नाल : पाकिस्तानातील ब्राँझयुगीन वसाहतीचे एक स्थळ. ते दक्षिण बलुचिस्तानात हिंगोल (नाल) नदीकाठी कलात शहराच्या नैर्ऋत्येस सु. १५५ किमी.वर वसले आहे. येथील पुरातत्त्वीय टेकाडात सिंधू संस्कृतिपूर्व काही अवशेष मिळाले. हारग्रीव्ह्‌ज या संशोधकाने १९२४–२५ मध्ये येथे प्रथम उत्खनन केले. येथील अवशेषांत आढळलेली मानवी दफनभूमी व मृत्पात्रे तत्कालीन आम्री व कुल्ली संस्कृतीहून भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील दफनभूमीतील एकेका कबरीत सु. ५–६ मानवांचे अवशेष उपलब्ध झाले. काही दफनांत संपूर्ण मानवी सांगाडे सापडले, तर काहींत मोजकी हाडेच पुरलेली आढळली. यावरून आंशिक दफनाची पद्धत त्यावेळी प्रचलित होती, असे दिसते. काही कबरी कच्च्या विटांनी बांधलेल्या असून मृताबरोबर विविध वस्तू उदा., मणी, शंखांच्या बांगड्या, मण्यांच्या माळा, चपट्या काटकोनी तांब्याच्या कुऱ्हाडी, मेंढ्या व बकऱ्यांची हाडे इ. पुरण्याची प्रथा होती. येथील मृत्पात्रे आम्री व कुल्ली या तत्कालीन संस्कृतींपेक्षा अधिक आकर्षक, सुबक, वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असून ती किंचित पिवळसर छटेची आहेत. येथील एक उथळ भांडे (चिराद्य) व द्विचितिपात्र नावीन्यपूर्ण आहे. त्यांवर बहुरंगी चित्रकाम व नक्षीकाम केलेले असून त्यात अनेक आकृतिबंध आढळतात. नक्षीकामात विविध प्रकारचे भौमितिक रचनाबंध तसेच वनस्पती व प्राणी यांच्या आकृत्या आहेत. येथील घरांच्या बांधणीत साधा दगड व कच्ची वीट यांचा सर्रास उपयोग करीत. येथे अनेक मृदू दगडाच्या किंवा संगजिऱ्याच्या मुद्रा आढळल्या. त्यांतील काही मुद्रा स्यूसा येथील इ. स. पू. २४०० मधील मुद्रांशी साधर्म्य दर्शवितात. याशिवाय एक छिद्रांकित वजनाचा दगड आढळला. या संस्कृतीचे अवशेष प्रथम नाल येथे सापडल्याने तिला ‘नाल संस्कृती’असे नाव दिले गेले आहे.

देशपांडे, सु. र.