदी सु. ९४ मी. असून त्यास उत्तराभिमुख द्वार होते. त्याचे विधान चतुरमुख किंवा चौमुख होते आणि मधल्या प्रांगणाभोवती बेदी होती तज्ज्ञांच्या मते ही वास्तू तीन मजली होती. मंदिराच्या चौथज्यावर सर्वत्र हिंदू व बौध्द देवदेवतांच्या सु. ३००० मूर्ती बसविल्या होत्या आणि सु. ६० पाषाणमूर्ती असून परिसरात लहान स्तूप होते. विहाराभोवती प्राकार असून त्याच्या आतील बाजूस भिक्षूंसाठी १७७ खोल्या होत्या. त्यात बैठका असून स्थंडिल आहे मात्र दगडी बिछाने नाहीत. प्राकाराच्या पूर्व भिंतीला लागून पद्मानदीचा एक आगममार्ग (चॅनेल) पूर्वी वाहत असे. आता तो शुष्क आहे. या विहारात सु. ६०० ते ८०० भिक्षू राहात असत. सोमपुरी हे विद्याकेंद्र तिथे होते आणि तत्कालीन नालंदा, विक्रमशीला, ओदंतपुरी या प्राचीन विद्यापीठांप्रमाणे त्यास महत्त्व प्राप्त झाले होते. तिबेटला जाण्यापूर्वी अतीश दीपकार श्रीज्ञान व त्याचा गुरू रत्नाकरशांती या दोघांचे वास्तव्य सोमपूरीत होते. दीपंकार याने ध्यमिक रत्नदीप या संस्कृत ग्रंथाचे तिबेटीत भाषांतर केले. तसेच प्रज्ञाश्री श्रीज्ञानकीर्ती याने धर्मकाय-दीपविधी या ग्रंथाचे तिबेटीत भाषांतर केले. या विद्वानांत वैरोचन रक्षित नावाचा तंत्रधर्माचा साधू होता. तो नालंदा व विक्रमशीला इथेही काही वर्षे राहिला. तंत्रधर्मावरील विपुल ग्रथांची सोमपुरीत निर्मिती झाली तसेच तारानाथाने तंत्रविद्येच्या साह्याने सिध्दी प्राप्त करून घेतलेल्यास मंत्रवज्राचार्य असे नाव दिले आहे. वीर्येंद्र नावाच्या आणखी एका विद्वानाचा उल्लेख आढळतो. बाराव्या शतकात या विद्याकेंद्राचा नाश मुस्लिमांच्या आक्रमणात झाला.

पहा : पहाडपूर पालवंश.

देशपांडे, सु. र.