कांचीपुरम्‌: तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्ह्यातील प्राचीन धार्मिक क्षेत्र. लोकसंख्या १,१०,५०५ (१९७१). ते दक्षिण रेल्वेच्या चिंगलपुट-अर्कोणम्‌ मार्गावर, मद्रासच्या नैर्ऋत्येस ७२ किमी.वर, पालार (प्राचीन वेगवती) नदीकाठी वसले आहे. ह्या नगरास कच्चीपेद्दु, मलंग नगरी, कुरुंभरभूमी, सत्यव्रत क्षेत्रम्‌, तिरुपतिकुनरम्‌, कच्ची, कंची वगैरे विविध नावे प्राचीन साहित्य, विशेषतः संस्कृत व तमिळ वाङ्मय, तसेच भिन्नकालीन शिलालेख यांतून आढळतात. टॉलेमी व ह्युएनत्संग ह्या परदेशीय प्रवाशांनीही तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत. ह्युएनत्संगाने सातव्या शतकात कांचीपुरास भेट दिली होती. तत्संबंधी तो लिहितो, “ह्या सु. दहा किमी, परिसर असलेल्या नगरात शेकडो बौद्धमठ (विहार), ८० हिंदुमंदिरे, १०,००० बौद्ध भिक्षू आणि अनेक जैनसंप्रदायी लोक आहेत. गौतम बुद्धानेही ह्या स्थळास एकदा भेट दिली होती … ”.

पहिल्या शतकापर्यंत हे नगर बौद्ध धर्माचे विद्यापीठ मानले जाई. पुढे सातव्या शतकानंतर बौद्ध व जैन धर्माचा हळूहळू ऱ्हास होऊन पुढील शतकात ते आद्य शंकराचार्यांचे एक प्रमुख पीठ बनले. पतंजलीच्या महाभाष्यात (इ. स. पू. दुसरे शतक) कांचीचा उल्लेख आला असला, तरी त्याचा ज्ञात इतिहास इ. स. दुसऱ्या शतकापासूनचाच मिळतो. पहिली चोल राजांची सत्ता सोडता चौथ्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत कांची ही पल्लवांची राजधानी होती. पल्लवांकडून ती पुन्हा तेराव्या शतकापर्यंत चोलांकडे गेली व त्यानंतर चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत ती विजयानगरच्या वर्चस्वाखाली होती. या काळात मलिक काफूर व विजापूरचा सुलतान यांनी तीवर अनेक वेळा स्वाऱ्या केल्या, मात्र १६४५ मध्ये गोवळकोंड्याच्या सुलतानाने ती जिंकली. पुढे काही वर्षे मराठ्यांनी आणि नंतर औरंगजेबाने तीवर ताबा मिळविला होता. अठराव्या शतकात ब्रिटिशांतर्फे क्लाइव्हने ती अर्काटच्या नबाबांकडून १७५२ मध्ये घेतली. त्यामुळे तिचा उल्लेख ब्रिटिश लोक कांजीवरम्‌ ह्या नावाने करु लागले व ते नाव रूढ झाले.

या नगराचे शिवकांची (मोठी) व विष्णुकांची (लहान) असे दोन भाग प्राचीन काळापासून समजण्यात येतात. पालार नदीच्या दक्षिण काठी वसलेल्या समीपच्या तिरुपतिकुनरम्‌ ह्या भागास जैनकांची म्हणतात. पौराणिक साहित्यानुसार कांचीपूर हे भारतातील सप्तमोक्ष पुरींपैकी एक असून तिथे १०८ शैव आणि १८ वैष्णव मंदिरे आहेत. हे नगर पल्लववास्तुशिल्पाचे, म्हणजेच द्राविड वास्तुशैलीचे केंद्र समजले जाते. पल्लव-काळात बांधलेली कैलासनाथ (राजसिंहेश्वर), वैकुंठ पेरुमाल, महेंद्रवर्मेश्वर, मुक्तेश्वर, मतंगेश्वर ही मंदिरे द्राविडशैलीने नटलेली आहेत. प्रत्येक मंदिराचे विमान, शिखर व सभामंडप ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कैलास मंदिरातील गजप्रतिमा, अर्धनारीनटेश्वर, हास्यवदना पार्वती, व्याली वगैरे शिल्पे उल्लेखनीय आहेत. ह्या व इतर मंदिरांतील पल्लवांच्या युद्धप्रसंगाची उत्थितशिल्पे कलादृष्टया निर्जीव व काहीशी ओबडधोबड दिसत असली, तरी भित्तिचित्रे लक्षणीय आहेत. त्यांतून तत्कालीन कलेचे व संस्कृतीचे दर्शन घडते. पुढे चोल काळात ‘आलगर कोइल’, ‘पांडव पेरुमाल’ ही विष्णुमंदिरे व ज्वरहरेश्वर हे शिवमंदिर बांधले गेले. त्यांची शैली पल्लवशैलीची प्रगत अवस्था दर्शविते. हयावेळी पल्लवांची व्यालीकल्पना मागे पडली व स्तंभ आणि स्तंभशीर्षे अधिक उठावदार, घोटीव व नक्षीदार करण्यात येऊ लागली. नंतरच्या एकाम्रनाथ (एकांबरेश्वर) वगैरे मंदिरांतून विजयानगरच्या काळात प्रगल्भ झालेल्या द्राविडशैलीचे दर्शन घडते. वरील मंदिरांपैकी काहींचा जीर्णोद्धार करण्यात आला, तरी काहींमध्ये भर घालण्यात आली. एकाम्रनाथ मंदिराचे गोपुर कृष्णदेवराय (१५०९—१५२९) राजाने बांधले. त्याची उंची ५५ मी. असून सभामंडपात ५०० स्तंभ आहेत. त्यावर अपोत्थित शिल्पांत चित्रविचित्र नक्षीकाम असून मंदिरातील भव्य पृथिव्याकार लिंग हे पंचमहाभूतात्मक शिवलिंगांपैकी एक असल्यामुळे त्याचे माहात्म्य विशेष मानले जाते. ही सर्व मंदिरे म्हणजे विजयानगर वास्तुशिल्पांचे संग्रहालयच म्हणावे लागेल.

कांचीपुरात प्राचीन काळापासून पिढ्यानपिढ्या रेशीम विणण्याचा धंदा करणारी अनेक घराणी आहेत. रेशमाबरोबर सुती कापडाचेही विणकाम मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. येथील साड्या ‘कांजीवरम्‌ साड्या’ ह्या नावाने भारतभर प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणेच दागिने, तांब्या-पितळेची भांडी येथे मोठया प्रमाणावर तयार होतात. आजचे कांचीपूर आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असून तीर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याच्या विकासाकडे व नीटनेटकेपणाकडे राज्य सरकार बारकाईने लक्ष देता आहे.

संदर्भ : 1. Das, R. K. Temples of Tamilnad, Bombay, 1964.

             2. Puri, B. N. Cities of Ancient India, Calcutta, 1966.

देशपांडे, सु. र.